सध्या आपल्या रोजच्या आहारात आंबा असतोच. पण आपण आंब्याचा पूर्ण उपयोग करतो का? म्हणजे काय? असा प्रश्न पडला असेल ना.. म्हणजे आंब्याचा उपयोग हा फक्त खाण्यासाठीच असतो असं नाही. आंबा हा फक्त त्याच्या स्वादानंच मोहोवतो असं नाही. कारण आंबा हा सौंदर्यासाठीही खूप उपयुक्त आहे. पिकलेल्या आंब्याचा गर, आंब्याची सालं इतकंच नाही तर कच्चा आंबा म्हणजेच कैरीचाही सौंदर्यासाठी उपयोग होतो. आंब्याचे हे उपयोग वाचले तर यापुढे कधीही आंब्याची सालं फेकून देण्याचं मन होणार नाही.
आंब्याच्या सालीचा फेस पॅक
आंब्याचा गर जसा पौष्टिक असतो तशीच आंब्याची साल ही त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. आंब्याच्या सालीपासून फेस पॅक अर्थात लेप तयार करता येतो. सालींचा लेप तयार करण्यासाठी आंब्याची सालं काही दिवस उन्हात वाळवावीत. ती चांगली सुकली की ती बारीक वाटून घ्यावीत. सालींच्या या पावडरमधे दही किंवा गुलाब पाणी घालावं. हा लेप रोज चेहेर्यास लावावा. या लेपामुळे त्वचेवरचे काळे डाग, चेहेर्यावरचा काळेपणा निघून जातो. चेहेर्यावरचे मुरुम पुटकुळ्या तर जातातच शिवाय सुरकुत्याही कमी होतात. चेहेरा चमकदार करण्याचं काम आंब्याच्या सालींचा लेप करतो.
चेहेर्यावरचं टॅनिंग घालवण्यासाठी
आंब्याच्या सालीच्या उपयोग उन्हामुळे निर्माण होणारी टॅनिंगची समस्या घालवण्यासाठीही होतो. त्यासाठी आंब्याच्या सालीनं चेहेर्यावर जिथे जास्त टॅनिंग आहे तिथे हलक्या हातानं मसाज करावा. मसाज करुन झाल्यावर काही काळ चेहेरा तसाच ठेवावा. नंतर पाण्यानं चेहेरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहेर्यावरचं टॅनिंग निघून जातं आणि चेहेरा चमकदार होतो.
आंब्याचा स्क्रब
आंब्याच्या ओल्या-कोरड्या सालीसोबतच आंब्याचा गरही चेहेर्यासाठी वापरता येतो. आंब्याच्या गराचा उपयोग चेहेरा स्वच्छ करण्यासाठी होतो. त्यासाठी आंब्याच्या गराचा स्क्रब तयार करावा. आंब्याचा स्क्रब करताना पिकलेल्या आंब्याचा गर एका भांड्यात काढावा. गरात एक चमचा मिल्क पावडर आणि एक चमचा मध घालावं. हे मिश्रण चांगलं एकजीव करावं. मग ते चेहेर्यावर बोट गोल गोल फिरवून लावावं. ते लावताना बोटांनी हलका मसाज करावा. या स्क्रबमुळे चेहेर्यावरील मृत पेशी आणि ब्लॅकहेडसही निघून जातात. त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी आंब्याचा स्क्रब उपयुक्त आहे.
कैरीचं पाणी
चेहेर्यावर जर खूप मुरुम आणि पुटकुळ्या असतील तर कैरी बारीक चिरावी. चिरलेली कैरी पाण्यात उकळून घ्यावी. या पाण्यानं रोज दिवसातून दोन वेळा चेहेरा स्वच्छ करावा. याचा परिणाम दिसण्यास फार वेळ लागत नाही.
आंब्याचा गर आणि कणिक
चेहेरा व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी पिकलेल्या आंब्याचा उपयोग होतो. यासाठी एक चमचा गव्हाची कणिक घ्यावी त्यात आंब्याचा गर घालावा. दोन्ही गोष्टी एकजीव करुन चेहेर्यास हा लेप लावावा. हा लेप चेहेर्याच्या त्वचेवरील रंध्रात खोलवर जाऊन रंध्र स्वच्छ करतो . चेहेरा असा मुळापासून स्वच्छ करण्यासाठी या लेपाचा उपयोग अवश्य करावा.