डोक्यावरचे केस गळतात म्हणून आपण अनेकदा हैराण असतो. मग त्यासाठी पार्लरमधले किंवा घरगुती वेगवेगळे उपाय करतो. काही वेळा या उपायांचा फायदा होतो आणि केस गळती थांबते. डोक्यावरच्या केसांप्रमाणेच आपले भुवया आणि पापण्यांचे केसही गळतात. पापण्या आणि भुवया दाट असतील तर आपल्या डोळ्यांच्या आणि पर्यायाने आपल्या सौंदर्यात भर पडते. पण याठिकाणचे केस काही ना काही कारणांनी गळत असतील तर आपल्याला आयब्रो पेन्सिल, कृत्रिम आयलॅशेस लावून आपले सौंदर्य वाढवावे लागते. मात्र नैसर्गिकरित्याच भुवया आणि पापण्यांचे केस दाट आणि चांगले असतील तर असे काही करावे लागत नाही. तसेच यासाठी बाजारात मिळणारी रासायनिक उत्पादने वापरण्यापेक्षा घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी हे केस चांगले ठेवता येऊ शकतात.
कोरफड ही सौंदर्यातील अनेक उत्पादनांमध्ये आवर्जून वापरला जाणारा घटक आहे. इतर गोष्टींप्रमाणेच कोरफडीचा या समस्येसाठीही चांगला उपयोग होत असल्याचे प्रसिद्ध ब्युटी एक्सपर्ट पूनम चुघ यांचे म्हणणे आहे. केसांच्या वाढीसाठी कोरफडीचा चांगला उपयोग होतो. कोरफडीच्या गरात Aloenin नावाचा एक घटक असतो. केसांच्या वाढीसाठी या घटकाचा अतिशय चांगला उपयोग होतो. याबरोबरच कोरफडीच्या गरात व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते ज्यामुळे केसांच्या वाढीसोबतच त्यांची शाईन वाढवण्यासाठीही कोरफडीचा चांगला उपयोग होतो. म्हणूनच आपले भुवयांचे आणि पापण्यांचे केस जास्त गळत असतील तर कोरफडीच्या गराचा आवर्जून वापर करायला हवा.
कोरफड कशी वापरायची?
१. एक छोटा चमचा अॅलोवेरा जेल आणि ५ थेंब ऑलिव्ह ऑईल एकत्र करायचे. हे मिश्रण भुवयांवर लावायचे, मस्काऱ्याच्या ब्रशने हे मिश्रण आपण भुवयांवरही लावू शकतो. मात्र लावताना ते डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
२. कोरफडीचा गर आणि ३ थेंब एरंडेल तेल एकत्र करुन भुवय़ा आणि पापण्यांना रात्रभर लावून ठेवल्यास केस वाढण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. एरंडेल तेल केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याने त्याचा वापर केल्यास डोळ्यांचे सौंदर्य खुलण्यास मदत होते.
३. अनेकदा भुवया आणि पापण्या कोरडेपणामुळे जास्त प्रमाणात गळतात. गुलाब पाणी कोरडेपणा घालवण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे कोरफड आणि गुलाब पाणी एकत्र करुन हे मिश्रण १५ ते २० मिनीटे भुवया आणि पापण्यांना लावल्यास कोरडेपणा कमी होऊन दोन्हीची केसगळती कमी होण्यास मदत होते.
४. यामध्ये व्हिटॅमिन ई ऑइलचे २ थेंब घातल्यास हे मिश्रण जास्त हेल्दी होण्यास मदत होईल. तसेच हे मिश्रण लावताना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. मात्र हे उपाय नियमित स्वरुपात केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.