घरांतील काही खास फंक्शन, सण समारंभ, पार्टी असली की आपण आवर्जून मेकअप करतोच. मेकअप केल्यामुळे आपल्या सौंदर्यात अधिकच भर पडते. मेकअप करताना काही गोष्टींची आपण जरुर काळजी घेतली पाहिजे. मेकअपमुळे सौंदर्यात जशी भर पडते तसेच तो बिघडला तर तितकाच विद्रुप दिसतो. मेकअप करताना मेकअप ब्रश हा सगळ्यांत महत्वाचा घटक असतो. मेकअप करताना योग्य पद्धतीच्या मेकअप ब्रशची निवड करणे महत्वाचे असते.
मेकअप ब्रश चांगला व उत्तम क्वालिटीचा असेल तर मेकपदेखील खूप सुंदर होतो. काहीवेळा आपल्या मेकअप किटमध्ये बरेच ब्रश असतात परंतु त्याचा योग्य वापर कसा व कुठे करावा हे काहीजणींना माहित नसते. योग्य मेकअप ब्रश कसे निवडावे? ब्रशची खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? मेकअप ब्रशची स्वच्छता कशी करावी यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ब्यूटी एक्स्पर्ट डॉक्टर भारती तनेजा यांच्याकडून समजून घेऊयात(Guide To Buying & Caring Makeup Brushes).
१.मेकअप ब्रश कसे असले पाहिजेत ?
सध्या बाजारांत वेगवेगळ्या आकाराचे, जाड, पातळ, मऊ असे अनेक प्रकारचे मेकअप ब्रश विकत मिळतात. यातील काही मेकअप ब्रश हे प्राण्यांच्या केसांपासून तयार केले जातात. परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांना प्राण्यांच्या फरपासून बनविलेले मेकअप ब्रश वापरायला आवडत नाहीत. यासाठी आता बाजारांत रियल ह्युमन हेयरपासून बनविलेले ब्रश देखील सहज उपलब्ध होतात. काही प्रकारचे मेकअप ब्रश हे खोट्या आर्टिफिशियल केसांपासून तयार केलेले असतात. आपण मेकअप करताना ब्युटी प्रॉडक्ट्स सहजपणे आपल्या चेहऱ्यावर लावता येतील अशा ब्रशचा वापर करावा. ब्रश आकाराने फारच मोठे किंवा छोटे नसावे, ब्रश आपल्याला व्यवस्थित हातात पकडून मेकअप करता येईल असे असावेत.
२. मेकअप ब्रशची खरेदी करताना या गोष्टी कायम लक्षात ठेवा...
- मेकअप ब्रश खरेदी करताना, मेकअप ब्रशला असणाऱ्या केसांची क्वालिटी चेक करुन मगच ते विकत घ्यावे.
- मेकअप ब्रश हातात पकडल्यानंतर त्या ब्रशला पकडताना व्यवस्थित ग्रीप आहे की नाही, याची खात्री करुन घ्यावी.
- आपल्या किटमध्ये ज्या मेककप ब्रशची गरज आहे तोच मेकअप ब्रश विकत घ्यावा, उगाच गरज नसताना अनेक मेकअप ब्रश खरेदी करुन मेकअप किटमध्ये गर्दी करु नये.
- प्रत्येक अवयवांचा मेकअप करण्यासाठी प्रत्येकाचा वेगवेगळा ब्रश ठेवा.
- आयब्रो ब्रश, ब्लशर ब्रश व फाउंडेशन ब्रश असे ३ मुख्य मेकअप ब्रश आपल्या मेकअप किटमध्ये जरुर ठेवावे.
३. मेकअप ब्रशची स्वच्छता कशी ठेवावी?
मेकअप करुन झाल्यानंतर मेकअप ब्रश स्वच्छ करुन ठेवणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी आपण माईल्ड शॅम्पू किंवा साबणाचा वापर करु शकता. काहीवेळा वारंवार ब्रश धुतल्यामुळे ते खराब होऊ लागतात. अशा परिस्थितीत, बाजारांत मेकअप ब्रश स्वच्छ करण्याचे खास सोल्युशन्स विकत मिळतात. या सोल्युशन्समध्ये हे मेकअप ब्रश काही काळ भिजत ठेवावेत व त्यानंतर स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यावेत. यामुळे आपले मेकअप ब्रश स्वच्छ होण्यांस मदत होईल. जेव्हा कधी आपण हे मेकअप ब्रश वापराल त्यानंतर ते स्वच्छ करायला विसरु नका. मेकअप ब्रश स्वच्छ धुवून झाल्यानंतर ते संपूर्णपणे सुकल्याशिवाय परत मेकअप किटमध्ये ठेवू नयेत. ब्रश संपूर्ण सुकले आहेत, याची खात्री करुन मगच ते परत किटमध्ये ठेवावे. मेकअप किटमध्ये ब्रश ठेवताना ते व्यवस्थित सरळ राहतील असे ठेवावेत. ब्रश ठेवतांना त्यांचे पुढील केस कुठे दुमडत नाहीत ना, हे पाहावे. ब्रशचे केस वारंवार दुमडत असतील तर त्याचा आकार बदलून, केस तुटण्याची शक्यता असते.
४. मेकअप ब्रशचा योग्य पद्धतीने उपयोग कसा करावा ?
मेकअप करतांना, ब्रशला एकावेळी एकच ब्यूटी प्रॉडक्ट्स लावावे. जर मेकअप ब्रशला एका वेळी अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्स लावले तर आपल्याला ते व्यवस्थित चेहेऱ्यावर लावता येणार नाहीत. मेकअप ब्रशवर कमीत कमी प्रमाणांत ब्यूटी प्रॉडक्ट्स घेऊन मगच ते चेहेऱ्यावर लावावेत.