वयाचा आकडा किती का असेना पण इच्छा असते ती तरुण दिसण्याची. पण नुसती इच्छा असून काय उपयोग. वयाचा आकडा पुढे जाऊ लागला की चेहऱ्यावर त्याच्या खुणा दिसतातच. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ब्यूटी ट्रीटमेण्ट असल्या तरी त्याचे त्वचेवर वाईट परिणाम होण्याचीच शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावर नैसर्गिक उपाय केल्यास एजिंगची लक्षणं सहज कमी होतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी केळाच्या फेसपॅकचा चांगला उपयोग होतो असं सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात. केळाच्या 4 प्रकारच्या फेसपॅकमुळे एजिंगची समस्या सहज कमी करता येते.
Image: Google
केळं आणि मधाचा लेप
त्वचेसाठी केळ आणि मध फायदेशीर असतं. केळ आणि मधाच्या फेसपॅकमधून त्वचेला अ आणि इ जीवनसत्वं मिळतात. मधामुळे त्वचेला ओलसरपणा मिळतो. त्वचा माॅश्चराइज होते. केळं आणि मधाचा फेसपॅक तयार करण्यासाठी केळं कुस्करुन घ्यावं. त्यात 1 चमचा मध घालावं. केळं आणि मध एकजीव करुन हे मिश्रण त्वचेवर लावावं. 15 मिनिटांनी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. या उपायानं चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात, त्वचेचा रंग सुधारतो. त्वचा ओलसर राहाते.
Image: Google
केळं आणि पपई
केळं आणि पपई एकत्र करुन चेहऱ्यास लावणं त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. चेहऱ्यावरील एजिंगची समस्या दूर करण्यासाठी केळं आणि पपईच्या लेपाचा उपयोग करावा. यासाठी केळं आणि पिकलेल्या पपईचा एक तुकडा घ्यावा. दोन्ही एकत्र कुस्करुन घ्यावे. हे मिश्रण चेहरा आणि मानेस लावून 15 मिनिटं ठेवावं. केळं आणि पपईच्या लेपानं त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. त्वचा नरम आणि मऊ होते. त्वचेला ओलावा मिळतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या दिसेनाश्या होतात.
Image: Google
केळं आणि दह्याचा लेप
केळं आणि दह्याच्या लेपात ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्म अस्तात. हे गुणधर्म मुक्त मुलकांशी म्हणजे फ्री रॅडिकल्सशी लढतात. तसेच या लेपातील लॅक्टिक ॲसिडमुळे त्वचेचा पोत सुधारतो, त्वचा एकसारखी होते. केळं आणि दह्याचा फेसपॅक करण्यासाठी थोडं कमी पिकलेलं केळ घ्यावं. ते कुस्करावं. त्यात 2 चमचे दही घालावं. दोन्ही चांगलं एकजीव करावं. हा लेप चेहरा आणि मानेस लावावा. लेप लावल्यानंतर 15 मिनिटांनी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. हा लेप 2-3 दिवसातून एकदा लावल्यास चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या कमी होतात.
Image: Google
केळं आणि बेसनाचा लेप
वयाच्या आधीच चेहऱ्यावरुन एजिंगची लक्षणं दिसत असली तर केळं आणि बेसनाचा लेप यावरचा उत्तम उपाय आहे. केळं आणि बेसन पिठाचा लेप तयार करण्यासाठी थोडं कमी पिकलेलं केळं घ्यावं. ते कुस्करावं. त्यात 1चमचा बेसन आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण एकजीव करावं. हा लेप चेहरा आणि मानेस लावून 15 मिनिटं ठेवावा. केळं आणि बेसनाचा लेप लावल्यानं त्वचेचा रंग सुधारतो. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. एजिंगच्या समस्येवर उपयुक्त ठरणारा हा उत्तम लेप आहे.