आपला चेहरा कायम नितळ आणि ग्लोइंग हवा असे प्रत्येकीला वाटते. त्यासाठी आपण काही ना काही घरगुती किंवा पार्लरमधील उपायही करत असतो. कधी चेहऱ्यावर खूप डाग म्हणून तर कधी चेहऱ्यावर अनावश्यक केसांची वाढ झाल्याने आपण वैतागतो. पिंपल्स ही तर अनेकींसाठी सौंदर्यात बाधा आणणारी नेहमीची समस्या. आता या पिंपल्ससाठी नेमकं काय करायचं ते अनेकींना माहित नसते. (Which Food Items you Should Avoid if you have Acne or Pimples Problem) एकदा पिंपल्स यायला सुरुवात झाली की अनेकदा पूर्ण चेहराही भरतो. मग ते पिकेपर्यंत किंवा फुटेपर्यंत वाट पहावी लागते. त्याला चुकून हात लागला की त्याचा काळा डाग पुढे काही दिवस तसाच राहतो. इतकेच नाही तर अनेकदा पिंपल्स येतो त्याठिकाणी दुखतही राहते (Doctor Jaishree Sharad) .
पिंपल्स येण्याची आनुवंशिकता, अपुरी झोप, अयोग्य आहार, विविध सौंदर्य उत्पादने, पोट साफ नसणे अशी अनेक कारणे सांगता येतील. पिंपल्स आल्यावर ते जावेत यासाठी वेगवेगळे उपाय करण्यापेक्षा ते येऊच नयेत यासाठी नेमके काय करता येईल याबाबत विचार करणे जास्त महत्त्वाचे आहे. अनेकदा आपल्या आहारातील चुकीच्या गोष्टी आपल्या चेहऱ्यावर परीणाम करतात. खूप तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे, बेकरी प्रॉडक्टचा आहारात प्रमाणापेक्षा जास्त वापर आरोग्यासाठी तर घातक ठरतोच पण त्वचेवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे लक्षात घ्यायला हवे. त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जयश्री शरद यांनी याविषयी माहिती देण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये आहारात कोणते पदार्थ टाळल्यास पिंपल्सची समस्या दूर होते याविषयी त्या माहिती देतात.
१. साखर
कोणत्याही फॉर्ममधली साखर आरोग्यासाठी घातक असते त्याचप्रमाणे ती त्वचेसाठीही चांगली नसते. अनेकदा साखर शरीरासाठी चांगली नाही म्हणून आपण साखरेला पर्याय शोधतो. मात्र गूळ, मध, साखर, खजूरातील साखर हेही आरोग्यासाठी म्हणावे तितके चांगले नसते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहारात टाळलेल्या केव्हाही चांगल्या, यामुळे आपली पिंपल्सची तक्रार दूर होण्यास मदत होईल.
२. मैदा
आपण बिस्कीट, ब्रेड, बर्गर, वडापाव अशा गोष्टी अगदी सर्रास खातो. कधीतरीच्या नावाखाली आपल्या आहारात मैद्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. मात्र मैदा खाणे त्वचेसाठी किंवा पिंपल्ससाठी चांगले नसते.
३. हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड
बर्गर, पिझ्झा, बटाट्याचे वेफर्स, केक, कुकीज, बिस्कीट या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे प्रमाण वाढते. या पदार्थांमुळे IGF 1 चा स्तर वाढतो आणि त्याचा त्वचेवर परीणाम होतो. म्हणून हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले.
४. दूध
दुधामुळे IGF 1 चा स्तर वाढतो तसेच यामुळे इन्शुलिनचा स्तरही वाढतो. त्वचेतून होणारी तेलाची निर्मिती वाढण्यासाठी या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरतात. तसेच दुधामुळे अँड्रोजेनची पातळी वाढल्याने पिंपल्सही वाढतात. त्यामुळे दूध योग्य त्या प्रमाणातच घ्यायला हवे. यासोबतच दही, ताक, पनीर, चीज हेही योग्य त्या प्रमाणात खायला हवे.