Join us  

केस वाढतात पण कमकुवत असल्याने तुटतात, मजबूत केसांसाठी करा १ सोपा नैसर्गिक उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2024 6:05 PM

Easy Home remedy for long and strong hairs : पाहूयात केस मजबूत होण्यासाठी घरच्या घरी करता येईल असा हेअर स्प्रे...

आपले केस अनेकदा भराभर वाढतात . केस लांबसडक आणि दाट असावेत अशी आपली किमान अपेक्षा असते. बहुतांश वेळा समोरून पाहणाऱ्याला केस तसे दिसतातही. पण प्रत्यक्षात मात्र ते खूप कमकुवत असतात. वरून मजबूत दिसणारे केस आतून एकदमच हलके असतात. एकदा केसांत कंगवा घातला की खूप जास्त केस हातात येतात. इतकेच नाही तर केसांना फाटे फुटणे, ते रुक्ष होणे, मुळापाशी केसांना पोषण न मिळणे अशा केसांच्या एक ना अनेक तक्रारी असतात (Easy Home remedy for long and strong hairs). 

पण केस मुळापासून मजबूत राहावेत आणि त्यांची चांगली वाढ व्हावी यासाठी त्यांना पोषण मिळणे गरजेचे असते. हे पोषण केसांना आपण खात असलेल्या अन्नातून तर मिळतेच. पण तेल, शाम्पू हेअर मास्क यातूनही मिळते. आज आपण केस मजबूत राहावेत यासाठी घरच्या घरी करता येईल असा एक स्प्रे पाहणार आहोत. नैसर्गिक घटकांचा वापर करून हा स्प्रे तयार होत असल्याने त्यामुळे केसांना कोणताही अपाय तर होत नाहीच पण केस मजबूत राहण्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. पाहुयात हा खास स्प्रे नेमका कसा तयार करायचा.

१. एका पातेल्यात १.५ ग्लास पाणी घेऊन ते गॅसवर उकळायला ठेवायचे. 

२. त्यामध्ये २ चमचे रोजमेरीची पाने आणि अर्धा चमचा मेथी दाणे घालायचे. 

३. साधारण १५ कडीपत्त्याची पाने आणि १ चमचा काळे  तील घालून हे मिश्रण चांगले उकळू द्यायचे. 

४. साधारण २० मिनिटे हे सगळे एकत्र उकळू द्यायचे आणि नंतर गॅस बंद करायचा. 

५. पूर्ण गार झाल्यावर हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून ठेवायचे आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर करायचा.

६. आठवड्यातून तीन वेळा हा स्प्रे केसांवर मारल्यास केस मजबूत होण्यास त्याचा चांगला फायदा होतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी