सुंदर दिसण्यासाठी आपण आपला चेहरा, ओठ, डोळे या सगळ्या गोष्टींची आवर्जून काळजी घेतो. सौंदर्याच्या बाबतीत आपल्याला केसही चांगले दिसायला हवे असतात. पण ज्याच्या जोरावर आपण दिवसभर इकडेतिकडे धावत असतो त्या पायांकडे मात्र आपण लक्ष द्यायला विसरतो. आपल्या शरीराचा संपूर्ण भार पेलणाऱ्या पायांमध्ये ताकद तर हवीच पण हे पाय छान दिसावेत असे जर तुम्हाला वाटत असेल पायांची योग्य पद्धतीने काळजी घ्यायला हवी. अनेकदा टाचांना भेगा पडलेल्या असतात, नखे वाढलेली असतात किंवा नखांच्या बाजूने काळा थर जमा झालेला असतो. पुरेशी आर्द्रता न मिळाल्याने पायाची नखे, बोटे कोरडी पडलेली असतात. रोजच्य़ा धावपळीत आपले आपल्या पायांकडे दुर्लक्ष होते. पण पायही सुंदर दिसावेत आणि चांगले राहावेत यासाठी काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. पाहूयात पायांची काळजी कशी घ्यायची...
१. झोपण्यापूर्वी पायांची काळजी घ्या
रात्रीच्या वेळी झोपताना आपण ज्याप्रमाणे चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावतो त्याप्रमाणे झोपताना आपल्या तळव्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसभर काम करुन, आपल्या शरीराचे वजन पडल्याने आपले तळवे थकलेले असतात. त्यामुळे रात्री झोपेत इतर अवयवांप्रमाणे तळव्यांनाही आराम मिळणे आवश्यक असते. त्यामुळे झोपताना कोमट पाण्यात मीठ घालून ५ ते १० मिनीटे या पाण्यात पाय बुडवून ठेवा. त्यामुळे पायांचा थकवा दूर होईल आणि तुम्हाला नक्कीच आराम मिळण्यास मदत होईल. यामुळे तुमचा दिवसभराच्या कामाचा ताण दूर होण्यास मदत होईल.
२. पायांना हळूवार मसाज करा
आपल्या थकलेल्या पायांना रिलॅक्स करण्यासाठी रात्री झोपण्याआधी पायांना मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण क्रिया चांगली होण्यास मदत होईलच. पण दिवसभर पायांवर आलेल्या भारामुळे थकलेल्या पायांना आराम मिळण्यास मदत होईल. हा मसाज करण्यासाठी हातावर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल घ्या. त्यानंतर पायाची बोटे, पायाचा तळवा, टाचा, घोटा यांना हळूवारपणे गोलाकार मसाज करा.
३. नियमित काही आसने करा
तालासन, उत्कटासन यांसारख्या आसनांमुळे तळव्यांच्या स्नायूंना काही प्रमाणात ताण पडतो आणि हे स्नायू मोकळे होण्यास मदत होते. यामध्ये टाचा, पायाचा चवडा आणि पूर्ण तळव्याच्या स्नायूंचे स्ट्रेचिंग होत असल्याने पायांना आराम मिळतो. आपण रोजच्या धावपळीत या स्नायूंकडे विशेष लक्ष देत नाही. मात्र ही दोन आसने अतिशय सोपी असून मधल्या वेळात नियमित केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. चवड्यांवर आणि टाचांवर काही पावले घरातल्या घरात चालण्याचाही पायांना आराम मिळण्यास उपयोग होतो.
४. भेगांसाठी घरच्या घरी करा स्क्रबर
अनेकदा आपले पाय खूप कोरडे पडतात. त्यामुळे पायांना भेगा पडण्याची समस्या अगदी सामान्य आहे. इतकेच नाही तर कॉर्न म्हणजेच कुरुप होण्याची समस्य़ाही सध्या सामान्य झाली आहे. दिवसभर आपले पाय शूजमध्ये असण्याची शक्यता असल्यानेही या समस्या होतात. पण भेगा पडू नयेत आणि कॉर्न होऊ नये यासाठी पायांवरील डेड स्कीन काढणे आवश्यक असते. आपण चेहऱ्यावरील डेड स्कीन काढण्यासाठी ज्याप्रमाणे चेहऱ्याला स्क्रबर लावतो त्याचप्रमाणे पायांनाही स्क्रबिंग करा. पाय पाण्याच बुडवून ठेवा. त्यानंतर कॉफी पावडर, ब्राऊन शुगर आणि कोमट तेल एकत्र करुन ते पायांना चोळा आणि त्यानंतर पाय धुवून टाका. यामुळे पायांची त्वचा मुलायम होण्यास मदत होईल.