मेकअप करताना आपण सगळ्यात आधी डोळे आणि ओठांना सजवतो. आपले डोळे उठावजार आणि देखणे दिसले तर आपल्या सौंदर्यात नक्कीच भर पडते. डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी आपण काजळ, आय लायनर, आयशॅडो, मस्कारा या किमान गोष्टी वापरतो. पण प्रत्येकाच्या डोळ्यांची ठेवण, आपल्याला सूट होणाऱ्या गोष्टी आणि आपण कोणत्या ठिकाणी जात आहोत हे लक्षात घेणे गरजेचे असते. आपले डोळे बोलतात आणि त्याकडे सगळ्यात आधी लक्ष जात असल्याने ते चांगले दिसणेही आवश्यक असते. त्यामुळे डोळ्यांचा मेकअप करताना तो खूप गडद असू नये पण तरी ते उठून दिसायला हवेत यासाठी काही किमान गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. पाहूयात डोळ्यांचा मेकअप करताना लक्षात ठेवायला हव्यात अशा ४ गोष्टी (Eye Make up Tips)...
१. काजळ
काजळ लावल्यानंतर बरेचदा ते पसरतं. अशावेळी काजळ लावण्याआधी त्याच्या खाली न विसरता पावडर लावा. अन्यथा काजळ लावल्यानंतर त्याखाली आय लायनरची एक बारीक रेघ काढा. त्यामुळे काजळ पसरुन चेहरा काही वेळाने काळा होणार नाही.
२. आय लायनर
तुमच्या पापण्यांचा भाग मोठा असेल आणि तुम्हाला एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला जायचं असेल तर आवर्जून आय लायनर लावा. त्यामुळे तुमचे डोळे टपोरे दिसण्यास मदत होईल. हल्ली बाजारात वेगवेगळ्या रंगाचेही लायनर्स उपलब्ध आहेत आणि ते छानही दिसतात तेव्हा असे लायनरही तुम्ही नक्की ट्राय करु शकता.
३. मस्कारा
अनेक जणांच्या पापण्या फिकट आणि आकाराने लहान असतात त्यामुळे डोळे कितीही टपोरे असतील तरी ते उठून दिसत नाहीत. अशावेळी मस्कारा वापरणे फायदेशीर ठरते. मस्काऱ्यामुळे पापण्या उठून दिसण्यास मदत होते. याशिवाय एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला जायचे असेल तर आर्टीफिशियल आय लॅशेशचाही उपयोग आपण करु शकतो.
४. आय शॅडो आणि शिमर
आय शॅडोमुळे डोळ्यांना छान हटके लूक येण्यास मदत होते. आपले कपडे, दागिने यांनुसार आपण आय शॅडोचा रंग निवडायला हवा. शिमर आणि आय शॅडो लावला तर डोळे आहेत त्यापेक्षा छान उठावदार आणि देखणे दिसतात. त्यामुळे चांगल्या प्रतीचे शिमर आणि परफेक्ट आय शॅडो आपल्या सौंदर्यात भरच घालते.