Join us  

डोळ्याखालची काळी वर्तुळं आयुष्यात कधीतरी कमी होतील का?- या प्रश्नाचं हे घ्या उत्तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:06 PM

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर सात दिवसात उपचार करण्याचा दावा करणारे अनेक उत्पादनं असतात. उपायासाठी मग ते वापरण्याचा मोह होतोच. पण जाहिरातीत दावे केल्याप्रमाणे आठ दिवसाता काय महिनो न महिने ते क्रीम / लोशन लावूनही समस्या आहे तशीच राहाते. हे असं का?

ठळक मुद्देडोळ्यांखालची काळी वर्तुळं ही जनुकांमुळेही आलेली असतात. जर आपल्या पालकांचे डोळे खोल असतील, पालकांची डोळ्याखालील खाचेची त्वचा ही जर गडद असेल तर मग आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळं असू शकतात. सूर्याच्या प्रखर किरणांंमुळेही डोळ्याखालील भाग हा गडद होतो.डोळ्याखालील त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज असते त्याकडे आपण संपूर्ण दुर्लक्ष करतो.

आरशात पाहिलं की अनेकींना आपण कित्येक वर्षांपासून झोपलोच नाही की काय असं वाटायला लागतं. ही जाणीव निर्माण होते ती डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांमुळे. अनेकजणी तर चेहेऱ्याची काळजी नीट घेतात , पौष्टिक खातात-पितात आणि व्यवस्थित झोपही घेतात. तरीही डोळ्यांखाली काळी वर्तुळ असतात. याचाच अर्थ असा की या काळ्या वर्तुळांमागे काहीतरी वेगळंच कारण आहे. पण आपण या कारणांच्या मुळाशी जातच नाही. एकतर वेळ नसतो आणि दुसरं बाजारात या काळ्या वर्तुळांवर सात दिवसात उपचार करण्याचा दावा करणारे अनेक उत्पादनं असतात.  मग ते वापरण्याचा मोह होतोच. पण जाहिरातीत दावे केल्याप्रमाणे आठ दिवसाता काय महिनो न महिने ते क्रीम / लोशन लावूनही समस्या आहे तशीच राहाते.

हे असं का?

सर्व व्यवस्थित असूनही डोळ्याखाली काळी वर्तूळ का? याचं उत्तर क्रीम, सीरम, डाएट, सप्लिमेण्टसच्या पलिकडे असतं. त्वचाविकार तज्ज्ञ रती सेठ सांगतात की सगळ्यांच्याच डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळाकडे एका चशतून पाहून चालत नाही. कारण प्रत्येकाच्या डोळ्याखालील काळ्या वर्तूळांमागे वेगळी कारणं असतात. आणि म्हणूनच एखादं उत्पादन वापरुन सगळ्यांच्या डोळ्याखालची काळी वर्तूळ जात देखील नाही. अमूक उत्पादन वापरुन पाहा काळी वर्तूळ फटक्यात जातील ही केवळ जाहिरात नसून ती ग्राहकांच्या मनावर बिंबवलेली चुकीची माहिती असते. अनेकांच्या डोळ्याखालील काळी वर्तुळं ही तात्पुरती असतात. जी कमी झोप किंवा जास्त झोप झाल्यानं डोळ्याखालील त्वचा निस्तेज आणि खराब झालेली असते म्हणून येतात. अशांनी जर आपल्या जीवनशैली आवश्यक बदल केलेत तर डोळ्याखालील काळी वर्तुळ काही काळानं कमी होतात/ जातात. ;पण जीवनशैली सूधारुनही काहीच फरक पडत नसेल तर मग काहीतरी वेगळं कारण असतं जे आपल्याला तज्ज्ञांच्या मदतीनं शोधावं लागतं आणि त्यानुसार त्यावर उपाय करावे लागतात, असं रती सेठ सांगतात.

 

डोळ्याखाली काळी वर्तुळं का येतात?

