मे महिना आणि दिवाळी म्हणजे लग्नाच्या मुहूर्तांचा काळ. थंडीच्या दिवसांत लग्नकार्य असेल तर मज्जा येते. भरजरी कपडे घातले तरी थंडीत फार वैताग येत नाही आणि मुख्य म्हणजे लग्नात मनसोक्त जेवता येतं. पण उन्हाळ्याच्या दिवसांत लग्न असेल की मात्र अंगाची लाहीलाही होत असल्याने अगदी नको होऊन जातं. लग्न म्हणजे मेहंदी, संगीत, हळद असे एकाहून एक समारंभ. इतकंच नाही तर या काळात मुंज, साखरपुडा यांचेही मुहूर्त असतात. डोक्यावर तापते ऊन असल्याने आपल्याला नेहमीच्या कपड्यातही नको नको होत असते. त्यात लग्न म्हटल्यावर थोडे भरजरी कपडे घालावे लागतात. त्यातही घरातील किंवा जवळचे लग्न असल्यावर आपल्याला चांगलेच कपडे घालावे लागतात (Fashion and Makeup Tips To Attend Wedding in Summer Season).
कडक उन्हाळ्यात लग्नसमारंभाचे भरजरी कपडे घालणे म्हणजे शिक्षा वाटू शकते. अशाने ना आपल्याला लग्न एन्जॉय करता येते ना त्याचा पुरेपूर आनंद घेता येतो. महिलांच्या बाबतीत तर अंगावर साडी किंवा लेहेंगा, मेकअप, हेअरस्टाईल हे सगळे अगदी नकोसे होते. सुरुवातीला आपण उत्साहाच्या भरात छान आवरतो आणि थोड्या वेळाने हे जड कपडे नकोसे झाले की मग आपण नकळत अस्वस्थ व्हायला लागतो. हा अस्वस्थपणा आपल्या चेहऱ्यावर, फोटोंमध्ये सगळीकडे दिसून यायला लागतो. मग आपण थोडा वेळ काढतो आणि सगळ्यांची नजर चुकवून पटकन जाऊन कपडे बदलून येतो. असे होऊ नये म्हणून लग्नाची तयारी करताना काही किमान गोष्टी अवश्य लक्षात ठेवायला हव्यात. यामुळे आपल्याला विनाकारण वैताग करावा लागणार नाही आणि मूडही खराब होणार नाही.
१. कपडे निवडताना
कपड्यांची निवड करताना शक्यतो हलक्या वजनाचे सिल्क, खादी कॉटन किंवा कमी वजनाच्या शिफॉनच्या साड्यांची निवड करावी. हे कापड अंगाला अतिशय नेटके बसते आणि त्यात उकडतही नाही. तसेच ब्लाऊज खूप घट्ट नसेल याची काळजी घ्यायची म्हणजे जीव घाबरा होत नाही. परकर सिल्क किंवा आणखी कसला न घालता कॉटनचा घालायला हवा. साडी थोडी साधी असेल तरी चालेल. अशावेळी मेकअप आणि दागिने हेवी घातल्यास लूक आपोआप मॅच होतो.
२. दागिन्यांची निवड
उन्हाळ्याच्या दिवसांत दुपारचे फंक्शन असेल तर दागिन्यांची निवड करताना खूप गोल्डन न करतो थोडे सोबर दागिने घालावेत. बाहेर खूप जास्त प्रकाश असल्याने त्यात खूप गोल्डन दागिने घातल्यास ते तितके चांगले दिसत नाहीत. अशावेळी मोठं पेंडंट, लांब माळ असलेला सेट असे काहीतरी घालावे. जेणेकरुन ते आपल्यावर छान उठूनही दिसते. खडे, मोती यांचे दागिने अशावेळी भाव खाऊन जातात.
३. मेकअप करताना
एरवी थोडा हेवी मेकअप केला तरी चालतो, पण उन्हाळ्यात जास्त मेकअप चांगला दिसत नाही. इतकेच नाही तर आपल्याला घाम आल्यावर चेहऱ्यावर त्याचे डाग दिसतात. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो हलका मेकअप करावा. तसेच मेकअपची उत्पादने वॉटर प्रूफ असतील याची काळजी घ्यायला हवी. जेणेकरुन घाम आला तरी मेकअप पसरत नाही.
४. हेअरस्टाईलच्या बाबतीत
केस मोकळे सोडले तर चांगले दिसतात, त्यामुळे अनेकदा आपण लग्नसमारंभाला केस मोकळे सोडतो. पण उन्हाळ्याच्या दिवसांत केस मोकळे सोडले तर जास्त घामाघूम व्हायला होते. त्यामुळे केसांचा अंबाडा, बन बांधण्याचा पर्याय केव्हाही चांगला. सध्या वेणीची फॅशन असल्याने साधी वेणी, सागर वेणी हेही चांगले पर्याय असू शकतात. वेण्यांना लावण्यासाठी बाजारात हल्ली बऱ्याच गोष्टी मिळत असल्याने या पर्यायाचा विचार करु शकतो.