त्वचा नितळ असावी, केस मऊ मुलायम, चमकदार आणि काळेभोर असावे ही सौंदर्याबाबतची एक माफक अपेक्षा असते. ती पूर्ण करण्यासाठी कितीतरी ब्यूटी प्रोडक्टस आपण त्वचेवर आणि केसांवर वापरत राहातो. आपल्या अपेक्षा तर पूर्ण होत नाहीच पण वेळ आणि पैसे खर्च होतात. पुन्हा कोणतंतरी आणखी एखादं प्रोडक्ट वापरण्याचा मोह होतो. हे चक्र काही सुटत नाही. प्रत्येक वेळेस अपेक्षाभंग तेवढा हाती येतो. असं होवू नये म्हणून इन्स्टण्ट रिझल्ट देणार्या प्रोडक्टसच्या मागे धावण्यापेक्षा चांगल्या, परिणामकारक आणि नैसर्गिक घटकांचा वापर करायला हवा असं प्रसिध्द सौंदर्यतज्ज्ञ शहनाझ हुसेन म्हणतात. त्यांच्या मते हे नैसर्गिक घटक तुम्हाला त्वचेवर आणि केसांवर जो परिणाम हवा आहे तो लगेच देणार नाहीत, पण थोडा उशिरा का होईना त्याचे चांगले परिणाम दिसतात आणि ते तात्पुरते न राहाता कायमस्वरुपी टिकून राहातात.
Image: Google
शहनाझ हुसेन म्हणतात नैसर्गिक घटकांचा वापर सातत्यानं केल्यास त्याचे चांगले आणि कायमस्वरुपी परिणाम दिसतातच. त्वचा आणि केसांचं सौंदर्य जपण्यासाठी शहनाझ हुसेन ग्रीन टीचा वापर करण्याचा सल्ला देतात.
आरोग्य जपण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी म्हणून ग्रीन टीचा उपयोग होतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण केस आणि त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर करण्यासाठी ग्रीन टी हा उत्तम उपाय असल्याचं ते सांगतात. त्वचेसाठीच्या टोनरपासून ते केसांसाठी कंडिशनरपर्यंत अनेक प्रकारे ग्रीन टी वापरता येतो. तो कसा वापरायचा याबद्दल शहनाझ हुसेन यांनी मार्गदर्शन केलं आहे.
सौंदर्यासाठी ग्रीन टी
आरोग्यासाठी लाभदायक असलेला ग्रीन टी सौंदर्यासाठीही तितकाच परिणामकारक आणि प्रभावी आहे. यासाठी तो कसा वापरावा एवढं फक्त माहीत असायला हवं.
Image: Google
1. ग्रीन टी फेशियल टोनर
टोनर बनवण्यासाठी अर्धा कप पाणी आणि 1 ग्रीन टी बॅग घ्यावी.
यासाठी आधी पानी चांगलं उकळून घ्यावं. पाणी उकळलं की मग त्यात ग्रीन टी बॅग घालावी. किमान दोन मिनिटं ही ग्रीन टी बॅग पाण्यात राहू द्यावी आणि मग ती काढून टाकावी. हे पाणी व्यवस्थित थंड होवू द्यावं. थंड झालेल्या पाण्यात कापसाचा बोळा घालून त्याच्या सहाय्यानं चेहेर्याचं टोनिंग करावं. ग्रीन टीच्या टोनरनं टोनिंग केल्यानं चेहेर्यावरील मुरुम पुटकुळ्या किंवा टॅनिंगची समस्या असल्यास ती या टोनरच्या उपयोगानं दूर होते.
Image: Google
2. ग्रीन टी फेस पॅक
ग्रीन टी फेस पॅक तयार करण्यासाठी 2 कप पाणी, 2 ग्रीन टी बॅग्ज आणि 1 छोटा चमचा मध घ्यावं.
या फेस पॅकसाठी पाणी चांगलं उकळून घ्यावं. त्यानंतर पाण्यात 2 ग्रीन टी बॅग्ज घालाव्यात. 2 ते 3 मिनिट टी बॅग्ज पाण्यात ठेवून नंतर काढून घ्याव्यात. हे पाणी थंड होण्यासाठी ते फ्रीजमधे ठेवावं. हे पाणी थंड झालं की एका वाटीत एक छोटा चमचा मध घ्यावं. त्यात एक छोटा चमचा ग्रीन टीचं पाणी घालावं. ते चांगलं एकजीव केलं की मग ते चेहेर्यावर लावावं. वीस मिनिटानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
ग्रीन टीमधे प्रभावी आणि परिणामकारक अँण्टिऑक्सिडण्टस असतात. चेहेर्यावर जर वया आधीच सुरकुत्या पडल्या असतील तर चेहेर्यावर या स्वरुपात ग्रीन टीचा उपयोग करणं फायदेशीर ठरतं.
Image: Google
3. ग्रीन टी बॉडी स्क्रब
ग्रीन टी बॉडी स्क्रब तयार करण्यासाठी 1 छोटा चमचा बदाम पावडर, 1 छोटा चमचा ग्रीन टी आणि 1 छोटा चमचा दही घ्यावं.
हा स्क्रब तयार करताना आधी एका वाटीत दही घ्यावं. त्यात बदाम पावडर आणि ग्रीन टी घालावा. सर्व मिर्शण नीट एकजीव करावं. हे मिर्शण चेहेर्यास लावावं. एक दोन मिनिटं लावून झालं की मग चेहेर्याला लावलेल्या लेपाच्या सहाय्यानेच स्क्रब करावं. संपूर्ण शरीर स्वच्छ करण्यासाठीही या ग्रीन टी स्क्रबचा उपयोग करता येतो.
Image: Google
4. ग्रीन टी हेअर कंडीशनर
ग्रीन टीचा उपयोग केसांसाठी कंडीशनरच्या स्वरुपातही करता येतो. यासाठी केसांना शाम्पू लावून ते धुतले की मग सगळ्यात शेवटी केसांवर ग्रीन टी पाणी घालावं. यासाठी 1 कप मगामधे 1 कप ग्रीन टीचं पाणी घालावं आणि मग या पाण्यानं केस धुवावेत. केसांची मूळं आणि टाळूच्या स्वच्छतेसाठी ग्रीन टी हेअर कंडीशनरचा चांगला उपयोग होतो. केसांमधे कोंडा असल्यास तोही या ग्रीन टी कंडीशनरच्या उपायानं निघून जातो.
5. ग्रीन टीचा उपयोग नियमित स्वरुपात केसांवर केल्यास केस झडण्याची समस्या दूर होते. शिवाय डोळ्यांचा थकवा , डोळ्यांच्या खाली आलेली सूज घालवण्यासाठी ग्रीन टीचा उपयोग प्रभावी मानला जातो.
ग्रीन टीच्या पाण्यात हात दहा मिनिटांसाठी बुडवून ठेवावेत. या उपायानं बोटांची नखं स्वच्छ होतात आणि चमकतात.