सर्वांची लाडकी धकधक गर्ल इतकी सुंदर दिसते की तिला पाहतच राहावेसे वाटते. आजही अनेकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या माधुरी दीक्षितचे सौंदर्य तरुणांना नाही तर मुलींनाही वेड लावणारे आहे. तिच्या सौंदर्यात भर घालणारी गोष्ट म्हणजे तिची कातिल स्माइल. तिच्या निसर्गदत्त सौंदर्याबरोबरच मेकअप हाही अभिनेत्रींच्या सौंदर्याचा एक अविभाज्य भाग असतो. आता चित्रपटात किंवा एखाद्या शोमध्ये येण्यासाठी केलेला मेकअप वेगळा. पण नियमितपणे माधुरी काय आणि कसा मेकअप करते हे जाणून घेणे तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरु शकते. त्यातही विशेष म्हणजे ही गोष्ट खुद्द माधुरीनेच सांगितलेली असेल तर? आपले डेली मेकअपचे रुटीन काय आहे याबाबत माधुरी तिच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधते. पाहूया ती आपल्याला मेकअपच्या काय टिप्स देते....
१. सुरूवातीला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा. त्यामुळे संपूर्ण मेकअप चेहऱ्यावर अतिशय उत्तम रितीने बसतो. हे लावताना खालच्या बाजुने वरच्या बाजुला हात फिरवा.
२. यानंतर डोळ्यांच्या खालच्या भागाला क्रीम लावा, यासा अंडर आय क्रीम असे म्हणतात. डार्क सर्कल किंवा व्यवस्थित झोप न झाल्याने काहीसा फुगलेला भाग, लहान पुटकुळ्या या सगळ्या गोष्टी झाकण्यास या क्रीमची मदत होते. हे क्रीम हलक्या हाताने हळूहळू टॅप करत दोन्ही डोळ्यांच्या खाली एकसारखे लावा.
३. यानंतर कन्सिलर लावा. हा कन्सिलर डोळ्याच्या खालच्या भागापासून लावायला सुरुवात करा. हे लावताना सगळीकडे एकसारखे लागेल असे पाहा. तसेच कमीत कमी मेकअप करणे केव्हाही चांगले कारण एकदा लावलेली गोष्ट काढता येत नाही. तसेच कमी मेकअपमध्ये तुम्ही नक्कीच जास्त चांगले दिसता असेही माधुरी सांगते.
४. यानंतर यावर थोडीशी पावडर लावा. ही कॉम्पॅक्ट असेल किंवा साधी पावडर असेल तरी चालेल. अतिशय कमी लावा नाहीतर त्वचा कोरडी वाटू शकते.
५. हे झाल्यानंतर डोळ्यांचा मेकअप सर्वात महत्त्वाचा असतो. भुवया ब्रशने एकसारख्या करा आणि त्या फिकट असतील तर थोड्या डार्क करा.
६. डोळ्यांना नियमित वापरासाठी चांगला दिसेल असा लाइट ब्राउन आय शॅडो लावा. हे लावताना ब्रश एकसारखा फिरेल याकडे लक्ष द्या. यामध्ये मॅट आय शॅडो वापरा म्हणजे ते खूप मेकअप केला आहे असे वाटणार नाही.
७. त्यानंतर आय लायनर लावा. आय शॅडो ज्या रंगाचा असेल त्याच रंगाचे लायनर शक्यतो लावा. रोजच्या मेकअपसाठी एकसारखे रंग चांगले दिसतात. आय लायनर लावल्यानंतर ते ब्रशने आयशॅडोमध्ये स्मज करा जेणेकरुन त्याची एक लाइन अशी दिसणार नाही.
८. डोळ्याच्या वरच्या बाजुला ज्याप्रमाणे आयलायनर लावले, त्याचप्रमाणे अतिशय हलक्या हाताने डोळ्याच्या खालच्या बाजुलाही एक लाइन काढून घ्या. हे दोन्ही रंग सारखेच असूद्या. ही लाइन जाड न लावता अतिशय बारीक लावा, त्यामुळे मेकअप केला आहे असे वाटणार नाही.
९. लिपस्टीक लावताना आधी लिप लायनर आपल्या ओठांच्या आकारातच लावून घ्या. हा लायनर लावताना तो लाइनलाच लागेल याची काळजी घ्यायला हवी. हाच लायनर हलक्या हाताने ओठांनाही थोडा लावा.
१०. त्याच रंगाच्या जवळ जाणारी लिपस्टीक शेड निवडा आणि ती ओठांना लावा. लिपस्टीक खूप गडद नको, कारण रोजच्या मेकअपसाठी जास्त लिपस्टीक लावलेली चांगली दिसत नाही.