वय वाढत असलं तरी आपण तरुण दिसायला हवं ही आज प्रत्येकीचीच गरज बनली आहे. इतकंच नाहीतर वेगवेगळ्या कारणांमुळे वयाच्या आधीच चेहेऱ्यावर सुरकुत्या पडण्याच्या त्रासाला अनेकजणींना तोंड द्यावं लागत आहे. मग त्यासाठी क्रीम, लोशन, सिरम, ब्यूटी थेरिपी यासारख्या मार्गांचा अवलंब केला जातो.पण चेहेऱ्यावर अपेक्षित परिणाम दिसत नाहीतच. पण तरुण त्वचेसाठीचा हा अट्टाहास थांबत नाही. हे क्रीम नाही तर ते लोशन उपयोगाला येईल असा हा न थांबणारा प्रवास सूरुच राहातो. या प्रवासात अपेक्षित परिणाम, समाधान, शांती मिळण्याची शक्यता कमीच. पण तरीही या मार्गाचा अवलंब अनेकजणी करतात. पण थोडा मार्ग बदलून बघितला तर?क्रीम, लोशन, सिरम याशिवाय तरुण त्वचा मिळवण्याचा मार्ग असू तरी शकतो का? असंच वाटेल! पण एक मार्ग आहे. तो म्हणजे योगचा..शरीर सुंदर आणि सुडौल करण्यात जो वाटा योगचा असतो तीच भूमिका चेहेऱ्याच्या सौंदर्याच्या बाबतीतही असते. नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी फेशिअल योग केला जातो. जगभरात या मार्गाचा अवलंब करुन त्वचा तरुण आणि सुंदर करण्याचा मार्ग अनेकींनी निवडला आहे.
फेशिअल योगचे फायदे काय?- फेशिअल योग हा क्रीम, ब्यूटी ट्रीटमेण्टस, ब्यूटी थेरिपी यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे. यासाठी दिवसातला नियमित काही वेळ लागतो. आणि वेळसुध्दा महिन्याभरात पार्लरमधे ब्यूटी थेरिपीसाठी जो आपला वेळ जातो त्या तुलनेत फेशिअल योगसाठीचा वेळ कमीच लागतो. हा व्यायाम नियमित केल्यास त्याचे परिणामही चेहेऱ्यावर ठळकपणे दिसतात.
- क्रीम, सिरम, लोशन यातून अनेक रसायनांचा आपल्या त्वचेशी आणि शरीराशी संपर्क येतो. अनेक अॅण्टि एजिंग क्रीममधे पॅरॅफिन्स, खनिज तेल, आणि कृत्रिम सुगंध असतात. त्याचे भविष्यात शरीरावर वाईट परिणाम होतात. पण फेशिअल योग हा मार्ग पूर्णत: नैसर्गिक आहे. यातून चेहेऱ्यावर जे तेज येते त्यासाठी आपण कोणत्याही रसायनांचा धोका पत्करलेला नसतो.
- हसताना, तणावात असताना आपल्या चेहेऱ्यावर कपाळावर सुरकुत्या पडतात. वय वाढतं तसं याचं प्रमाण वाढतं. पण फेशिअल योगमुळे ही एजिंगची प्रक्रिया मंद होते. फेशिअल योगमधे डोळ्यांच्या, भूवयांच्या, ओठांच्या अशा अनेक हालचाली आहे ज्या रोजच्या आयूष्यात आपल्याकडून नकळतपणे होत असतात. या हालचाली शास्त्रशुध्दपणे आणि जाणिवपूर्वक केल्यास आपल्या चेहेऱ्यावरील सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं आणि चेहेऱ्यावरचा ताणही नाहिसा होतो.
- चेहेऱ्यावरचा ताण हा सौंदर्यातला प्रमुख अडथळा. फेशिअल योगमूळे चेहेऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. फेशिअल योगमधे चेहेऱ्याच्या आणि मानेच्या विशिष्ट हालचाली कराव्या लागतात. त्यामूळे चेहेऱ्यासोबतच मानेवरचा ताणही निवळतो. मानेशी संबंधित त्रास फेशिअल योग केल्यानं जातो असा अनुभव जगातल्या अनेकजणी घेत आहेत.
- फेशिअल योग हा चेहेऱ्याचे स्नायू बळकट करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे चेहेऱ्यास होणारा रक्तपुरवठा सूधारतो. चेहेऱ्यास ऑक्सिजन मिळतं. चेहेऱ्याच्या त्वचेखाली कोलॅजनची निर्मिती होण्यास बळ मिळतं. फेशिअल योगमूळे चेहेऱ्यावर तेज येतं. चेहेरा तणावमुक्त दिसतो.
- दुहेरी हनुवटी किंवा पसरट जबड्यामूळे सौंदर्यास बाधा येतो. पण नियमित फेशिअल योग केल्यास या दोन्ही समस्या कमी होऊ शकतात. यासोबतच वय वाढतं तसं गळ्याखालची त्वचा थोडी सूटते, सैल होते. फेशिअल योगम्धे मानेच्या विशिष्ट हालचाली असतात. या हालचाली त्वचा घट्ट करण्याचं काम करतात.
- नियमित व्यायाम केल्यास आपल्या वागण्या बोलण्यातही परिणाम दिसतो. नियमित व्यायामानं आत्मविश्वास वाढतो तोच परिणाम फेशिअल योग करुन चेहेऱ्याच्या बाबतीतही मिळवता येतो. फेशिअल योगमधून स्वत:बद्दलचा आत्मविशास वाढतो. चारचौघात वावरण्याची ताकद वाढते. स्वओळख पक्की होते. सकारात्मक होते.
सूंदर दिसण्यासाठी कृत्रिम इलाज हे महागडे आणि परिणामांच्या बाबत अगदीच तोकडे ठरतात. म्ह्णूनच सौंदर्य तज्ञ्ज्ञदेखील फेशिल योग करुन नैसर्गिक सौंदर्याचा मार्ग अवलंबण्याचा सल्ला देत आहेत. फेशिअल योग तंत्रशुध्दपणे शिकून घरच्याघरी करता येणं अगदीच सहज आहे.