अभिनेत्रींची त्वचा कायम ग्लोईंग आणि नितळ कशी दिसते असा आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो. यासाठी त्या खूप मेकअप करत असतील किंवा महागड्या ट्रिटमेंटस घेत असतील असेही आपल्याला वाटते. पण स्क्रीनवर चेहरा चांगला दिसावा यासाठी बॉलिवूड अभिनेत्री मेकअप करत असल्या तरी रिअल लाईफमध्ये त्वचा चांगली राहण्यासाठी त्या नियमित व्यायाम, उत्तम आहार आणि घरगुती उपाय करण्यावर भर देतात. सोशल मीडियामुळे बऱ्याचशा अभिनेत्री आपले स्कीन केअर किंवा हेअर केअर आणि डाएट-फिटनेस रुटीन आपल्या चाहत्यांसोबत शेअरही करतात (Easy Home remedy for dry skin by meera kapur).
प्रसिद्ध मॉडेल, युट्यूबर आणि अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर मीरा राजपूत कपूर ही कायम ब्यूटी किंवा डाएट रिलेटेड काही ना काही गोष्टी आपल्याशी शेअर करत असते. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. मीरा अवघी २९ वर्षांची असून ती २ मुलांची आई आहे. पण तिचे सौंदर्य २० वर्षाच्या तरुणींना लाजवेल असे असल्याने सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत. नुकतीच मीराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने थंडीत कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी एक अतिशय सोपा पण इफेक्टीव्ह असा उपाय सांगितला आहे. तुमचीही त्वचा थंडीमुळे कोरडी पडत असेल तर तुम्हीही हा उपाय ट्राय करुन पाहू शकता. पाहूया हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा.
कोरड्या त्वचेसाठी उपाय काय?
थंडीत आपण कोरड्या पडलेल्या त्वचेसाठी मॉईश्चरायजर किंवा आणखी काही ना काही लावतो. पण मीरा नेहमी काही ना काही नैसर्गिक आणि सोपे उपाय सांगते. त्यामुळेच तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. आताही मीराने असाच एक सोपा उपाय सांगितला असून कोरड्या त्वचेसाठी हा उपाय अतिशय फायदेशीर असल्याचे तिचे म्हणणे आहे. सध्या ती भूतानच्या ट्रिपला गेली असून बहुदा त्याठिकाणहूनच तिने ही पोस्ट केली आहे. ती म्हणते गारठलेला देश, मध्येच येणारा उकाडा आणि एकूणच कोरडा ऋतू, यामुळे माझी त्वचा खूप कोरडी झाली आहे. अशावेळी कच्च्या दुधापेक्षा दुसरे काहीच चांगला उपाय असू शकत नाही. हे दूध चेहऱ्याला लावल्यावर चांगला वास हवा असेल तर यामध्ये थोडे गुलाब पाणी घालायला हवे असेही ती म्हणते. स्वत:चा एक नॅचरल लूकमधला फोटो शेअर करत तिने हे लिहीले असून पुढच्या फोटोमध्ये तिने बाऊलमध्ये दूध, वाईप्स आणि एक डबी यांचाही फोटो पोस्ट केला आहे.