सौंदर्याची काळजी घ्यायची म्हणजे ती फक्त चेहेऱ्याची घ्यायची असा आपला समज असतो. त्यामुळेच शरीराच्या इतर भागांना जो काळजीचा स्पर्श हवा असतो तो मिळत नाही. त्याचा परिणाम मग दिसू लागतो. आपल्या हाताचे कोपरे आणि गुडघे बघितले की काळवंडलेली अवस्था बघून अनेकजणींचा मूड जातो. हाताच्या कोपरांना आणि गुडघ्यांना स्पर्श केला की जाणवणारा रखरखीतपणा मनातही ओरखडे उमटवतो. पण यासाठी काय करावं ते कळत नाही. हे असं का होतं याचं कारणच उमगत नाही. अनेकदा कोपराची आणि गुडघ्यांची अवस्था एवढी वाईट असते की आवडीचे कपडे घालतांनाही दहादा विचार करावा लागतो.
कोपर आणि गुडघे काळे का पडतात?
हाताचे कोपर आणि गुडघे यांनाही सौंदर्याची चमक देता येते. यासाठीचे उपाय फार अवघड नाही आणि फार लांबही नाहीत. फक्त कोपर आणि गुडघे हे एवढे काळे आणि कोरडे का पडतात हे आधी माहित असायला हवं.
- चेहेऱ्याच्या स्वच्छतेची जेवढी काळजी घेतली जाते ती कोपर आणि गुडघ्यांची घेतली जात नाही. कोपर आणि गुडघ्यांना आवश्यक असलेलं एक्सफोलिएशन होत नाही. त्यामुळे तिथली मृत त्वचा निघून जात नाही. परिणामी मृत त्वचा साठत राहाते.
- सूर्य प्रकाशात जास्त वेळ या भागांची त्वचा उघडी राहिल्यास हायपर पिग्मेंटेशन होऊन त्वचा काळी पडते.
- संप्रेरकांमधे झालेल्या बदलांमुळे शरीरानं दिलेली प्रतिक्रिया स्वरुप हाताचे कोपर आणि गुडघ्याची त्वचा खराब होते.
- सोयरॅसिस, इसब या त्वचाविकारांचा परिणाम कोपर आणि गुडघ्याच्या त्वचेवर होतो.
- जखमा झालेल्या असल्यास त्या निवळल्यानंतर त्वचेचं होणारं नुकसान म्हणून तेथील त्वचा रखरखीत , कोरडी आणि काळवंडलेली असते.
कोपर आणि गुडघ्यांची त्वचा कशी जपणार?
- लिंबाचा रस हा उत्तम उपाय आहे. लिंबात नैसर्गिक ब्लिचिंग घटक असतात. त्याचा उपयोग त्वचेचा वर्ण उजळवण्यासाठी होतो. यासाठी थोडा लिंबाचा रस घ्यावा. तो कोपरांना आणि गुडघ्यांना हलक्या हातानं मसाज करत लावावा. मसाज नंतर दहा मिनिट थांबावं. आणि मग गरम पाण्यानं कोपर आणि गुडघे धुवावेत. हा उपाय सलग काही आठवडे केल्यास अपेक्षित परिणाम दिसतात.
- दही हे त्वचा मॉश्चराइज करण्यासाठी उपयोगी पडतं. पण या आंबट दहयाचा उपयोग आपली त्वचा उजळवण्यासाठी देखील होतो. दह्यात एक छोटा चमचा व्हिनेगर आणि बेसन पीठ घालावं. हा लेप कोपर आणि गुडघ्यांना लावावा. पंधरा मिनिटांनी गरम पाण्यानं लेप धुवावा.
- कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा घालवण्यासाठी बेकिंग सोडा दुधासोबत वापरावा. दुधात बेकिंग सोडा घालून त्याची दाटसर पेस्ट बनवावी. ही पेस्ट कोपर आणि गुडघ्यांना लावावी. पाच मिनिटानंतर ती धुवून काढावी. हा उपचार दोन महिने आठवड्यातून एकदा करावा.
- कोरफडच्या उपयोगानं त्वचा मऊ-मुलायम होते. कोरफडची ताजी पात घ्यावी. त्यातला गर काढावा. आणि हा गर रखरखीत त्वचेवर लावावा. वीस मिनिटानंतर कोरफड लावलेला भाग गार पाण्यानं धुवावा. रुमालानं पुसल्यानंतर लगेचच कोरफडयूक्त मॉश्चरायझर लावावं.
- कोपर आणि दुडघ्यांची रखरखीत त्वचा मऊ करण्यासाठी खोबरेल तेलाचा मसाज करावा. आणि मग गरम पाण्यानं आंघोळ करावी. साबणाचा उपयोग करु नये. खोबरेल तेलानं मसाज करताना यात थोडं लिंबू पिळलं तरी उत्तम.
- त्वचेच्या काळजीसाठी ऑलिव्ह ऑइल उत्तम मानलं जातं. एक मोठा चमचा ऑलिव्ह तेल आणि साखर घ्यावी. ते एकत्र करुन स्क्रब तयार करावा. साखर ही नैसर्गिक एक्सफोलिअण्ट म्हणून ओळखली जाते. साखरेच्या उपयोगानं मृत त्वचा निघून जाते. त्याशिवाय काळेपणाही कमी होतो. ऑलिव्ह ऑइल हे त्वचा ओलसर ठेवतं शिवाय त्वचेचं पोषण करतं.