आपली त्वचा नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट होत असते. म्हणजे जुनी त्वचा जाऊन नवीन त्वचेची निर्मिती होणे. जी आपल्याला दिसत नाही. पण जाणवते. आपण तरुण असतो तोपर्यंत ही क्रिया नैसर्गिकपणे होत असते. पण वय जसं वाढत जातं तशी ही क्रिया मंदावते. ही क्रिया जशी मंदावते तशी त्वचा खराब होते. कोरडी पडते . मृत पेशी त्वचेवर साठून राहातात आणि त्वचा निर्जीव दिसायला लागते. एक्सफोलिएशन म्हणजे त्वचेवरच्या मृत पेशी निघून जाणे. ही क्रिया शरीरात नैसर्गिकपणे घडते. पण ती जेव्हा वयानुसार मंदावते तेव्हा तिला बाहेरुन बळ द्यावं लागतं. एक्सफोलिएशनमूळे त्वचेवरच्या मृत पेशी जाऊन नवीन त्वचा येते. जी तरुण दिसते. वय वाढत असलं तरी तरुण दिसायचं असेल तर म्हणूनच एक्सफोलिएशन ही क्रिया आवश्यक आहे. या क्रियेने त्वचा तरुणच दिसते असं नाही तर ती मऊ आणि चमकदारही होते. त्वचेचा वर्णही सुधारतो.
त्वचेसाठी एक्सफोलिएशन ही क्रिया आवश्यक आहे हे खरं आहे. पण किती? याबाबत मात्र गोंधळ असल्यामुळे अति एक्सफोलिएट होऊन त्वचा खराब होते. त्वचेवरचं संरक्षक घटक या अति एक्सफोलिएशन क्रियेनं निघून जातात आणि मग पर्यावरणातील विषारी घटकांचा त्वचेवर परिणाम व्हायला लागतो. त्यामुळे एक्सफोलिएशन हे मर्यादित प्रमाणात व्हायला हवं. या क्रियेचा फायदा त्वचेच्या नैसर्गिक पेशींच्या यउलाढालीस व्हायला हवा आणि त्वचा छान ओलसर आणि चमकदार राहायला हवी. अति एक्सफोलिएशन झाल्यास त्वचा खराब आणि कोरडी होते. इतकंच नव्हे तर जखमाही होतात.
आज एक्सफोलिएशन केलं तर उद्या लगेच करण्याची किंवा रोज करण्याची गरज नसते. त्याने त्वचेचा फायदा होण्याऐवजी नूकसानच होतं. सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात की एक्सफोलिएशन ही क्रिया नैसर्गिक घटकांच्या मदतीनं केल्यास त्वचेला आवश्यक पोषक घटकही मिळतात.
नैसर्गिक आणि घरगुती एक्सफोलिएटर कोणते?
- मध:- मधाच्या वापरानं नैसर्गिक एक्सफोलिएशन प्रक्रियेला चालना मिळते. मधात आर्द्रता असते त्यामुळे त्वचेवर ओलावा टिकून राहातो. मधाचा एक्सफोलिएटर म्हणून वापर करताना हातावर मध घ्यावं आणि ते चेहेऱ्यावर हलक्या हातानं मसाज करत घासावं. थोड्या वेळानं गरम पाण्यानं चेहेरा धुवावा.
- दही- दह्यामधे लॅक्टिक अॅसिड असतं. त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमधे अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड असतं. लॅक्टिक अॅसिडचे गूणधर्मही तसेच असतात. दह्यामूळे त्वचा मऊ होते, त्वचा उजळते. एक्सफोलिएटर म्हणून दही वापरताना केवळ दह्याचीच गरज असते. त्यात इतर काहीही घालू नये. केवळ दही लावावं. चेहेऱ्याला दही लावून ते २० मिनिटं ठेवावं. आणि मग पाण्यानं चेहेरा धुवावा.
- साखर- ऊसात ग्लायगोलिक अॅसिड असतं. हे अॅसिड म्हणजे त्वचेत नवीन पेशींच्या निर्मितीला चालना देणारे, त्वचा मऊ, मुलायम करणारे अल्फा हायड्रॉक्सीसारखं काम करतं. एक्सफोलिएटर म्हणूअन साखर वापरताना अर्धा कप साखर किंवा ब्राऊन शुगर घ्यावी. त्यात ऑलिव्ह तेल घालावं. साखर पूर्ण विरघळली की ती पेस्ट चेहेऱ्यावर गोलाकार मसाज करत लावावी. दहा मिनिटांनी चेहेरा गरम पाण्यानं धुवावा.
- लिंबू- लिंबामधेही अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड असतं. ते चेहेऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकतं. एक पाव कप लिंबाचा रस घ्यावा, त्यात सफरचंदाचा रस, द्राक्ष रस , साखर घालावी. हे सर्व नीट एकत्र करावं. यातली साखर विरघळायला हवी. कापसाच्या बोळ्यानं हे मिश्रण चेहेऱ्यास लावावं. दहा मिनिटांनी चेहेरा स्वच्छ धुवावा.
-पपई-
पपईमधे पापेन नावाचं विकर असतं जे मृत त्वचा काढून टाकतं. त्वचेवरील डाग,सुरकुत्या या समस्याही पपईच्या वापरानं निघून जातात. पापेन हा घटक कोवळ्या पपईत जास्त असतो . म्हणून हिरवी, थोडी कच्च्या स्वरुपातील पपई घ्यावी. पपईच्या गराची मऊ पेस्ट करावी. आणि ती चेहेऱ्यावर लावावी. पंधरा मिनिटांनी चेहेरा गरम पाण्यानं धुवावा.