केस हा अनेकींसाठी विक पॉईंट असतो. केस लांबसडक आणि दाट असतील तरच आपण सुंदर दिसतो असे त्यांना वाटत असते. मात्र काही ना काही कारणाने हे केस खूप गळतात आणि डोक्यावर विरळ जागा दिसायला लागतात. इतकेच नाही तर कंगवा डोक्यात घातल्यावर पुंजकेच्या पुंजके हातात येतात. पण केस दाट आणि लांबसडक असावेत असे प्रत्येकीला वाटते. मात्र अनुवंशिकता, रासायनिक उत्पादनांचा वापर, प्रदूषण यांमुळे हे केस गळतात किंवा तुटतात. केस पातळ झाल्याने किंवा डोक्यावर विरळ जागा दिसल्याने आपल्या सौंदर्यात बाधा येते. अशावेळी केस वाढण्यासाठी घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. पाहूयात केसांचा पोत सुधारण्यासाठी काय करायला हवे (Easy Home Remedy for Hair Growth Hair Care Tips).
काय आहे उपाय?
हे आलं किसून त्याचा रस काढावा. यामध्ये १ चमचा खोबरेल तेल, १ चमचा एरंडेल तेल आणि १ चमचा कोरफडीचा गर मिसळावा. हे मिश्रण चांगले एकजीव करुन मग ड्रॉपरच्या किंवा कापसाच्या साह्याने केस विरळ झाले असतील त्या भागात हे मिश्रण लावावे आणि हे मिश्रण लावलेल्या ठिकाणी बोटांनी थोडा मसाज करावा. १ तास हे मिश्रण तसेच ठेवून नंतर नेहमीच्या शाम्पूने केस धुवून टाकावेत.
केसांना होणारे फायदे
आलं आपण जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी वापरतो. आल्यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे आणि फॅटी अॅसिडस असतात. यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. केसांच्या मूळाशी होणारी आग कमी होण्यासाठी, केस पांढरे होऊ नयेत म्हणून आणि केसांतील कोंडा कमी होण्यासाठी या आल्याच्या रसाचा चांगला उपयोग होतो. याशिवाय तेल आणि कोरफडीच्या गरामुळे केस मुलायम होण्यास मदत होते. नियमितपणे हा उपाय वापरल्यास महिन्याभरात केस दाट होण्यास मदत होते.