असं म्हणतात की चेहरा जे सांगत नाही, ते आपले डोळे सांगून जातात. यातही एका स्त्रीचे डोळे तर अधिकच बोलके, अधिकच सजग असतात. म्हणूनच चेहऱ्यावर कितीही मेकअप चढविला, कितीही आकर्षक हेअरस्टाईल केली, तरी जोपर्यंत डोळ्यांचा मेकअप होत नाही, तोपर्यंत तो मेकअप परिपूर्ण असणार नाही. तसेच बोल्ड लूक मिळविण्यासाठी केवळ कपडे आणि हेअरस्टाईल यांच्यावरच फोकस करून चालणार नाही. त्यासाठी डोळ्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
डोळ्यांना बोल्ड लूक देण्यासाठी वेगळी सौंदर्य प्रसाधने वापरावी लागतील, असे मुळीच नाही. तुम्ही नॉर्मल ऑफीसला जाण्यासाठी किंवा छोटेखानी पार्टीसाठी तयार होताना डोळ्यांच्या मेकअपसाठी जी सौंदर्य प्रसाधने वापरता, त्याचाच वापर थोडा वेगळ्या पद्धतीने करून तुम्ही तुमच्या डोळ्यांना अतिशय वेगळा लूक देऊ शकता.
डोळ्यांचा मेकअप करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेकअपसाठी वापरण्यात येणारी सौंदर्य प्रसाधने ही उत्तम प्रतीची असायला हवी. बऱ्याचदा मेकअप केला की पुढच्या एक दोन तासात डोळ्यांचे काजळ पसरू लागते किंवा घाम आल्यावर आय लायनरही निघून जाऊ लागते. पार्टी अगदी रंगात येताच जर डोळ्यांच्या मेकअपची अशी अवस्था झाली तर सगळाच रंगाचा बेरंग होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांच्या मेकअपसाठी लागणारी सौंदर्य प्रसाधने दर्जेदारच घ्या.
- डोळे आकाराने लहान असतील तर काजळ आणि आय लायनर पापण्यांना अगदीच चिटकून लावू नका. थोडा गॅप ठेवून जर आयलायनर आणि काजळ लावले तर तुमचे डोळे अधिक भरीव आणि टपोरे दिसू शकतात.
- आय लायनर लावताना डोळ्यांच्या शेवटच्या कडांसोबत ते खाली न आणता थोडे वरच्या बाजूने वळवावे. तसेच काजळ लावून ते देखील डोळ्यांच्या शेवटच्या टोकाकडून वर उचलावे. या दोन्ही रेषा एकमेकांना जोडल्यावर जरा थिक पद्धतीने केलेला मेकअप हटके लूक देतो.
- शिमरी फिनिशिंग आयशॅडो लावण्याचा ट्रेण्ड सध्या इन आहे. त्यामुळे असा मेकअप ट्राय करायलाही हरकत नाही.
- कुल टोन असणारी पिंक लिपस्टीक आणि वार्म लूम देणारे आयशॅडो शिवाय काजळाखाली गोल्डन किंवा सिल्व्हर अशा चमकदार रंगाने केलेले अंडरटोन वापरूनही अतिशय बोल्ड लूक दिला जातो.