- सारिका पूरकर-गुजराथी
इको फ्रेंडली हा शब्द कोरोनाने आपल्या आयुष्यात जरा जास्तच बळकट केला आहे. इतके दिवस त्याची चर्चा होती, पण आता किमान याची सर्वांनाच जाणीव झाली आहे की आपली लाइफस्टाइल इको फ्रेण्डली असावी. ओरबाडू नये निसर्ग. फॅशनचं जग तरी त्याला अपवाद कसं असेल? म्हणून तर सध्या इको फ्रेंडली कपडे, चपला, अगदी साड्यांचाही अनोखा ट्रेंड आहे.
भारतात या इको फ्रेंडली साडय़ा सर्वप्रथम बाजारात आणण्याचा मान पटकावला आहे तो तमिळनाडूने. तमिळनाडू हातमाग विणकर सहकार सोसायटीने या साडय़ा तयार करून इको फ्रेंडली जीवनशैलीसाठी हातभार म्हणून महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
काय आहे इको फ्रेंडली साडी?
त्वचेला हानीकारक नसलेली, लाइटवेट अशी ही पर्यावरणपूरक साडी आहे. साडीची बॉर्डर आणि तिचा पदर यावर हाताने विणून केलेले नक्षीकाम हे तिचे आणखी एक वैशिष्टय़; पण ‘इको फ्रेंडली’ म्हणजे नक्की काय? तर ही साडी ज्या धाग्यापासून बनते, तो धागा ज्या कापसापासून तयार केला जातो, तो कापूसही सेंद्रिय असतो. हा कापूूस पिकविताना कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. असा कापूस तयार होण्यासाठी किमान तीन वर्षाचा कालावधी लागतो. तमिळनाडूतल्या होसून आणि पोलाची या गावांमध्ये या कापसाची लागवड केली जाते. या साडीच्या धाग्यांना ज्या रंगांत रंगविले जाते, ते रंगसुद्धा सेंद्रिय, नैसर्गिक असतात. हे रंग तयार करण्यासाठी हळद, गाजर, बीटरूट, ङोंडूची फुले, टोमॅटो, पालक, डाळिंबाचे दाणे, द्राक्षे या आणि इतर नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. म्हणून ही साडी पर्यावरणपूरक ठरते.
कोइम्बतूरमधील नेगाम्मम गावातले विणकर ही साडी विणतात. एक साडी विणण्यासाठी कमीत कमी दोन दिवस लागतात. इको फ्रेंडली साड्या बाजारात आणताना या विणकरांच्या कलेचाही सन्मान करण्याचा आगळा प्रयत्न करण्यात आला आहे. विक्रीसाठी साडीची पॅकिंग करताना प्रत्येक साडीवर विणकराचे नाव, वय, पत्ता, त्याची थोडक्यात कौटुंबिक माहिती आणि त्याचा फोटो असलेला टॅग लावला जातो. त्यामुळे ग्राहकाला प्रत्यक्ष विणकाम पाहायचे असल्यास वा काही शंका असल्यास थेट विणकराशी संपर्क साधता येतो. तमिळनाडूसहआंध्र प्रदेश, ओरिसा येथेही या साडय़ांना मागणी वाढली आहे.
केळ्याच्या धाग्यापासून साडी
इको फ्रेंडली साडय़ांचाच हा आणखी एक नवा प्रकार. ही साडीही तमिळनाडूमध्येच तयार होते. अनाकापुथूर या लहानशा गावातले विणकर ती हातमागावर विणतात. बाजारातली स्पर्धा आणि चंगळवादाच्या युगात या पारंपरिक हातमाग विणकरांच्या कपडय़ांना मागणी मिळत नसल्याने त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले. तमिळनाडूतील पद्म शेखर या अभियंत्याने हे संकट ओळखून त्यांच्या हातांना काम आणि दाम मिळवून देण्यासाठी अनोखा प्रयत्न केला. केळीच्या झाडातले तंतू ब्लीच पद्धतीने स्वच्छ करून त्यांच्यापासून धाग्याची निर्मिती केली जाते. एक साडी विणण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो. या साडय़ांची राष्ट्रीय तसेच आंतररराष्ट्रीय स्तरावरही विक्री केली जाते. याच विणकरांनी केळी, कापूस, अंबाडी, जवस, अननस, कोरफड, लिंबू आणि समुद्र गवत (लेमन ॲण्ड सी ग्रास), ज्यूट, लोकर अशा पंचवीस प्रकारच्या नैसर्गिक धाग्यांपासून साड्यांची निर्मिती करून ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये विक्रम नोंदवला आहे!