मर्यादित कालावधीसाठी मिळणारी लिची खायला सर्वांनाच आवडते. लिची केवळ चवीला छान लागते असं नाही तर लिचीमध्ये क जीवनसत्व, फोलेट, नियासिन, राइबोफ्लेविन, बीटा केरोटीन ही महत्वाची पोषणमुल्यं असल्यानं आरोग्यासाठीही लिची महत्त्वाची आहे. लिची खाल्ल्यानं शरीरास विविध फायदे मिळतात. लिची खाल्ल्यानं शरीरात ओलावा टिकून राहातो. वजन कमी करण्यासाठी लिची खाणं फायदेशीर असतं. लिची खाल्ल्यानं पचन सुधारतं. घशाची खवखव निघून जाते. तसेच गरोदर महिलांसाठीही लिची फायदेशीर असते.
Image: Google
आरोग्यास फायदेशीर असलेली लिची खाल्ल्यानंतर लिचीचं साल आपण सरळ कचऱ्यात टाकून देतो. पण लिचीच्या सालांचे सौंदर्योपयोग ऐकल्यास यापुढे नक्कीच लिचीचं सालं तुम्ही कचऱ्यात टाकणार नाही. लिचीच्या सालांच्या खरबरीतपणामुळे या सालांचा उपयोग चेहऱ्याची त्वचा स्वच्छ करण्यासाठी स्क्रबसारखा होतो. त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी, शरीरावर साठलेला मळ काढण्यसाठी लिचीच्या सालाचा चांगला उपयोग होतो. सौंदर्य वाढवण्यासाठी लिचीच्या सालांचा चार प्रकारे वापर करता येतो.
1. फेस स्क्रब
लिचीच्या सालांचा फेस स्क्रब म्हणून वापर करता येतो. यासाठी खूप मेहनत करण्याची गरज नाही. फेस स्क्रब करण्यासाठी लीचीची सालं धुवून आणि उन्हात वाळवून घ्यावीत. सालं वाळली की मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावीत. फेस स्क्रबचं मिश्रण करण्यासाठी लिची सालाची पूड घ्यावी. त्यात तांदळाचं पीठ घालावं. दोन्ही नीट एकत्र केल्यावर त्यात कोरफडचा गर/ जेल आणि थोडं गुलाब पाणी घालून ते मिसळून घ्यावं. ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. थोडा वेळ राहू द्यावी. नंतर पाण्याचा वापर करत या पेस्टनं चेहऱ्याचा हलक्या हातानं मसाज करावा. मसाज झाल्यानंतर थोडा वेळ थांबावं आणि नंतर चेहरा रुमाल ओला करुन पुसून घ्यावा.
2. मान स्वच्छ करण्यासाठी
मान स्वच्छ करण्यासाठी लिचीच्या सालाच्या पावडरीचा उपयोग होतो. यासाठी एका वाटीत लिचीच्या सालाची पावडर घ्यावी. त्यात थोडी बेकिंग पावडर, लवंगाचं तेल, लिंबाचा रस आणि हळद घालावी. हे सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावं. हलक्या हातानं ते मानेवर घासावं. लिचीच्या सालीमुळे मानेवरील मृत पेशी निघून जातात. या मिश्रणातील बेकिंग पावडर आणि लिंबाच्या रसामुळे मानेचा काळपटपणा कमी होतो.
Image: Google
3. पायांच्या टाचा स्वच्छ करण्यासाठी
भेगाळलेल्या, फाटलेल्या टाचांमुळे पाय खराब दिसतात. लिचीचं साल फाटलेल्या टाचांवर उपाय म्हणून काम करतं. यासाठी लिचीची सालं थोडी वाळवून मिक्सरमधून किंवा खलबत्यात कुटून घ्यावी. त्यात मुल्तानी माती, बेकिंग सोडा आणि ॲपल सायडर व्हिनेगर घालावं. हे मिश्रण नीट मिसळून नंतर ते पायांच्या टाचांना लावावं. हे मिश्रण टाचांना लावल्यानंतर 20 मिनिटांनी टाचा प्यूमिक स्टोननं हळूवार घासाव्यात. या उपायानं टाचा स्वच्छ होतात आणि भेगाही मऊ होतात.
4. लिचीच्या सालाचं उटणं
शरीरावर साठलेला मळ काढण्यासाठी लिचीच्या सालाचा उटण्यासारखा उपयोग करता येतो. लिचीच्या सालाच्या उटण्यानं पाठ देखीला स्वच्छ होते आणि पाठीची त्वचा मऊ राहाते. शरीराच्या कोणत्याही भागावर लिचीच्या सालीचं उटणं लावल्यास त्याचा फायदाच होतो. हे उटणं तयार करण्यासाठी लिचीची सालं हळद घालून वाटावीत. यात 2 चमचे बेसन पीठ आणि थोडं मोहरीचं तेल घालावं. हे मिश्रण नीट एकजीव करुन अंगाला हलका मसाज करत स्क्रबसारखं लावावं. या उटण्यामुळे शरीराची त्वचा स्वच्छ आणि मऊ होते.