Join us  

फेशियलसाठी पार्लरमध्ये जायला वेळ नाही? गुढी पाडव्यासाठी घरीच १० मिनिटांत करा फेशियल- चेहऱ्यावर येईल ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2023 12:34 PM

Gudhi Padwa 2023 Special How To Do Facial at Home : घरच्या घरी नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन हे फेशियल कसे करायचे पाहूया...

गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. वर्षातील एक महत्त्वाचा सण असलेल्या या दिवशी आपण कुटुंबासोबत गुढी उभारतो, गोडाधोडाचं जेवण करतो आणि मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यासोबत हा दिवस आनंदात घालवतो. सणाच्या निमित्ताने देवाला जाताना किंवा घरी पाहुणे येणार असतील आपल्याला कोणाकडे जायचे असेल तर आपण छान दिसावे असे प्रत्येकीला वाटते (Gudhi Padwa 2023 Special How To Do Facial at Home). 

चेहरा ग्लोईंग आणि फ्रेश दिसावा यासाठी चेहऱ्याला फेशियल करणे गरजेचे असते. पण रोजच्या धावपळीत पार्लरमध्ये जायला वेळ होईलच असे नाही. अशावेळी सणालाही आपण सगळ्यांमध्ये उठून दिसावे असे वाटत असेल तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने फेशियल करता येते. पाडवा उन्हाळ्यात येत असल्याने चेहऱ्यावरचे टॅनिंग कमी होणारे फेशियल करायला हवे. घरच्या घरी नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन हे फेशियल कसे करायचे पाहूया...

१. क्लिंजिंग 

१ चमचा मसूर डाळ पावडर आणि १ चमचा बेसन पावडर घ्यावी. यात १ चमचा पाणी घालून चांगली पेस्ट तयार करायची. या क्लिंजरने चेहऱ्यावर एक मिनीटे मसाज करायचा. 

२. वाफ घेणे 

क्लिंजिंगनंतर वाफ घेणे ही चेहरा क्लिन होण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. यामुळे चेहऱ्याची रंध्रे ओपन होतात आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. यामध्ये थेट वाफ घेणे किंवा नॅपकीन गरम पाण्यात बुडवून तो पिळून त्याने चेहरा पुसणे असेही करु शकतो. 

३. स्क्रबिंग 

यासाठी १ चमचा मसूर डाळीचे पीठ, १ चमचा पिठीसाखर आणि अर्धा चमचा मध घालावा. हे सगळे एकजीव करुन चेहऱ्यावर सगळ्या ठिकाणी चांगले स्क्रब करायचे. यानंतर चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवायचा. 

(Image : Google)

४. फेस मसाज

१ चमचा कोरफडीचा गर आणि त्यामध्ये अर्धा चमचा बदाम तेल घालावे. हे जेल वापरुन चेहऱ्याला वरच्या बाजुने चांगला मसाज करायचा आहे. यामुळे त्वचा सैल व्हायला लागली असेल किंवा जास्त टॅन झाली असेल तर ती टाईट होण्यास आणि त्याचे टॅनिंग निघण्यास चांगली मदत होते. 

५. फेस पॅक 

अर्धा चमचा मसूर डाळीची पावडर आणि अर्धा चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घ्यायची. यामध्ये १ चमचा दही घालायचे आणि हे सगळे एकत्र करुन हा फेस पॅक चेहऱ्यावर व्यवस्थित लावायचा. १५ मिनीटांनी हा पॅक धुवून टाकायचा आणि त्यानंतर त्वचेला मॉईश्चराईज करायचे. यामुळे त्वचा एकदम ग्लोईंग दिसण्यास मदत होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सगुढीपाडवा