आपल्या चेहऱ्यावर कधी वांगाचे काळे डाग असतात तर कधी पिंपल्स फुटून त्याचे डाग पडतात. उन्हातान्हात चेहऱ्याला काहीही न लावता बाहेर फिरल्याने चेहरा काळवंडतो. त्वचा सुरकुतल्यासारखी किंवा खराब दिसायला लागते. चेहरा हा सौंदर्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्याने चेहरा चांगला दिसावा यासाठी आपला अट्टाहास सुरू असतो. त्वचा छान नितळ आणि सतेज असेल तर आपल्याला फारसा मेकअपही करावा लागत नाही. पण हीच त्वचा चांगली नसेल तर मात्र आपल्याला चेहऱ्यावर मेकअपचे थर लावण्याशिवाय पर्याय नसतात (Easy home remedy for glowing skin).
प्रदूषण, पोट साफ नसणे किंवा अन्य काही तक्रारींमुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. मग पार्लरमध्ये जाऊन आपण महागातल्या ट्रिटमेंटस घेतो. मात्र त्याचा तात्पुरता उपयोग होतो. पुन्हा त्वचा पहिल्यासारखीच दिसायला लागते. पण चेहरा छान नितळ दिसावा यासाठी घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. पाहूयात नितळ त्वचेसाठी नेमके कोणते उपाय करायचे .
फेसपॅक कसा करायचा पाहूया...
१. एका बाऊलमध्ये १ चमचा बेसन पीठ घ्यायचे.
२. त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची. ही हळद आंबेहळद किंवा कस्तुरी मंजल हळद असेल तर जास्त चांगले.
३. यात १ चमचा कच्चे दूध घालायचे, पण स्कीन जास्त कोरडी असेल तर यात उकळलेल्या दुधाचा वापर करावा. यामध्ये साय, दही हे वापरले तरी चालते.
४. हे सगळे चांगले एकत्र करुन त्याची छान पेस्ट तयार करायची.
५. ही पेस्ट चेहऱ्याला सगळीकडे एकसारखी लावायची
६. साधारण १० मिनीटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवून नंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवायचा.
फायदे
१. रात्री झोपण्यापूर्वी सुरुवातीला सलग ७ दिवस आणि नंतर आठवड्यातील ३ दिवस हा उपाय करायचा.
२. चेहरा धुतल्यावर मॉईश्चरायजर लावल्यास चेहरा मुलायम राहण्यास मदत होते.
३. बेसनामुळे चेहऱ्यावरचे टॅनिंग आणि मृत त्वचा, डाग निघून जाण्यास मदत होते.
४. हळदीतील अँटीबॅक्टेरीयल घटकांमुळे पिंपल्स येण्यापासून सुटका होण्यास मदत होते, त्वचा सतेज होण्यास मदत होते.
५. दुध आणि दह्यातील लॅक्टीक अॅसिडमुळे चेहऱ्यावरचे टॅनिंग निघून जाण्यास मदत होते. त्वचा मुलायम आणि मॉईश्चराईज होण्यास मदत होते.