काही काळापूर्वी व्हिएतनाममधला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, सुंदर दिसण्यासाठी फायर थेरपी. चिनी तारुण्यालाही या थेरपीचं वेड आहे. आपल्याकडेही अनेकजकण व्हिडिओंच्या जगात असे व्हिडिओ पाहतात. आणि त्यातून हा एक अचाट प्रकार करुन पाहण्याचा मोह होतोच. जग जवळ आल्यानं सोशल मीडिया चॅलेंजही लवकर पसरतात. मात्र फायर थेरपी हा काही खेळ म्हणून करण्याचा प्रकार नव्हे. सुंदर दिसण्यासाठी तरुण मुलंमुली काय वाट्टेल ते करू शकतात याचं हे एक वेडगळ उदाहरण आहे. ही गोष्ट व्हिएतनाममधली. जुनीच. तिथली एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत जगभर पोहोचली.
(Image : google)
अनेकजणांना तिकडे अमेरिकेतही वाटलं की, हे प्रकरण तरुण होण्यासाठी काय आहे ते करून पाहावं.तरुण मुलं एकमेकांना डेअरिंग आव्हान देतही काही ठिकाणी हे फायर थेरपीचं चॅलेंज देत सुटली.आणि ही फायर थेरपी कशासाठी तर तरुण-तजेलदार-चमकदार चेहरा दिसण्यासाठी. आणि त्यापायी अनेकजण आगीवर चेहरा धरू लागले आहेत. काही हेल्थकेअर सेंटर्सनी तर त्यासाठीची जाहिरातबाजीही सुरू केली. हो चिन मिन्ह या शहरात तर काही स्पा, ब्यूटी सलोन यांना त्यासाठीची रितसर लायसन्स देण्यात आली. आणि त्यातून आपला चेहरा आगीवर धरायला अनेक तरुण-तरुणी सरसावले. नुस्त तरुण चेहरा दिसणंच नाही तर फटीग, आजारपण, डोकेदुखी यासाठीही काहीजण हा प्रयोग स्वत:वर करून घेऊ लागले. अजूनही त्या शहरात फायर थेरपीचे प्रयोग होतात.त्यातला प्रयोग काय तर भगभगत्या आगीवर आपलं डोकं धरायचं, डोकं म्हणजे खरं तर चेहराच. डोळे घट्ट मिटायचे. आणि 3० सेकंद ते 1 मिनिट एवढा कालावधी चेहरा आगीवर धरायचा आणि बाजूला झालं की दारूत भिजवलेला टॉवेल चेहऱ्याभोवती घट्ट लपेटून घ्यायचा. वाचताना हा अवधी कमी वाटतो. पण तोंड पोळणं, भाजणं, चटके बसणं, डोळ्यांना इजा असे काही अपायही त्यातून झालेच.तेव्हा व्हिएतनाममध्ये आणखी एका चर्चेला तोंड फुटलं, ते म्हणजे सुंदर दिसण्यासाठी इतका आटापिटा का?त्यासाठी तरुण मुलामुलींचं काउन्सिलिंग सुरू झालं. आपण आहोत ते सुंदरच आहोत, आपली त्वचा सुंदर आहे हे पटवून देण्यासाठी चळवळी सुरू झाल्या.पण त्यांना फारसं यश लाभलेलं नाही. उलट त्यातून अजून मुलंमुली यासारख्या प्रयोगांकडे खेचले गेले, अशी चर्चा सुरू झाली.जगभर सौंदर्याच्या बाजारपेठा तरुण मुलामुलींच्या डोक्यात जे भरवत सुटल्या आहेत, त्याची ही भयंकर फळं आहेत. त्यात चीनमध्येही फायर थेरपी उपचार म्हणून केली जाते. सुंदर दिसण्यासाठीची होड तिथंही मोठी आहेच.
आपल्या समाजातही सौंदर्याचे असे अचाट समज आहे, त्यातून सुंदर दिसण्यासाठी वाट्टेल त्या थेरपी पाहणाऱ्यांचे आणि करणाऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे.