Join us  

बेदाणे खा आणि चेहऱ्यालाही लावा! घरच्याघरी तयार करा स्पेशल बेदाणा टोनर ,जेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 5:05 PM

बेदाणे हे त्वचेतील पेशींची झीज भरुन काढतात तसेच खराब झालेली त्वचा सुधारण्याचं काम करतात. बेदाण्यांचा उपयोग करुन त्वचा उजळही बनते. बेदाण्यांपासून टोनर, जेल आणि फेसपॅक घरच्याघरी तयार करता येतं.

ठळक मुद्देबेदाण्याच्या फेस टोनरमुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते.बेदाण्यांपासून तयार केलेलं टोनर, जेल आणि लेप चेहेर्‍याला लावल्यास त्वचेला संसर्गाचा धोका कमी होतो.चेहेर्‍यावरील मुरुम पुटकुळ्या आणि सुरकुत्या या समस्या बेदाण्यांच्या वापरामुळे कमी होतात.

 

शीरा, हलवा, बर्फी यात बेदाणे टाकले की त्याची चव वाढते. नुसते बेदाणे खाणंही आरोग्यास फायदेशीर असतं . पण याच बेदाण्यांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करुन आपण आपलं सौंदर्य जपू शकतो आणि वाढवू शकतो. बेदाणे हे त्वचेतील पेशींची झीज भरुन काढतात तसेच खराब झालेली त्वचा सुधारण्याचं काम करतात. बेदाण्यांचा उपयोग करुन त्वचा उजळही बनते. बेदाण्यांपासून टोनर, जेल आणि फेसपॅक घरच्याघरी तयार करता येतं.

बेदाण्याचं टोनर

टोनर बनवण्यासाठी दोन मोठे चमचे बेदाणे पाण्यात धुवावेत. एका भांड्यात ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत. सकाळी हे पानी गाळून घ्यावं. या पाण्यत एक मोठा चमचा लिंबाचा रस आणि तीन चमचे गुलाब पाणी घालावं. हे सर्व चांगलं ढवळून घ्यावं. हे पाणी एका स्प्रे बाटलीत भरावं आणि रोज चेहेरा धुतला की ते टोनर म्हणून वापरावं.

बेदाण्याचं जेल

जेल तयार करण्यासाठी चार मोठे चमचे बेदाणे पाण्यानं धुवून घ्यावेत. एका भांड्यात पाण्यात रात्रभर भिजत ठेवावेत. सकाळी हे पाणी गाळून घ्यावं. भिजलेले बेदाणे वाटून त्याची पेस्ट तयार करावी. या पेस्टमधे तीन चमचे कोरफड जेल आणि एक इ विटॅमिन कॅप्सूलचं तेल घालावं. बेदाणे भिजवलेलं पाणी फेकून न देता दोन तीन चमचे ते पाणी बेदाण्याच्या पेस्टमधे घालावं. हे सर्व चांगलं एकत्र करुन घ्यावं. नंतर हवाबंद डब्यात ही पेस्ट भरुन ठेवावी. जेलसारखी रोज चेहेर्‍यावर रोज लावावी.

बेदाण्याचा लेप

बेदाण्याचा लेप तयार करण्यासाठी दोन मोठे चमचे बेदाणे घ्यावेत. ते पाण्यानं धुवून घ्यावेत. भांड्यात पावभर पाणी घालाव. त्यात हे बेदाणे भिजत घालावेत. सकाळी भिजवलेले बेदाणे गाळून घ्यावेत. बेदाणे भिजवलेल्या पाण्यात एक चमचा मध घालावं. ते पाण्यात चांगलं मिसळून घ्यावं. हे मिश्रण चेहेर्‍यावर लावावं. वीस मिनिट ते तसंच राहू द्यावं. चेहेरा नंतर पाण्यानं धुवावा. वाटल्यास या मिर्शणात एक चमचा लिंबाचा रसही घालता येतो .

काय होतो फायदा?

बेदाण्याच्या फेस टोनरमुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते. बेदाणे हे सूक्ष्मजीव आणि जीवाणूविरोधी असतात. त्यामुळे बेदाण्यांपासून तयार केलेलं टोनर, जेल आणि लेप चेहेर्‍यास लावल्यास त्वचेला संसर्गाचा धोका कमी होतो. त्वचेच्या पेशींची झीज भरुन निघते. चेहेर्‍यावरील मुरुम पुटकुळ्या आणि सुरकुत्या या समस्या बेदाण्यांच्या वापरामुळे कमी होतात. उन्हानं काळवंडलेला चेहेराही बेदाण्याच्या नियमित वापरानं उजळून निघतो. चेहेर्‍यावरील काळे डाग निघून जातात.