वय वाढलं तरी ते आपल्या चेहऱ्यावर दिसू नये आणि आपण कायम तरुण दिसावं अशी आपली इच्छा असते. मात्र वय वाढतं तसं ते चेहऱ्यावर दिसायलाच लागलं. नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि उत्तम आहार घेतला तर आपण आपला फिटनेस आणि सौंदर्य चांगल्या पद्धतीने जपू शकतो. वयाची तिशी पार केली की वय वाढत असल्याची चिन्ह चेहऱ्यावर दिसायला लागतात. ऐन चाळीशीत तर आता आपण वयस्कर होणार की काय अशी भिती सतावते आणि त्याचा एक वेगळाच ताण येतो. पण वय वाढलं तरी त्याची चिन्हे चेहऱ्यावर दिसू नयेत असं वाटत असेल तर आपल्या आहारात काही बदल आवर्जून करायला हवेत. आहारातून मिळणाऱ्या पोषणाचा आपल्या सौंदर्यावरही कळत-नकळत परीणाम होत असतो. आहार उत्तम असेल तर त्वचा, केस, चांगली राहण्यास मदत होते. आता वाढत्या वयातही चेहरा तरुण दिसावा यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा ते पाहूया (Foods to get younger in 40’s)...
१. पुदीना
पुदीन्यामध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्याबरोबरच सौंदर्यासाठीही चांगला फायदा होतो. त्वचा उजळ दिसावी आणि चेहऱ्यावरचे डाग-धब्बे निघून जावेत यासाठी पुदीना उपयुक्त ठरतो. पुदीन्याच्या पानांत अँटीऑक्सिडंटस असतात, ज्यामुळे त्वचेतील ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा हेल्दी राहते आणि त्यातील पाण्याचे प्रमाण चांगले राहण्यास मदत होते.
२. कारले
कारल्याची भाजी कडू असल्याने काहींना अजिबात आवडत नाही तर काही जण ही भाजी अतिशय आवडीने खातात. कारल्यामध्ये पाण्यामध्ये विरघळणारे व्हिटॅमिन सी, लिपोफिलिक व्हिटॅमिन ई आणि कैरोटीनॉईड हे घटक असतात. त्वचेच्या सेल्समधील डॅमेज वाचवण्यासाठी आणि त्वचा चांगली ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.
३. जांभूळ
जांभळामध्ये एलाजिक अॅसिड आणि क्वेरसेटीन असते. त्वचेला येणारी खाज, डलनेस आणि सूज कमी करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. तसेच त्वचा ग्लो करण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. तसेच हायड्रेशन वाढवून यूव्ही डॅमेज कमी करण्यासाठी आणि त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी जांभळं फायदेशीर असतात.
४. आवळा
आवळा हा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सर्वात उत्तम उपाय आहे. कमी वयात चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या रोखण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. आवळ्याच्या रसाने त्वचा जीवंत राहण्यास मदत होते तसेच त्वचा शायनी राहण्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. नॅचरल क्लिंजर म्हणून आवळ्याला ओळखले जाते.