स्वत:च्या चेहेऱ्यावरुन हात फिरवताना आपल्याला आपलाच स्पर्श नकोसा वाटतो आहे का? खरंतर हे असं अनेकजणींच्या बाबतीत नेहेमीच होतं तर काहीजणींच्या बाबतीत गेल्या वर्षापासून घडत आहे. सतत हात सॅनिटाइझ करुन , वारंवार हॅण्डवॉशनं हात धुवावे लागत असल्यानं अनेकींचे हात सध्या रखरखीत, खडबडीत आणि कोरडे झाले आहेत. वातावरण, अंगातील उष्णता, सतत भांडी घासून, कपडे धुवून , भाज्या चिरुन हातातला मऊपणा हरवल्याची तक्रार अनेकींची असते. हा हाताचा खडबडीतपणा कमी करण्याचे अगदी सोपे उपाय आहेत. आणि फारसा वेळ न देताही मऊ हाताचं सुख आपण परत अनुभवू शकतो. त्यासाठी खूप महागड्या गोष्टींची गरजही नसते. हाताशी व्हॅसलिन, खोबरेल तेल,ओटमिल पावडर,मध आणि कोरफड या गोष्टी असल्या तरी खरबरीत हात मऊ होऊ शकतात.
खरबरीत हात मऊ करण्याचे उपाय- व्हॅसलिनमधे मॉश्चरायजिंगचं प्रमाण खूप असतं. झोपण्यापूर्वी व्हॅसलिनचा जाडसर थर घेऊन तो दोन्ही हातांवर व्यवस्थित चोळून जिरवून लावावा. हा उपाय नियमित केल्यास हात मऊ होतात.
- खोबरेल तेलामुळे हात छान मऊ होतात. कारण खोबरेल तेल ओलसरपणा निर्माण करतो. त्वचा ओलसर ठेवणारा लिपिड थर खोबरेल तेलामूळे वाढतो. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी हाताला खोबरेल तेल चोळावं. ते रात्रभर तसंच राहू द्यावं.
- ओटमिलमधे नैसर्गिक एक्सफोलिअण्ट घटक असल्याने कोरड्या त्वचेवर ओटमिल हा उत्तम पर्याय ठरु शकतो. त्यासाठी एक चमचा ओटमिल पावडर आणि अर्धा चमचा खोबरेल तेल घ्यावं. ते व्यवस्थित एकत्र करुन त्याची पेस्ट करावी. ती पेस्ट दोन्ही हातांना लावावी. दहा पंधरा मिनिटांनी हात कोमट पाण्यानं धुवावेत. हात रुमालानं कोरडे करुन हाताला पेट्रोलिअम जेली लावावी.
- त्वचा नैसर्गिकरित्या उत्तम करण्याचा गुणधर्म मधात असतो. हाताचा कोरडेपणाही मधाच्या वापरानं कमी होतो. त्यासाठी थोडं मध हातावर घेऊन चोळावं. पंधरा वीस मिनिटं ते तसंच राहू द्यावं. नंतर हात गार पाण्यानं धुवावेत. या उपायामूळे हात ओलसर, मऊ राहातात. तळ हातातली आर्द्रता मधाने वाढते आणि टिकते.
- कोरफडीत पॉलिसॅचराइडस हा घटक असतो. त्यामूळे त्वचा आर्द्र राहाते आणि मऊ होते. हाताच्या मऊपणासाठी ताज्या कोरफडीच्या पात्यातून गर काढावा आणि तो हातास लावावा. पंधरा वीस मिनिटं हात तसेच ठेवावेत. नंतर हात गार पाण्यानं धूवावेत. आठवड्यतून किमान दोन वेळेस हा उपचार केल्यास खरबरीत हात लवकर मऊ होतात.