1. डोळ्यांखालची काळी वर्तुळं ही जनुकांमुळेही आलेली असतात. जर आपल्या पालकांचे डोळे खोल असतील, पालकांची डोळ्याखालील खाचेची त्वचा ही जर गडद असेल तर मग आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळं असू शकतात. अनूवांशिकता हे यामागील कारण आहे. रती सेठ म्हणतात की केवळ त्वचेचा रंगच नाही तर त्वचेची ठेवण यावरही अनुवांशिकतेचा प्रभाव असतो. ज्यांचे डोळे खोल असतात, त्यांचं भुवईचं हाड हे ठळक असतं. आणि त्याच परिणाम आपल्या चेहेऱ्यावर एक प्रकारची सावली तयार होते. आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसू शकतात.

2. अनेकांना अल्टरड पिग्मेंटशन असतं. म्हणजे बाकी त्वचेचा रंग वेगळा आणि डोळ्याखालील त्वचा ही जास्त गडद असते. त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसतात.

3. आपण वयानं जसं वाढतो तसा आपला चेहेराही वाढतो. आणि चेहेऱ्याखालील स्नायुही. वयानुसार वाढलेल्या अन बदलेल्या आपल्या चेहेऱ्यांच्या स्नायुंमुळेही त्वचेचा रंग गडद होतो.

 

 

4.  डोळ्यांभोवतीची त्वचा ही खूपच पातळ आणि नाजूक असते. अगदी त्वचेखालील रक्तवाहिन्या आणि स्नायुही स्पष्ट दिसतात. रती सेठ सांगतात की त्वचेखालील द्रवामुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. झोपेतून उठल्यावर हे द्रव डोळ्यांखाली साचून राहिल्यानं अनेकांना झोपेतून उठल्यावर डोळे सूजलेले आणि त्याखाली काळी वर्तुळं दिसतात. उठल्यानंतर मग डोळ्याखालील द्रव इतरत्र पसरतो आणि सूज कमी होते. वय जसं वाढतं तसं त्वचेखालील कोलॅजनची निर्मिती कमी होत जाते आणि डोळ्यांभोवतीची त्वचा ही पातळ होते. वयानुसार डोळ्याखाली असलेली पेशींचा थर हा सैल पडतो ज्यामुळे डोळ्याखालील पॅडिंग सारखा भागही सैल पडतो आणि त्यामुळे डोळे खोल होतात. येथील रक्तवाहिन्यांचं कामही मंदावतं आणि वय जसं वाढतं तशी काळी वर्तुळं दिसायला लागतात.

5. सूर्याच्या प्रखर किरणांंमुळेही डोळ्याखालील भाग हा गडद होतो. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेवर वय दिसण्याची प्रक्रिया वेगानं होते. प्रखर सूर्य किरणांशी त्वचापूर्ण ताकदीनं लढते आणि त्यात डोळ्याखालील त्वचेवर काळपटपणा येतो. रती सेठ म्हणतात की यासाठी सुगंध आणि सुग्ंधी तेला विरहित सन प्रोटेक्शन उत्पादनं वापरायला हवीत. त्यांच्या मते सूर्याच्या प्रखर किरणांपासून डोळ्याखालील त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी झिंक, टिटॅनिअम डिऑक्साइड . आर्यन ऑक्साइड हे घटक जे फिजिकल सनब्लॉक म्हणून ओळखले जातात. त्या घटकांनी यूक्त उत्पादन वापरल्यास सूर्यची प्रखर किरणं थेट त्वचेच्या आत शिरत नाहीत. त्यामूळे सूर्याच्या प्रखर किरणांनी त्वचा खराब होण्यापासून बचाव होतो.

6. डोळ्याखालील त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज असते कारण डोळ्याखालील त्वचा ही चेहेऱ्याच्या त्वचेपेक्षा वेगळी असते. त्यामुळे जे क्रीम/ लोशन चेहेऱ्यासाठी वापरतो तेच डोळ्याखालील त्वचेसाठी वापरुन चालत नाही. त्याचाच परिणाम म्हणून मग डोळ्याखालील त्वचा खाजते, तिचा दाह होतो, ती काळी पडते. त्यामुळे आठवड्यातून किमान तीन वेळा खास डोळ्याखालील त्वचेसाठी असलेली उत्पादनं वापरायला हवीत.

डोळ्याखाली काळी वर्तुळं तयार होण्यासाठी ही अशी अनेक कारणं आहेत. आपल्याबाबतीत नेमकं कोणतं कारण आहे हे तज्ज्ञांच्या मदतीनं शोधून त्यावर योग्य उपचार व्हायला हवेत. 

