वेणी घालणं हे आता अजिबातच काकूबाई पणाचं लक्षण नाही... उलट वेणी घालण्यातही एक वेगळीच स्टाईल आहे हे आता बहुतेक जणींनी मान्य केलं आहे... वेणी घालण्याच्या अनेक नवनवीन पद्धती सध्या बघायला मिळतात. पण अजूनही जुनं ते साेनं या म्हणीप्रमाणे सागरवेणीची (how to tie french braid) क्रेझ टिकून आहे. आपल्यापैकी कित्येक जणींनी स्वत:च्या लहानपणी आपापल्या आई- मावशी- आत्याकडून सागरवेणी घालून घेतली असेल आणि आज त्या त्यांच्या मुलीचीही सागरवेणी घालत असतील. यावरूनच तर दिसून येते सागर वेणीची लोकप्रियता.
मेट्रो सिटीपासून ते अगदी खेडेगावापर्यंत आपल्याला सागर वेणीचा वावर दिसून येतो. एखादी जीन्स किंवा मिनी स्कर्टवर सागर वेणी घालणारी मुलगीही आपण बघतो आणि तेच साडीवर, लेहेंगा- घागऱ्यावर सागर वेणी घातलेल्या मुलीही दिसून येतात. ज्या मुली मैदानी खेळ खेळतात, त्याही स्पर्धेच्या वेळी हमखास सागरवेणी घालण्यास प्राधान्य देतात. कारण या वेणीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या वेणीमुळे केसांत गुंता होत नाही आणि कोणतीही क्लीप, क्लचर न लावताही केस वेणीत चांगले बांधले जातात.
अनेक वेण्यांचे प्रकार किंवा अंबाडे काही काळानंतर सैल होत जातात. पण सागरवेणी मात्र तशीच्या तशीच टिकून राहते. त्यामुळे खेळताना, प्रवासात किंवा अगदी ऑफिसलाही अनेक जणी सागर वेणी घालणे पसंत करतात. सागरवेणी घालायला आवडते, पण स्वत:ची स्वत:ला घालताच येत नाही, असंही अनेक जणींचं म्हणणं आहे. म्हणूनच तर स्वत:च स्वत:ची सागरवेणी कशी घालायची ते जाणून घेऊया...
video credit- YouTube
कशी बांधायची सागरवेणी
सागरवेणीची सुरूवात डोक्याच्या अगदी वरच्या बाजूपासून केली जाते. कपाळाच्या वरचे थोडे केस घ्यायचे, त्यांची आपण नेहमी जशी तीन पदरी वेणी घालतो तशी वेणी घालायची. अगदी दोन- तीनच पेढ घालायचे. त्यानंतर एकदा डाव्या बाजूने तर एकदा उजव्या बाजूने छोट्या- छोट्या बटा घेऊन मुख्य वेणीत घेत जायच्या. ३- ४ वेळा सराव केला तर आपली आपण सागरवेणी बांधणे अजिबात अशक्य नाही.
सागर वेणीसाठी मिळतात आकडे
special hair pins for French braid
सागर वेणी स्वत:ची स्वत:च ज्यांना घालता येत नाही, त्यांच्यासाठी आता सागरवेणी घालणे सोपे झाले आहे. कारण बाजारात खास सागर वेणीसाठी स्वतंत्र आकडे मिळत आहेत. हे आकडे नागमोडी आकाराचे आहेत. डोक्यात वरच्या बाजूला आकडा अडकवून टाकाला की उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने एकेकदा बट घ्यायची आणि या आकड्यात अडकवून टाकायची. या सोप्या पद्धतीने अगदी झरझर सागरवेणी घालून फटाफट तयार होता येते.