हजारो वर्षांपासून जगातील अनेक देशात ग्रीन टीचा (green tea) उपयोग औषधासारखा केला जातो. मेंदूंचं कार्य सुधारण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत अनेक फायदे ग्रीन टी मधून मिळतात. ग्रीन टी मुळे केवळ शरीर आणि मनाचंच आरोग्य सुधारतं असं नाही तर त्वचेसाठीही ग्रीन टी (green tea benefits to skin) फायदेशीर असतो. त्यामुळेच अनेक सौंदर्य उत्पादनात ग्रीन टीचा उपयोग केलेला असतो.
Image: Google
त्वचेसाठी ग्रीन टीचा फायदा
1. ग्रीन टीमध्ये पाॅलिफेनाॅल्स आणि कॅचेचिन्सचे वेगवेगळे सहा प्रकार असतात. हे कॅचेचिन्स म्हणजे ॲण्टिऑक्सिडण्टसच असतात. ग्रीन टीमधल्या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे मुक्त मुलकांपासून त्वचेचं संरक्षण होतं. 2010मध्ये झालेला एक अभ्यास सांगतो की ग्रीन टीमधल्या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे त्वचेचंं सूर्याच्या अति नील किरणांपासून संरक्षण होतं. ग्रीन टीमधील याच ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका टळतो.
2. 2003 मध्ये झालेला अभ्यास सांगतो की, ग्रीन टीमध्ये ॲण्टिऑक्सिडण्टचं प्रमान जास्त असतं. त्यामुळे त्वचेतील पेशींचं पुर्नरुज्जीवन होतं. त्वचेच्या पेशींचं रक्षण होतं. खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती होते. ग्रीन टी मधील ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे त्वचेवरील वयाच्या खुणा कमी होतात. खराब झालेली स्किन निरोगी होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये ब 2 हे जीवनसत्व असतं. यामुळे त्वचा तरुण दिसते. ब 2 जीवनसत्वामुळे त्वचेखालील कोलॅजनची निर्मिती होण्यास चालना मिळते. यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुंदर होते.
Image : Google
3. ग्रीन टीमध्ये सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असतात. यामुळे त्वचेची खाज, त्वचेवरील लाल पुरळ, सूज या समस्या दूर होतात. ग्रीन टी चा उपयोग त्वचेवर केल्यास त्वचेला झालेल्या जखमा भरुन निघतात तसेच उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळ होते. ग्रीन टीच्या दाह आणि सूज विरोधी गुणधर्मामुळे सोयरासिस, रोसासिआ यासारखे त्वचा विकार बरे होण्यास मदत मिळते.
4. ॲण्टिऑक्सिडण्ट, दाहविरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मामुळे मुरुम पुटकुळ्यांवर ग्रीन टी उत्तम उपाय ठरतो. तसेच तेलकट त्वचेच्या समस्या ग्रीन टीच्या त्वचेवरील वापरामुळे कमी होतात. ग्रीन टीमधील पाॅलिफेनाॅल्समुळे तेल स्त्रवणाऱ्या सीबम ग्रंथीची निर्मिती नियंत्रित होते आणि मुरुम पुटकुळ्यांना अटकाव होतो. ग्रीन टीमधील पाॅलिफेनाॅल्समुळे जंतूच्या होणाऱ्या संसर्गापासूनही त्वचेचं रक्षण होतं ग्रीन टीच्या उपयोगानं त्वचेवरील सूक्ष्म जिवाणूंची वाढ रोखता येते.
5. ग्रीन टीमध्ये ब2 या जीवनसत्वासोबतच इ जीवनसत्वही असतं. यामुळे त्वचेला पोषण मिळतं. त्वचेतील आर्द्रता, ओलसरपणा टिकून राहातो. त्वचेचा कोरडेपणा रुक्षपणा कमी होवून त्वचा मऊ होते.
Image: Google
ग्रीन टी फेस मास्क
ग्रीन टीमधील गुणधर्मांचा त्वचेस फायदा होण्यासाठी ग्रीन टी फेसमास्क तयार करावा. यासाठी 1 मोठा चमचा ग्रीन टी, 1 मोठा चमचा बेकिंग सोडा, 1 मोठा चमचा मध , आवश्यकता वाटल्यास थोडं पाणी घ्यावं. आधी एक कप पाणी उकळून त्यात ग्रीन टी बॅग बुडवून ठेवावी. तासभर टी बॅग तशीच पाण्यात राहू द्यावी. टी बॅग थंड झाल्यावर ती फोडावी आणि त्यातील ग्रीन टी बाजूला काढावा. एका वाटीत ग्रीन टी घ्यावा. त्यात बेकिंग सोडा आणि मध घालावं. मिश्रण घट्ट वाटल्यास त्यात पाण्याचे काही थेंब टाकावेत. मिश्रण एकजीव करुन घ्यावं. ग्रीन टी फेसपॅक चेहेऱ्याला लावण्याआधी चेहेरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहेऱ्यावरची रंध्र मोकळी होतात त्याचा फायदा ग्रीन टीमधील गुणधर्म त्वचेच्या आत जाण्यास मदत होते. चेहेरा स्वच्छ धुतल्यानंतर तो रुमालानं टिपून घ्यावा. ग्रीन टीचं मिश्रण हळूनवार मसाज करत चेहेऱ्यास लावावं. ग्रीन टीचा फेसपॅक चेहेऱ्यास मसाज करत लावल्यानं चेहेऱ्यावरील मृत पेशी निघून जातात. त्वचेची रंध्रं खोलवर स्वच्छ होण्यास मदत होते. ग्रीन टी फेस मास्क चेहेऱ्यावर 15 मिनिटं राहू द्यावा. नंतर चेहेरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावा. ग्रीन टीचा फेस मास्क तयार करताना सामग्री थोडी बदलली तरी चालते. बेकिंग सोड्याऐवजी कधी पिठीसाखर वापरावी. मधाच्या जागी लिंबाचा रस वापरला तरी चालतो.
बाहेर दुकानात तयार ग्रीन टी फेस मास्क मिळतात. ते घेताना सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे ना, त्यात 100 टक्के ग्रीन टी आहे ना याची खात्री करावी. तसेच हे तयार ग्रीन टी फेस मास्क सुगंध आणि पॅरॅनिन्स विरहित असावेत.