थप्पड से डर नही लगता साहब प्यार से लगता हैं.. आपण हा डायलॉग ऐकलाच असेल. पण खरंच, कोरियन महिला थप्पडला घाबरत नाही. उलट त्यांचं सुंदर दिसण्यामागचं गुपित त्यामागे दडलं आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना ? हो, कोरियन महिला शेकडो वर्षांपासून एका विचित्र थेरपीचा वापर करत आहेत. स्लॅप म्हणजे थप्पड मारून सौंदर्य वाढवणारी थेरपी असं या विचित्र थेरपीचं नाव आहे. कोरियन महिलांचा चेहरा अतिशय नाजूक, चमकदार दिसतो. त्या ब्युटी ट्रिटमेंट, कॉस्मेटिक किंवा प्लॅस्टिक सर्जरी करून सुंदर दिसत नाहीत. तर, दिवसातून गालावर किमान 50 वेळा थप्पड मारून त्वचेला चमकदार बनवतात.
या थेरपीमागं अतिशय सोपा असा तर्क आहे. आपण गालांवर हलक्या हातानं थप्पड मारली तर, चेहऱ्यावरच्या प्रत्येक भागातला रक्तप्रवाह वाढतो, आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. त्वचा स्वच्छ झाली तर चेहऱ्याच्या विविध भागांपर्यंत रक्त पोहोचेल आणि चेहरा तजेलदार दिसू लागेल.
कोरिया आणि चीनमधल्या महिला वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये, यासाठी थेरपीचा वापर करतात. या थेरपीचा योग्य पद्धतीनं वापर केल्यास चेहऱ्यावरची त्वचा दीर्घ काळ तरुण आणि तजेलदार राहते, असा या महिलांना विश्वास आहे. त्यामुळे ही थेरपी अँटी एजिंग थेरपीही मानली जाते. या थेरपीमुळे त्वचा मऊ मुलायम होते आणि त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.