Join us  

साबण किंवा फेसवॉश न वापरताही चेहरा दिसेल नितळ स्वच्छ, पाहा २ स्टेप्स - दिसेल बदल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 7:14 PM

How Do You Clean Your Face Without Using Facewash & Soap : कोणत्याही प्रकारचा साबण, फेसवॉश न वापरता सुद्धा आपण आपला चेहरा निरोगी ठेवू शकतो.

आपल्या चेहेऱ्याची स्किन ही आपल्या शरीराच्या स्किनपेक्षा पाच पटींनी नाजूक असते. म्हणून आपण आपल्या चेहऱ्यावरील स्किनची भरपूर काळजी घेतो. चेहेरा स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑरगॅनिक व केमिकल फ्री फेसवॉश, साबण वापरत असतो. इतकेच नव्हे तर स्किनची काळजी घेण्यासाठी आपण महागड्या ट्रिटमेंट्स करतो. त्याचबरोबर महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतो. शरीरावरील त्वचेच्या सौंदर्याबरोबरच चेहऱ्याच्या त्वचेचे सौंदर्य जपणे देखील महत्वाचे आहे. आपला चेहरा निकोप, तजेलदार,डाग विरहित, चमकदार व तरुण रहावा याकरता अनेक प्रयोग व उपाय योजना केल्या जातात.नैसर्गिक पदार्थ जसे हळद,मुलतानी माती, चंदन, बेसन हे पदार्थ फार प्राचीन काळापासुन स्किनचे सौंदर्य वाढविण्याकरिता वापरले जातात. मात्र धावत्या युगात वेळेचा अभाव व सगळे आयतेच हातात पाहिजे ही वृत्ती असल्याने आपल्याकडे स्किनचे आरोग्य राखण्यासाठी फारसा वेळ नसतो. चेहऱ्याचे सौंदर्य जपण्याकरिता  आपण अनेक उपाय घरच्या घरी करतो. कोणत्याही प्रकारचा साबण, फेसवॉश न वापरता सुद्धा आपण आपला चेहरा निरोगी ठेवू शकतो(How Do You Clean Your Face Without Using Facewash & Soap).

नक्की कोणत्या आहेत त्या २ स्टेप्स  ? 

१. हातांच्या तळव्यांचे घर्षण - आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर ठेवून त्यांचे घर्षण करा. किमान ४ ते ५ मिनिटे घर्षण करा. असे केल्याने तुमच्या हातांच्या तळव्यांमध्ये एक प्रकारची उष्णता तयार होईल. आता या घर्षणामुळे तयार झालेल्या उष्णतेने आपले हातांचे तळवे गरम होतील हे तळवे असेच ५ ते ६ वेळा आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. चेहऱ्यावरील प्रत्येक कानाकोपऱ्यात, मानेवरून सगळ्या बाजूंनी हे तळवे फिरवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील नसांमधील  रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच घर्षणामुळे निर्माण झालेली उष्णता चेहऱ्यावर लागल्यामुळे उष्णतेने शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्यास मदत होईल. जोपर्यंत चेहेऱ्यावरील प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत ही उष्णता पोहोचत नाही तोपर्यंत पुढचे ५ ते ६ मिनिटे हीच कृती करत राहा. 

२. पाण्याचे हबके मारा - वरील कृती करून झाल्यानंतर आपल्या दोन्ही गालांमध्ये हवा भरून ते फुगवून घ्या. याच गाल फुगविलेल्या स्थितीत असताना दोन्ही हातांना जोडून त्यांची ओंजळ बनवून त्यात पाणी घ्या. या पाण्याचा हबका हळुहळु आपल्या चेहऱ्यावर मारा. असे किमान ५ ते ६ वेळा आपल्या चेहेऱ्यावर पाण्याचे हबके मारा. लक्षात ठेवा पाण्याचे हबके मारताना गाल फुगविलेल्या स्थितीतच ठेवा.   

smriti.yoga या इंस्टाग्राम पेजवरून कुठल्याही साबण किंवा फेसवॉशचा वापर न करता देखील आपण आपल्या चेहऱ्याचे आरोग्य कसे राखू शकतो याबद्दल समजून घेऊयात.   

अशाप्रकारे चेहेरा स्वच्छ केल्याने कोणते फायदे होतात? 

१. ओपन पोर्सची समस्या दूर - आपल्या चेहेऱ्याच्या त्वचेवर सूक्ष्म रंध्रं (Pores) असतात. ज्याद्वारे त्वचा श्वास घेत असते. कालांतराने  वय वाढते तशी ही रंध्रं मोठी होतात आणि चेहेऱ्यावर खड्डे पडल्यासारखं (Open Pores) दिसतं. या समस्येला ओपन पोर्सची समस्या असं म्हटलं जातं. वरील उपाय केल्याने आपली ओपन पोर्सची समस्या दूर होईल.  

२. पिंपल्स कमी होण्यास मदत - वाढत्या वयोमानानुसार काही मुला-मुलींच्या चेहऱ्यावर मुरुम, बारीक पुरळ येतात. ही समस्या शरीरातील हार्मोनमधील बदलामुळेही उद्भवते. पण बऱ्याचदा चुकीच्या सवयींमुळेही पुरळ, मुरुमांचा सामना करावा लागतो. हा उपाय केल्याने चेहेऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होते. 

३. चेहरा दिसेल फ्रेश - जेव्हा आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत असतो तेव्हा आपली स्किन व्यवस्थित श्वास घेऊ शकते. चेहऱ्यावरील स्किनचा रक्तप्रवाह सुरळीत झाल्याने चेहरा फ्रेश आणि ताजातवाना दिसेल. 

४. चेहऱ्यावरील सुरकुत्या व वृद्धत्वाच्या खुणा - वृद्धत्वाचा प्रभाव एका वयानंतरच आपल्या स्किनवर दिसून येतो. पण काही वेळा वयाच्या आधीच आपल्या त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. अशा परिस्थितीत सुरुवातीलाच स्किनकडे लक्ष दिल्यास वृद्धत्व कमी करता येते.फाइन लाइन आणि सुरकुत्या हे वृद्धत्वाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहेत. फाइन लाइन आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय तुम्ही वापरात आणू शकता. 

५. चेहेऱ्यावर पाण्याचे हबके मारणे - चेहेऱ्यावर पाण्याचे हबके मारल्याने तुमच्या शरीरातील सगळा ताण, टेंशन निघून जाऊन तुम्हांला ताजेतवाने आणि फ्रेश वाटेल. चेहेऱ्यावर पाण्याचे हबके मारल्याने पाण्यामुळे थकवा कमी होतो, स्किनवर चमक येते, स्किन तरुण राहते, सूज आली असल्यांस कमी होते असे फायदे होतात.

टॅग्स :त्वचेची काळजी