आलं घातलेला चहा किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये, पदार्थांमध्ये टाकलेले आले त्या पदार्थांची चव आणि स्वाद या दोन्ही बदलून टाकते. आलं घालून केलेला चहा तर चहाप्रेमींचा ऑल टाईम फेव्हरेट पदार्थ. सर्दी, पडसे, कफ, खोकला असे आजार कमी करण्यासाठी अद्रकाचा काढा घेतात किंवा चहामध्ये आलं टाकून घेतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. आरोग्यासाठी आल्याचा उपयोग कसा करायचा, हे आपण जाणतोच. आता याच आल्याचा उपयोग सौंदर्यासाठी कसा करायचा ते जाणून घेऊया. आल्यामध्ये असे अनेक घटक आहेत, जे केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. आल्याचा वापर केल्यामुळे केसगळती तर थांबतेच पण नव्याने केस उगवू लागतात, असेही हा उपाय नियमितपणे करणाऱ्या काही जणांनी सांगितले आहे.
केसांसाठी आले उपयुक्त का?- आल्याचा वापर केल्यामुळे डोक्याच्या त्वचेतील रक्ताभिसरणास गती मिळते आणि त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.- स्काल्पची पीएच लेव्हल सांभाळून ठेवण्यासाठी आल्याची मदत होते. त्यामुळे केसात कोंडा होण्याची समस्यादेखील खूप कमी होते.
केसांच्या वाढीसाठी असा करा आल्याचा वापर१. आल्याचा रससगळ्यात आधी तर आल्याच्या वरचे साल काढून टाका. त्यानंतर त्याच्या बारीक बारीक फोडी करा आणि त्या मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्या. एकदम पातळ पेस्ट केली त्यातून आल्याचा रस काढून घ्या. ज्या भागात केस विरळ आहेत, त्या भागात हा रस लावा. साधारणपणे अर्धा ते पाऊण तासानंतर केस धुवून टाका. केसांची वाढ चांगली होण्यासाठी आणि विरळ जागी नव्याने केस येण्यासाठी हा उपाय अतिशय चांगला आहे.
२. आले, लिंबू आणि तिळाचं तेलआले किसून किंवा मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस काढून घ्या. आल्याचा रस चार टेबलस्पून घ्या. यामध्ये एक टेबलस्पून लिंबाचा रस टाका आणि तीन टेबलस्पून तिळाचं तेल टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि त्याने तुमच्या डोक्याच्या त्वचेला हलक्या हाताने मालिश करा. अर्धा किंवा पाऊण तास हे मिश्रण असेच डोक्यावर राहू द्या आणि त्यानंतर तुमचा नेहमीचा शाम्पू वापरून केस धुवून टाका.
३. अद्रक आणि नारळाचं तेलबहुसंख्य घरांमध्ये केसांना खोबरेल तेल लावले जाते. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी अतिशय सोपा आहे. खोबरेल तेल आणि आले यांचे गुण एकत्र आल्यामुळे केसांची चांगली वाढ होण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तर आल्याचा रस काढून घ्या. साधारणपणे तीन टेबलस्पून आल्याचा रस आणि एक टेबलस्पून नारळाचं तेल एकत्र करा. यामध्ये थोडा काकडीचा रस टाकला तरी चालतो. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून तुमच्या डोक्याला लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.
४. आलं आणि कांद्याचा रसकांद्याचा रस केसांसाठी पोषक असतो. कांद्यामुळेही केसांची चांगली वाढ होते. आता याला अद्रकाच्या रसाची जोड द्या आणि असे मिश्रण केसांना लावा. यामुळे केसांमध्ये काेंडा होण्याची समस्या कमी होते आणि केसांना चांगले पोषण मिळून त्यांचे आरोग्य सुधारते. हा उपाय करण्यासाठी तीन टेबलस्पून कांद्याचा रस आणि तीन टेबलस्पून अद्रकाचा रस घ्या. हे मिश्रण हलक्या हाताने तुमच्या केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवून टाका.
५. आलं आणि ऑलिव्ह ऑईलज्यांच्या डोक्यात खूप कोंडा आहे आणि ज्यांचे केस खूपच कोरडे आणि रुक्ष झाले आहेत, त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय चांगला आहे. हा उपाय करण्यासाठी तीन टेबलस्पून आल्याचा रस आणि एक टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल एका बाऊलमध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर हळूवार मसाज करत हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावा. अर्धा ते पाऊण तास हे मिश्रण असेच डोक्यावर राहू द्या आणि त्यानंतर तुमच्या नेहमीच्या शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा हा उपाय निश्चित करून पहावा.