कोरफड या औषधी वनस्पतीचा सौंदर्य समस्यांवर प्रभावी उपाय होतो. कोरफडमध्ये शरीराला, त्वचेला थंडावा देणारे, सूज आणि दाह कमी करणारे घटक असतात. त्यामुळे उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्यांवर कोरफड ही गुणकारी ठरते. सौंदर्यविषयक विविध घटकांसाठी कोरफडचा वापर करता येतो. चेहऱ्यावर मेकअपचा बेस तयार करण्यापासून ते मेकअप रिमूव्हरपर्यंत कोरफड गराचा उपयोग करता येतो. निरोगी त्वचेसाठी, चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कोरफडचा उपयोग करता येतो. केसांच्या समस्येपासून ते पायाच्या टाचांच्या भेगांपर्यंत 8 प्रकारे चमचा भर कोरफडचा उपयोग होतो.
Image: Google
1. पायाच्या टाचांना भेगा पडल्या असतील आणि या भेगा जर दुखत असतील तर कोरफडच्या गरापासून फूट मास्क तयार करता येतं. ॲलोव्हेरा फूट मास्कमुळे टाचा मऊ मुलायम होतात. फूट मास्क तयार करण्यासाठी अर्धा कप ओटमील पावडर, अर्धा कप मक्याचं पीठ, 4 ओठे चमचे कोरफडचा कर आणि अर्धा कप अनसेंटेड बाॅडी लोशन घ्यावं. हे सर्व चांगलं मिक्स करुन या मिश्रणानं पायांच्या टाचांवर मसाज करावा. मसाज झाल्यानंतर एक दहा मिनिटं हे मिश्रण पायांच्या टाचांवर ठेवावं. नंतर पाय कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावेत.
2. चेहऱ्याच्या त्वचेची खोलवर स्वच्छता होण्यासाठी कोरफड जेलचा उपयोग करता येतो. कोरफडमध्ये सॅलिसिलिक ॲसिड असतं. या घटकामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. ॲलोव्हेर जेल स्क्रब करण्यासाठी अर्धा कप ॲलोव्हेरा जेलमध्ये थोडी ब्राऊन शुगर ,ओटमील पावडर आणि थोडं सैंधव मीठ घालवं. हे सर्व चांगलं एकत्र करुन चेहऱ्याची त्वचा, हाताचे कोपर, गुडघे स्वच्छ करता येतात.
3. कोरफडमध्ये पाॅलीफेनाॅल्स नावाचं शक्तीशाली ॲण्टिऑक्सिडण्ट असतं. हे ॲण्टिऑक्सिडण्ट घातक जिवाणुचा विकास रोखण्यासाठी फायदेशीर ठरतं. कोरफडमध्ये जिवाणूविरोधी, विषाणूविरोधी आणि ॲण्टिसेप्टिक गुणधर्र्म असतात. या गुणधर्मांमुळे जखम झालेल्या ठिकाणी कोरफडचा गर लावल्यास जखम लवकर भरते.
Image: Google
4. केसांना चमक येण्यासाठी, सतत गुंता होणारे केस मऊ मुलायम होण्यासाठी हेअर सिरम म्हणूनही ॲलोव्हेरा जेलचा उपयोग करता येतो. यासाठी एका भांड्यात 4- 5 चमचे गुलाब पाणी, 1 मोठा चमचा कोरफडचा गर आणि 1 इ व्हिटॅमिन कॅप्सूल घालावी. कॅप्सूल नसल्यास थोडं बदाम तेल घातलं तरी चालतं. हे सर्व नीट एकत्र करुन घ्यावं. केस शाम्पूनं धुतल्यानंतर केस थोडे ओलसर असतानाच हे मिश्रण केसांवर लावावं. यामुळे केसांना चमक येते. केस मऊ होतात.
5. मेकअप करताना ॲलोव्हेरा जेलचा उपयोग प्रायमरसारखा करता येतो. ॲलोव्हेरा जेलमुळे त्वचेचं पोषण होतं. त्वचेचा पोत मऊ होतो. प्रायमर म्हणून केमिकल विरहित ॲलोव्हेरा जेल हा सुरक्षित पर्याय आहे. यासाठी थोडं ॲलोव्हेरा जेल घेऊन त्याने चेहऱ्यावर हलका मसाज करावा. त्वचेत ते पूर्ण जिरलं की मग एक मिनिटानं फाउंडेशन लावावं.
Image: Google
6. मेकअपसाठी प्रायमर म्हणून फायदेशीर असलेलं ॲलोव्हेरा जेल उत्तम मेकअप रिमूव्हर देखील आहे. ऑइल बेस मेकअप रिमूव्हरसाठी पर्याय म्हणून ॲलोव्हेरा जेलचा उपयोग करता येतो. यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडं ॲलोव्हेरा जेल घेऊन ते चेहऱ्याला लावून मेकअप काढता येतो.
7. त्वचा ताजीतवानी करण्यासाठी ॲलोव्हेरा जेल आइस क्यूब्जचा उपयोग करता येतो. कोरफडयुक्त बर्फानं त्वचेची होणारी आग थांबते. ॲलोव्हेरा जेल आइस क्यूब्ज तयार करण्यासाठी बर्फाचा ट्रे कोरफडच्या गरानं अर्धा भरावा. त्याचा बर्फ झाला की मग तो चेहऱ्यसाठी वापरावा. आधी चेहरा स्वच्छ धुवून मग चेहऱ्यावर ॲलोव्हेरा आइस क्यूब फिरवावी.
8. कोरफड गराचा उपयोग आइब्रोज सेट करण्यासाठी आइब्रोज जेल म्हणूनही करता येतो. मस्कारा ब्रश ॲलोव्हेरा जेलमध्ये बुडवून हा ब्रश भुवयांवरुन फिरवल्यास भुवया सेट होतात.