ओठ हा स्त्रियांच्या सौंदर्यातील महत्त्वाचा भाग असल्याने ओठ चांगले दिसणे एकूण दिसण्याच्या बाबतीत खूप महत्त्वाचे असते.आपले ओठ मुलायम आणि छान मऊ-गुलाबी असतील तर छान दिसतात पण ते तसे नसतील तर मात्र आपल्या सौंदर्यात बाधा येते. थंडीच्या दिवसांत हवेत कोरडेपणा असल्याने त्वचा, केस ज्याप्रमाणे कोरडे पडतात त्याचप्रमाणे ओठांची त्वचाही कोरडी पडते. ही कोरडी झालेली त्वचा हळूहळू निघायला लागते आणि ओठांवर सालपटे निघायला लागतात. एकदा सालपटं निघायला लागली की आपण ओठांना जीभ फिरवून ओलसर करण्याचा प्रयत्न करतो नाहीतर ही सालपटं हाताने काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे दोन्ही करणे ओठांसाठी चांगले नसते(Easy Natural Home Remedies for dry lips in winter ).
लिप बाम लावणे हा त्यासाठी एक चांगला उपाय ठरु शकतो. पण लिप बामचा इफेक्ट काही वेळच राहतो आणि नंतर लगेचच ओठ पुन्हा कोरडे पडतात. तसेच या लिप बाममध्ये नेमके कोणते घटक वापरलेले असतात तेही आपल्याला माहित नसते. त्यामुळे अनेकदा लिप बाम जास्त प्रमाणात वापरल्यास ओठ काळे पडणे, आहेत त्याहून जास्त कोरडे होणे अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच घरच्या घरी काही नैसर्गिक उपाय केल्यास त्याचा ओठ मुलायम होण्यास निश्चितच फायदा होतो. पाहूयात थंडीच्या दिवसांत मुलायम ओठांसाठी करता येतील असे उपाय कोणते आणि ते कसे करायचे...
१. खोबरेल तेल
रात्री झोपताना ओठांवर खोबरेल तेलाचा हात फिरवला आणि रात्रभर तसेच ठेवले तर ओठांचा मॉईश्चर मिळण्यास चांगली मदत होते. दिवसाही हा उपाय नक्कीच करु शकतो. घरात सहज उपलब्ध असणारी गोष्ट असल्याने हा उपाय अवश्य ट्राय करा.
२. मध
मधाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व असून मधामध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात. मध एक चांगला एक्सफॉलिएटर असून ओठांना ओलावा देण्याचे काम करतो. मधामध्ये थोडे ऑलिव्ह ऑईल घालून ते मिश्रण ओठांना लावावे आणि त्यानंतर ओठ धुवून टाकावेत. यामुळे ओठ मुलायम होण्यास नक्कीच मदत होते.
३. तूप
फुटलेल्या ओठांना लावण्यासाठी तूप हा अतिशय पारंपरिक पर्याय आहे. तूपामध्ये असणारे गुणधर्म कोरडेपणा कमी करत असल्याने पूर्वीपासून कोरड्या पडलेल्या ओठांवर तूप लावण्याची पद्धत आहे. ओठ छान नैसर्गिकरित्या मऊ दिसावेत असे वाटत असेल तर दिवसातून २ ते ३ वेळा ओठांवर तूपाचा हात अवश्य फिरवावा.
४. शुगर स्क्रब
फुटलेल्या ओठांची त्वचा निघते. ही त्वचा हाताने काढली तर त्याठिकाणी रक्त येण्याची शक्यता असते. त्यामुळे हाताने त्वचा न काढता साखरेत थोडासा मध घालून हे मिश्रण ओठांवर चोळावे. यामुळे त्वचा निघून जाण्यास मदत होते आणि ओठ नैसर्गिकरित्या मुलायम दिसतात.