केस गळणे ही समस्या अगदी लहान वयातील मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळ्यांनाच भेडसावते. दिवसाला १०० केस गळणे सामान्य असते असे म्हटले जाते. पण त्यापेक्षाही खूप जास्त केस गळत असतील तर मात्र चिंतेची बाब असते. बरेच दिवस केस न धुणे, केसांना पुरेसे पोषण न मिळणे, कोरडेपणा यांसारख्या कारणांमुळे केस गळतीचे प्रमाण वाढते. केस एकदा गळायला लागले की घरभर केस दिसतात, धुतल्यावरही बाथरुममध्ये केसांचा मोठा गुंता दिसतो आणि केसातून कंगवा फिरवला की त्यातही बरेच केस येतात (Easy natural home remedies to reduce hair fall hair care tips) .
खूप जास्त प्रमाणात केस गळायला लागले तर केस विरळ होतात आणि प्रमाणापेक्षा जास्त पातळ दिसायला लागतात. केस सतत गळाल्याने तुम्हीही हैराण असाल तर आज आपण त्यांचा पोत सुधारावा आणि मुळं मजबूत व्हावीत यासाठी २ सोपे उपाय पाहणार आहोत. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यांनी हे उपाय सांगितले असून यामुळे केसांचे गळण्याचे प्रमाण नक्कीच आटोक्यात येऊ शकेल.
१. सगळ्यात सोपा आणि अतिशय उपयुक्त असा उपाय म्हणजे आवळा, काळे तीळ आणि आक्रोड यांची पावडर करायची. तिन्ही पावडरी ५० ग्रॅम या प्रमाणात एकत्र करायच्या आणि सकाळ संध्याकाळ हे मिश्रण १ चमचा पाण्यासोबत घ्यायचे. यामुळे मुळापासून होणारी केसगळती कमी होण्यास मदत होईल. आवळा आणि काळे तीळ यामध्ये केश्य गुण असतात. तसेच आक्रोडामध्ये बायोटीन असल्याने हे सगळे घटक केसांची मुळे मजबूत होण्यासाठी फायदेशीर असतात.
२. दुसरा आणि सोपा उपाय म्हणजे कोमट दूध घेऊन त्यामध्ये २ चमचे देशी गाईचे तूप घालायचे. रात्री झोपण्यापूर्वी हे रोज प्यायचे. दूध आणि तूप घेतल्याने आपण जाड होऊ असं तुम्हाला वाटेल पण नियमित व्यायाम केल्यास जाडीवर काही परीणाम होत नाही. १ ते ३ महिने हे उपाय केल्यास केसांचा पोत सुधारण्यास याचा चांगला फायदा होतो. कॅल्शियम आणि प्रोटीन्स मिळाल्याने केसांचे पोषण होते आणि केसगळती कमी होऊन केसांची वाढ होण्यास याची चांगली मदत होते.