Join us  

५ गोष्टी रोज न चुकता केल्या तर सुंदरच दिसाल! मिळवा हेल्दी- ग्लोइंग त्वचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 5:51 PM

Beauty tips: त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य सांभाळायचं (skin care routine for new year) असेल तर नव्या वर्षी तुमच्या त्वचेसाठी या ५ गोष्टी करायला विसरू नका. 

ठळक मुद्दे तर त्वचेची काळजी घ्यायची असेल आणि तिचा यंग, ब्यूटीफुल पोत टिकवून ठेवायचा असेल तर या ५ गोष्टी करायला विसरू नका. 

नव्या वर्षी नवे संकल्प करणारे अनेक जण असतात. कुणी हेल्थबाबत, कुणी फिटनेस आणि डाएटबाबत तर कुणी आपला छंद, आपली आवड जोपासण्याबाबत संकल्प करतात. कुणी एखादी गोष्टी सोडून देतं तर कुणी एखादी गोष्टी नियमितपणे करणार, असा निश्चय करतात. तुम्ही तुमचा कोणताही संकल्प केला असेल तर तो तसाच चालू ठेवा आणि त्यासोबतच त्वचेची काळजी (beauty tips and skin care) घेण्यासाठी आणि त्वचेचं आरोग्य सांभाळण्यासाठी आणखी संकल्प करा...

 

बऱ्याचदा त्वचेची काळजी घेताना आपण काही चुका करतो आणि ज्या गोष्टी करायच्या नाहीत, त्याच नेमक्या वारंवार करतो. किंवा आळसापोटी अनेकदा उलटंही होतं. ज्या गोष्टी करायला पाहिजेत, त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग महागडे स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरूनही त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. म्हणूनच तर त्वचेची काळजी घ्यायची असेल आणि तिचा यंग, ब्यूटीफुल पोत टिकवून ठेवायचा असेल तर या ५ गोष्टी करायला विसरू नका. 

 

१. सनस्क्रिन लोशन (use of sunscreen lotion)या गोष्टीकडे आपण खूपदा दुर्लक्ष करतो. घाईघाईने बाहेर पडताना सनस्क्रिन लोशन लावणे विसरुन जातो. किंवा मग केवळ चेहऱ्याला सनस्क्रिन लावले जाते. पण गळा, हात यांना आपण विसरतो. पण यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. तरूण वयात हा त्रास नाही जाणवला तरी तिशीनंतर त्याचा इफेक्ट लगेच चेहऱ्यावर दिसू लागतो आणि चेहरा थकलेला वाटतो. त्यामुळे बाहेर जाताना सनस्क्रिन लोशन चेहऱ्याला, हाताला लावणे हा या वर्षीचा सगळ्यात पहिला नियम. 

 

२. २ ते ३ वेळा मॉईश्चरायझर (moisturizer)सकाळी एकदा आंघोळ करून चेहरा धुतला की त्यानंतर चेहऱ्याकडे पाहायचेच नाही. किंवा मग नंतर चेहरा धुतला तरी मॉईश्चराईज करायचे नाही, अशी सवय अनेक जणींना असते. ही सवय सोडून द्या. दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. चेहरा धुतल्यानंतर प्रत्येक वेळी मॉईश्चरायझर लावायला विसरू नका. 

 

३. नियमित स्क्रब (regular scrub)चेहऱ्यावर डेडस्किनचा थर साचू नये, यासाठी त्वचेचे नियमितपणे स्क्रबिंग होणे गरजेचे असते. म्हणूनच चेहऱ्याला नियमितपणे स्क्रबिंग करायला विसरू नका. यामुळे त्वचा स्वच्छ आणि तुकतुकीत होते. घरच्याघरी अनेक प्रकारचे नैसर्गिक स्क्रब वापरूनही तुम्ही स्क्रबिंग करू शकता.

 

४. फेस मास्क (face mask)पार्लरमध्ये गेल्यावरच फेसमास्क लावायचा, अशी अनेकींची सवय असते. पण पार्लरमध्ये न जाता, घरच्याघरी असे उपाय करता येतात. फेसमास्क नियमितपणे लावल्यामुळे त्वचेचा टाईटपणा टिकून राहतो, त्वचा सैल पडून त्यावर सुरकुत्या येणे कमी होते. घरी तयार केलेला किंवा विकत मिळणारा कोणताही फेस मास्क तुम्ही वापरू शकता.

 

५. मेकअप काढूनच झोपणे (dont forget to remove your make up)मेकअप करताना आपण उत्साहात करतो, पण रात्री तो काढण्याची वेळ आली की जाम कंटाळा येतो. पण कॉस्मेटिक्समध्ये असणारे केमिकल्स रात्रभर त्वचेवर राहिले, तर ते त्वचेचे नुकसान करू शकतात. त्यामुळे रात्री झोपताना मेकअप काढायला विसरू नका.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी