केस गळणं ही मोठी समस्या. ही समस्या केवळ तेल शाम्पू लावून सुटत नाही. केस गळती वाढली याचा अर्थ आहारात बदल करण्याची गरज असते असं लखनऊ येथील वेलनेस डाएट क्लिनिकच्या आहार तज्ज्ञ डाॅ. स्मिता सिंह म्हणतात. रोज थोडे केस गळणं ही सामान्य बाब असते मात्र केस गळण्याचं प्रमाण वाढल्यास आहाराची पथ्यं पाळायलाच हवीत. डाॅ. स्मिता सिंह केस गळतीची समस्या रोखण्यासाठी आहारात 4 बदल करण्याचा सल्ला देतात.
Image: Google
1.केस गळण्याचं प्रमाण वाढलं असल्यास आहारात मैद्याचे पदार्थ खाणं टाळायला हवेत. मैद्याचे शंकरपाळे, बिस्किटं, भटुरे, पराठे, मैद्याच्या नूडल्स खाणं टाळायला हवं. मैद्याच्या बिस्किटांऐवजी मल्टीग्रेन बिस्किटं खायला हवीत.
Image: Google
2. मीठ आणि दूध ही आहारातली अशी जोडी आहे ज्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं. दुधासोबत पराठे खाणं, दुधासोबत बिस्किटं खाणं हे विरुध्द अन्न ठरतं. यामुळे शरीराला दुधाचं पोषण मिळत नाही. तसेच या विरुद्ध अन्नामुळे पचनाच्या आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
Image: Google
3. पदार्थ तळून खाणं ही केसांच्या आरोग्यासाठी चुकीची बाब आहे. केस गळती रोखण्यासाठी पदार्थ तळून खाण्याऐवजी शॅलो फ्राय करुन खाण्याचा सल्ला डाॅ. स्मिता सिंह देतात. बटाट्याचे पदार्थ सतत गरम करुन खाण्यामुळे केसांचं पोषण कमी होतं आणि केस गळणं वाढतं. तळलेल्या पदार्थांसोबतच आहारातील तेलाचं प्रमाण कमी करायला हवं. भाज्यांमध्ये तेलाचं प्रमाण कमी करायला हवं.
Image: Google
4. शीतपेयं पिणं ही केसांसाठी घातक बाब आहे. शीतपेयात सोड्याचं प्रमाण जास्त असतं. जास्त प्रमाणात सोडा असलेली शीतपेयं पिणं शरीरास तसेच केसांच्या आरोग्यासही घातक असतं. शीतपेयं जास्त प्रमाणात प्याल्यास शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. इन्सुलिनचा स्तर वाढतो. यामुळे हदयाचं आरोग्य जसं धोक्यात येतं त्याचप्रमाणे केसांशी निगडित समस्याही वाढतात.
Image: Google
केस गळती रोखण्यासाठी आहारातून कोणते पदार्थ वजा करायला हवेत यासोबतच कोणते पदार्थ आवर्जून खायला हवेत याबद्दलही डाॅ. स्मिता सिंह यांनी मार्गदर्शन केलं आहे. आहारात ई जीवनसत्वंयुक्त पदार्थांचा समावेश करावा. ताजी फळं, भाज्या, आवळा, कच्चा कांदा, दही, बदाम या गोष्टींचा आहारात अवश्य समावेश केल्यास केस निरोगी राहातात.