वय वाढलं की वाढत्या वयाचे परीणाम म्हणून चेहऱ्यावर साहजिकच सुरकुत्या दिसायला लागतात. हल्ली तर वयाच्या तिशीतच अनेक महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात. त्यामुळे अकाली वृद्धत्व आल्याचा भास होतो. अशाप्रकारच्या सुरकुत्यांमुळे सौंदऱ्यामध्ये बाधा येते आणि महिलांच्या आत्मविश्वासाला तडा जाण्याची शक्यता असते. मग या सुरकुत्या दिसू नयेत यासाठी एकतर पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट घेणे किंवा भरपूर सौंदर्यप्रसाधने वापरुन सुरकुत्या लपवणे असे उपाय करावे लागतात. पण या दोन्ही गोष्टी वेळ आणि पैसा घालवणाऱ्या असतात. त्यापेक्षा घरच्या घरी नियमितपणे काही सोप्या गोष्टी केल्यास चेहऱ्याची त्वचा नितळ, सुंदर दिसू शकते. यासाठी कोणत्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात पाहूया (Easy home Remedies for wrinkle free face anti aging tips)...
१. भरपूर पाणी पिणे
भरपूर पाणी प्यायल्याने चेहऱ्याची त्वचा नितळ आणि चमकदार राहण्यास मदत होते. दिवसातून किमान ३ ते ४ लीटर पाणी आवर्जून प्यायला हवे. याचा पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी उपयोग होतोच पण त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठीही याचा चांगला फायदा होतो.
२. मॉईश्चरायजर
त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे जसे आवश्यक असते त्याचप्रमाणे बाहेरूनही त्वचेची काळजी घ्यायला हवी. त्वचा मुलायम राहण्यासाठी नियमित मॉईश्चरायजर वापरणे गरजेचे असते. आपल्या त्वचेला मानवेल असे एखादे चांगले मॉईश्चरायजर हा स्कीन केअर रुटीनमधील महत्त्वाचा भाग असतो.
३. मसाज
चेहऱ्याला मसाज केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेच्या सुरकुत्या कमी वयात न येता थोड्या उशीराने येण्याची शक्यता वाढते. मसाजमुळे नकळत आपल्याला फ्रेश वाटते आणि त्वचा ताजीतवानी झाल्यासारखेही जाणवते. फेस मसाज करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सध्या ऑनलाईनही उपलब्ध असतात. त्यांच्या साह्याने त्वचा चांगली राहण्यास मदत होते.
४. फेस मास्क
फेस मास्क म्हणजे फॅन्सी काहीतरी असा आपला समज असतो. पण घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून आपण अगदी सहज फेस मास्क करु शकतो. यामध्ये कॉफी, मध, हळद, डाळीचे पीठ, साय यांसरखे घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून आपण हे मास्क करु शकतो. यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.