Join us  

काखेत खूप घाम येऊन कपडे ओले होतात? ४ उपाय, काखेतला घाम आणि दुर्गंधी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 4:19 PM

जास्त घाम येणाऱ्या व्यक्तींसाठी आम्ही आज काही युक्त्या सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला घाम आला तरी तो इतका दिसून येणार नाही आणि त्याचा दुर्गंधही येणार नाही.

ठळक मुद्दे दररोज एक ते दोन ग्लास टोमॅटोचा रस घेतल्याने घाम कमी येतो. यातील अँटीऑक्सीडेंट असून हे त्वचेवरील छिद्रांना आकुंचित करते. काखेत जास्त घाम येत असल्यास त्याठिकाणी बेकींग सोडा टाकावा.

उन्हाळ्याच्या दिवसांत घाम येणं हे अगदीच स्वाभाविक आहे. हवामानातील उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचा अंश एकप्रकारे बाहेर पडतो. अनेकांना उन्हाळ्याचा किंवा घामाचा इतका जास्त त्रास होतो की कितीही वेळा चेहरा पुसला तरी चेहऱ्यावरुन घामाचे ओघळ वाहत असतात. इतकेच नाही तर उन्हात गेल्यावर या लोकांचे कपडे ओले होतात. घाम येण्याच्या साधारण जागा म्हणजे मान, काख, चेहरा आणि जांघेत. पण उन्हाचा तडाखा जास्त असेल तर आपल्या संपूर्ण शरीरालाच घाम घाम होतो. काखेत घाम येण्याची समस्या स्त्री-पुरुष दोघांमध्येही सारख्य़ाच प्रमाणात असते. काखेत घाम आला की त्याचा एकप्रकारचा वास येतो. इतकेच नाही तर अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसांत आपण धावत ऑफीसला किंवा एखाद्या कार्यक्रमाला पोहोचलो तर आपल्या काखेच्या बाजुने आपले कपडे ओले झालेले दिसतात. अशावेळी आपल्याला सगळ्यांसमोर ओशाळल्यासारखे होऊ शकते. पण असे होऊ नये म्हणून जास्त घाम येणाऱ्या व्यक्तींसाठी आम्ही आज काही युक्त्या सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला घाम आला तरी तो इतका दिसून येणार नाही आणि त्याचा दुर्गंधही येणार नाही. 

(Image : Google)

१. स्वेट पॅडस

बाजारात ज्याप्रमाणे सॅनिटरी पॅडस मिळतात त्याचप्रमाणे हे स्वेट पॅडस मिळतात. यांची किंमतही फार नसते. त्यामुळे तुम्हाला खूपच घाम येत असेल तर तुम्ही हे पॅडस नक्की लावू शकता. घाम शोषून घेण्यासाठी हे पॅड अतिशय उत्तम पर्याय ठरु शकतात. कपड्याच्या आतल्या बाजूला फुलपाखराच्या आकाराचे हे पॅड चिकटवल्यास त्यामध्ये घाम शोषला जातो आणि घामाचा वास येणे, डाग पडणे असे काहीही होत नाही. 

२. नियमित व्हॅक्सिंग करणे 

अनेकदा आपल्याला केस असलेल्या ठिकाणी जास्त घाम येतो. म्हणजे डोक्यात, काखेत आणि जांघेत घाम येण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपण उन्हाळ्यात जास्त घामघाम होऊ नये त्यासाठी डोक्यावरचे केस कापतो किंवा वरच्या बाजूला बांधून ठेवतो. त्याचप्रमाणे काखेत केस जास्त असल्याने त्याठिकाणी घाम येतो. अशावेळी उन्हाळ्याच्या दिवसांत या भागाचे नियमित व्हॅक्सिंग करणे आवश्यक असते. म्हणजे घामाचे प्रमाण आटोक्यात येऊ शकते. 

३. बेकींग सोडा 

आपण ज्याप्रमाणे घाम येऊ नये म्हणून पावडर लावतो त्याचप्रमाणे बेकींग सोड्याचा उपयोग होतो. काखेत जास्त घाम येत असल्यास त्याठिकाणी बेकींग सोडा टाकावा. काही वेळाने हा सोडा झटकून टाकावा आणि कपडे घालावेत. यामुळे घामाचे प्रमाण आटोक्यात येते. याशिवाय बेकींग सोडा आणि पाणी किंवा बेकींग सोडा आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण ठराविक वेळाने परफ्यूमसारखे काखेत मारल्यास घामाचे प्रमाण आणि वास कमी होण्यास मदत होते. बेकींग सोडा स्वयंपाकाबरोबरच सौंदर्याच्या अनेक गोष्टीत अतिशय फायदेशीर ठरतो. 

(Image : Google)

४. आहार

उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या आहारात पाणी , फळांचा रस, नारळ पाणी, लिंबू-पाणी आणि हर्बल टी सुद्धा घ्या. यामुळे पाण्याची पातळी चांगली राहण्यास मदत होते. याबरोबरच हिरव्या भाज्या, बटाटे, केळी, सफरचंद यामध्ये मॅग्नेशियम असल्याने त्याचे सेवन करावे. दररोज एक ते दोन ग्लास टोमॅटोचा रस घेतल्याने घाम कमी येतो. यातील अँटीऑक्सीडेंट असून हे त्वचेवरील छिद्रांना आकुंचित करते. यामुळे शरीराला थंडावा सुद्धा मिळतो. दररोज द्राक्ष खावीत, यामुळे जास्त घाम येण्याची समस्या दूर होऊ शकते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स