Join us  

थंडीत कोरडेपणामुळे केसांचा झाडू दिसतो? ५ उपाय, थंडीतही केस राहतील मुलायम-सिल्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2023 9:40 AM

Easy Home remedies for dry hairs in winter : कोरडेपणामुळे केस एकतर खूप गळतात नाहीतर तुटतात

ऋतू बदलला की त्याचा आपल्या शरीरावर परीणाम होतो, यामध्ये अतर्गत शरीर आणि बाह्य शरीर या दोन्हीचा समावेश असतो. हिवाळ्यात गारठ्यामुळे एकीकडे थंडी वाजत असतानाच हवेतील कोरडेपणामुळे त्वचा, केस कोरडे पडतात. अनेकदा हे केस इतके रखरखीत होतात की ते झाडूसारखे दिसायला लागतात. थंडीमुळे त्वचेतील आणि हवेतील मॉईश्चर कमी झाल्याने असे होते. ऑफीसला किंवा अगदी एखाद्या कामासाठी बाहेर जाताना केस विंचरले की कोरडेपणामुळे ते एकतर खूप गळतात नाहीतर तुटतात. पण थंडीत केसांचा कोरडेपणा वाढू नये आणि केस मुलायम राहावेत यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन महागड्या स्पा ट्रिटमेंट करतो. त्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे (Easy Home remedies for dry hairs in winter)...

१. कांदा 

कांद्यामध्ये असलेले सल्फर केसांच्या वाढीसाठी पोषक आहे. केसांसाठी कांद्याच्या रसाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास केस मजबूत होतील. केसांशी संबंधित सर्व समस्या या उपायामुळे कमी होतील. एक मोठा कांदा मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. ती गाळून त्यामध्ये तेल घालून हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. यामुळे केस मुलायम होण्यास मदत होईल. 

(Image : Google)

२. दही

दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन ए चे घटक भरपूर प्रमाणात आहेत. हे घटक केस तसेच त्वचेसाठी पोषक असल्याने आठवड्यातून दोन वेळा केसांना दही लावावे. दह्यातील पोषक घटकांमुळे केसांवर चमक येते तसेच कोंडा कमी होण्यासही मदत होते. 

३. सिरम

सिरम हे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. आपण केस धुताना नियमितपणे शाम्पू आणि कंडिशनर लावतो. पण सिरम लावायचा आपण कंटाळा करतो. ओल्या केसांवर लावण्यासाठी ज्याप्रमाणे सीरम उपयुक्त असते. त्याचप्रमाणे रात्री झोपताना केसांना सीरम लावल्याने केस मुलायम होण्यास मदत होते. 

४. कंगव्याची निवड

थंडीत केस कोरडे झाले असतील तर ते प्लास्टिकच्या कंगव्याने विंचरण्यापेक्षा लाकडाच्या किंवा मेटलच्या कंगव्याने विंचरलेले जास्त चांगले. प्लास्टिकमुळे केस आणखी रखरखीत होण्याची शक्यता असते. तसेच थंडीत केसांत जास्त गुंता होत असल्याने लहान दातांच्या कंगव्यापेक्षा मोठ्या दातांचा कंगवा वापरावा. त्यामुळे केस कंगव्यात अडकून तुटत नाहीत. 

(Image : Google)

५. केस धुण्याबाबत

थंडीमध्ये केस सारखे धुवू नयेत कारण त्यामुळे केसांमधील नॅचरल ऑयल निघून जाते आणि केस कोरडे होतात. केस आठवड्यातून दोन वेळाच धुवावेत.तसेच केस धुण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त गरम पाण्याचा वापर करु नये. त्यामुळेही केस जास्त कोरडे होण्याची शक्यता असते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीथंडीत त्वचेची काळजी