 

उपचार काय आहेत?  

कॉस्मेटिक्स उपाय

  •  
  • डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर दोन प्रकारचे उपचार करता येतात. एकतर सौंदर्य उत्पादनं वापरुन ती तात्पुरती दिसेनाशी करता येतात. यासाठी मेकअप किटमधे असलेलं कन्सिलर वापरता येतं. फक्त हे कन्सिलर कलर करेक्टिंग उत्पादनासोबत वापरावं. पण ते वापरण्यापूर्वी डोळ्याखालील त्वचा ही व्यवस्थित मॉश्चराईज केली आहे ना याची काळजी घ्यायला हवी. जर डोळ्याखालील त्वचा कोरडी असेल आणि त्यावर कन्सिलर लावलं गेलं तर डोळ्याखाली पोपडा दिसतो आणि चेहेरा धुताना तिथे घासलं जाऊन तेथील त्वचा खराब होण्याची शक्यता असते. बाजारात हायपर पिग्मेंटेशन ( गडद त्वचेसाठी) प्रभावी उत्पादनं असतात. अल्फा अर्बूटिन, अ‍ॅझेलेक अ‍ॅसिड, क जीवनसत्वं आणि कोजिक अ‍ॅसिड या घटकांचा समावेश असलेली उत्पादनं वापरण्यावर भर द्यावा. रेटिनॉइड किंवा रेटिनॉल असलेली उत्पादनं जर दीर्घकाळ वापरली तर ती त्वचेच्या एजिंग प्रक्रियेविरुध्द लढतात शिवाय त्वचेची जाडी व्यवस्थित राहाते. पण हे उप्तादनं वापरताना विशेष काळजी घ्यायला हवी. शिवाय कॅफेन घटक असलेली उप्तादनं डोळ्याभोवतीच्या रक्तवाहिन्या तात्पुरत्या पूसट करतात. त्यामुळे डोळ्यांभोवतीचा भाग हा उजळ दिसतो. डोळ्यांखालची सूज कमी होते. पण म्हणून घरातली कॉफी पावडर चेहेऱ्यासाठीही चुकूनही वापरु नका असा सल्ला रती सेठ देतात. ही उत्पादनं आठवड्यातून केवळ तीन वेळा वापरावीत. हे घटक असलेले फेस सीरम वापरण्याचा तूमचा विचार असेल तर ती अतीतीव्र असल्यानं त्याचा वापर विचारपूर्वक किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा असं रती सेठ आवर्जून सांगतात.

   प्रकियात्मक उपाय

 डोळ्याखाली काळ्या वर्तुळांवर जर गांभीर्यानं आणि परिणामकारक उपचार करायचे असतील तर व्यावसायिक क्लिनिकमधे उपलब्ध असलेले प्रोसिजरल अर्थात प्रक्रियात्मक उपाय करायला हवेत. हे उपचार करताना थोडे पैसे अधिक लागतात पण त्याचे अपेक्षित परिणामही दिसतात. क्लिनिकल प्रक्रियांमधे लेझर आणि लाईट थेरपी असतात. डोळ्याखालील त्वचेवर उपचार करण्यास या थेरेपी प्रभावी मानल्या जातात. फिलरसारख्या थेरेपी शरीराच्या इतर भागातून थोडा भाग घेऊन तो डोळ्याखाली पॅडिंग म्हणून वापरण्यासाठी इंजेक्शनच्या द्वारे डोळ्याखाली भरतात.

  •  ब्लेफारोप्लास्टी ही डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर काम करणारी सर्वात आक्रमक प्रक्रिया आहे. जी डोळ्याखालील फुगीर पिशवी स्वरुप थर काढून टाकून ही काळी वर्तुळं नाहीशी करते. अनेक तज्ज्ञ हलक्या स्वरुपाची सोलण्याची प्रक्रिया करुन डोळ्याखालील खराब झालेली त्वचा काढून टाकतात. रती सेठ म्हणतात की हे असे उपचार करताना माहितीतल्या आणि ज्यांची या उपचारांसाठीच खास ओळख आहे त्यांच्याकडून हे उपचार करावेत.