पायाचे घोटे काळे पडण्याची समस्या अनेकींसाठी डोकेदुखी ठरते. हे घोटे जर वेळीच स्वच्छ केले नाहीत, तर जसजसे वय वाढते, तसतशी घोट्याची त्वचा अधिकच काळवंडत जाते आणि मग ती कायमसाठी तशीच राहते. काही काही जणांचे तर घोटे काळे पडून तेथील त्वचा अतिशय शुष्क होऊन जाते आणि दिवसेंदिवस त्याच्यावर घाण बसून ती जाडसर होते. पायाला पडलेले हे घट्टे सगळ्यांसमोर उघडे पडले तर खूपच लाज वाटते.
पायाला घट्टे असले तर थ्री- फोर्थ, शॉर्ट्स, ॲन्कल लेन्थ पॅण्ट घालतानाही खूपच अवघड होऊन जाते. अशावेळी घोट्यांना पुन्हा फ्रेश करण्यासाठी काय उपाय करावेत, हे नेमके समजत नसल्याने ही समस्या आणखीनच वाढत जाते. त्यामुळे हे साधे- सोपे आणि घरच्याघरी अगदी सहज करता येतील, असे उपाय करून पहा. यामुळे निश्चितच काही दिवसांत तुम्हाला फरक जाणवू लागेल.
हे काही उपाय करून पहा...
१. हरबरा डाळ, उडीद डाळ आणि मसुराची डाळ समसमान प्रमाणात घेऊन त्याचे पीठ करावे. हे पीठ दुधात भिजवावे. त्यामध्ये जेवढे पीठ घेतले असेल, त्याच्या एक चतुर्थांश खडेमीठाची पावडर टाकावी. तळपाय १० मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर हे मिश्रण घोट्यांवर चोळून चोळून लावावे. ५ ते १० मिनिटे तसेच ठेवून कोमट पाण्याने धुवून टाकावे. खडेमीठ हे उत्तम क्लिन्जर म्हणून काम करते.
२. ग्लिसरीन, लिंबू आणि गुलाबजल एकत्रित करून त्याने दररोज घोट्याची मालिश करावी.
३. लिंबाची फोड जर घोट्यांवर घासली तरी तेथील रापलेली, काळवंडलेली त्वचा निघून जाते आणि तो भाग मऊ पडतो. फक्त हा उपाय करून पाय धुवाल तेव्हा घोट्यावर मॉईश्चरायझर लावायला विसरू नका. हा उपाय आठवड्यातून दोन किंवा तीन वेळेस करू शकता.
४. माेहरीचे तेल आणि मीठ एकत्रित करून घोट्याला मसाज करावी.
५. एरंडेल तेल, ग्लिसरिन आणि बॉडीलोशन एकत्रित करून रोज सकाळी आंघोळ झाल्यावर, घोट्याला लावून नियमित मालिश करावी. हे मिश्रण त्वचेत चांगले जिरले पाहिजे. आठवडाभरातच फरक दिसू लागेल.
६. मसूर डाळीचे पीठ आणि साय एकत्रित करून घोट्यांना चोळून लावल्यानेही काळवंडलेली त्वचा उजळू लागते.
७. बटाटा आणि लिंबू यांचा रस एकत्र करून लावल्यानेही काळवंडलेले घोटे पुन्हा उजळू लागतात.