Join us  

फेस रेजर म्हणजे काय? चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी ते वापरावं का? विसरु नका ५ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2023 5:59 PM

Everything To Know About Face Razor & How To Do It : फेस रेजर पहिल्यांदाच वापरताय,काही गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा

आपल्या शरीराच्या प्रत्येक भागांवर अनेक लहान मोठे केस असतात. काहींच्या शरीरांवर कमी केस असतात तर काहींच्या जास्त असतात. शरीरावर केस कितीही कमी असले तरी प्रत्येक महिन्याला चांगले दिसण्यासाठी आपल्याला वॅक्सिंग हे करावेच लागते. वॅक्स करणे हे कितीही फायद्याचे असले तरी काहींना वॅक्स केल्यामुळे त्वचेसंदर्भात अनेक त्रास होतात. त्वचेवर पुरळ येणे, त्वचा लाल होणे, जळजळ होणे असे अनेक त्रास उद्भवू लागतात. त्यामुळेच वॅक्सला कंटाळून अनेकजण त्वचेवरील केस काढण्यासाठी रेजरचा उपयोग करतात. 

चेहऱ्यावरील अनावश्यक लहान केस काढण्यासाठी आपण फेस रेजरचा वापर करतो. आपण फेस रेजरचा वापर करत असलो तरीही काहीवेळा आपल्याला ते योग्य पद्धतीने कसे वापरायचे हे माहित नसते. चुकीच्या पद्धतीने फेस रेजरचा वापर केल्यास त्वचेला हानी पोहोचू शकते. यासाठी फेस रेजरचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा, फेस रेजरची निवड करतांना कोणती काळजी घ्यावी, फेस रेजर म्हणजे नेमकं काय अशा सगळ्या गोष्टी समजून घेऊयात(Everything To Know About Face Razor & How To Do It). 

फेस रेजर म्हणजे काय ? 

फेस रेजर हे विशेषतः चेहऱ्यावरील त्वचेचे केस काढण्यासाठी डिझाइन केलेले एक महत्वाचे ब्यूटी टूल आहे. फेस रेजरचा उपयोग हा चेहऱ्यावरील म्हणजेच अप्परलीप्स, गालावरील आणि कपाळावरील केस काढण्यासाठी उपयोग होऊ शकतो. याशिवाय हनुवटीवरील केस काढण्यासही याची मदत मिळते.  जर आपण चेहऱ्यावरील केस रेजरने काढायचा विचार करत असाल तर हल्ली चेहऱ्यासाठीही खास रेजर मिळते. कारण पुरुषांप्रमाणे महिलांची त्वचा नसते. त्यावरील केस कितीही जाड असले तरी देखील त्वचा ही नाजूक असते. चेहऱ्यावर वॅक्स करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. यासाठीच बऱ्याच महिला आजकल चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी फेस रेजरचा वापर करतात.

 

फेस रेजरची निवड करतांना कोणती काळजी घ्यावी... 

१. फेस रेजर हा नेहमी बारीक असायला हवा. कारण शरीराच्या इतर भागाच्या तुलनेत आपला चेहरा लहान असतो. त्यावर असलेले बारीक बारीक केस काढण्यासाठी त्याचा ब्लेडही बारीकच हवा. त्यामुळे चेहृयावरील लहान लहान केस नीट काढण्यासाठी फेस रेझर नेहमी बारीकच असायला हवा. 

२. काही रेजर हे फारच धारदार असतात. ज्यामुळे आपल्या चेहऱ्याला जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे रेजरचे ब्लेड हे खडबडीत असायला हवे. त्यामुळे आपल्याला दाढीच्या रेजरसारख्या दुखापती होणार नाहीत. 

३. फेस रेजर निवडताना त्याचा वापर किती वेळा करता येईल ते देखील तपासा. कारण काही रेजर हे फक्त एकाच वापरासाठी असतात. त्याचा पुन्हा पुन्हा  वापर करुन बचत करणे त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते. त्यामुळे रेजर घेताना ही गोष्ट ही लक्षात घ्या. 

४. फेस रेजर निवडताना त्याच्या किंमतीवरुन त्याची निवड करायला जाऊ नका. कारण अनेकांना किंमत जास्त तो रेजर चांगला असे वाटते. पण तसे करण्यापेक्षा आपण ऑनलाईन एखाद्या प्रोडक्टचा रिव्ह्यू वाचून मगच त्याची निवड करावी. 

फेस रेजरचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी... 

१. फेस रेजरचा वापर करण्यापूर्वी, आपण ते व्यवस्थित धुवून घ्यावे. फेस रेजर स्वच्छ करण्यासाठी अँटी सेप्टिक लिक्विड वापरा. असे केल्याने आपल्या  चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही.

२. रेजर वापरल्यानंतरही तो धुण्यास विसरू नका, कारण अस्वच्छ रेजर त्वचेवर मुरुमांची समस्या निर्माण करू शकतो. म्हणूनच प्रत्येक वापरानंतर रेजर धुणे आवश्यक आहे.

३. जर आपण पहिल्यांदाच फेस रेजर वापरत असाल तर पहिल्यांदा चेहऱ्याऐवजी शरीराच्या इतर भागावर वापरून पहावे. असे केल्याने आपल्याला फेस रेजर कसे वापरावे याचे तंत्र व पद्धत लक्षात येईल. यामुळे फेस रेजरचा वापर करणे आपल्यासाठी सोपे होईल. 

४. फेस रेजरचे ब्लेड धारदार असावे. ब्लेडला योग्य प्रमाणांत धार नसल्यास आपल्या त्वचेवर जळजळ होऊ शकते. तसेच त्वचेसंबंधित इतर समस्यादेखील उद्भवू शकतात. खराब ब्लेडमुळे केसांच्या वाढीमध्येही समस्या निर्माण होतात.

५. त्वचेवर रेजर वापरल्यानंतर त्वचेला मॉइश्चराईज करायला विसरू नका. असे न केल्यास आपली त्वचा खराब होऊ शकते. 

फेस रेजर वापरण्याची योग्य पद्धत... 

१. चेहरा स्वच्छ धुवून घ्या. चेहऱ्यावरील अतिरिक्त पाणी काढून चेहरा थोडा ओलाच ठेवा. 

२. केसांच्या दिशेने रेजर फिरवून खाली आणा. गरज असल्यास पुन्हा रेजरचा वापर करा. एखादा केस राहिला म्हणून सतत रेजरचा वापर करणे टाळा. त्यामुळे चेहरा लाल होऊ शकतो. शिवाय तुमच चेहऱ्याची त्वचा कोरडी होऊन ती त्रासदायकही ठरु शकते.

३. केस काढून झाल्यानंतर चेहऱ्यावर गुलाबपाणी किंवा ऍलोवेरा जेल लावावे. यासोबतच चेहेऱ्यावर मॉइश्चराईजर लावण्यास विसरु नका. असे केल्याने  चेहऱ्याची जळजळ कमी होईल.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स