केसांना तेल लावणे हे केसांच्या वाढीसाठी, केस जास्त गळू नयेत म्हणून आणि केसांच्या मुळांना चांगले पोषण मिळावे यासाठी अतिशय उपयुक्त असते. बाजारात विविध प्रकारची तेलं येतात. अमक्या तेलामुळे केसांना हा फायदा होईल, तमक्या तेलामुळे केसांची ही समस्या दूर होईल असे अनेक दावे विविध कंपन्यांद्वारे केले जातात. मात्र केसांची उत्तम वाढ व्हावी आणि केस दिर्घकाळ चांगले राहावेत यासाठी पारंपरिक खोबरेल तेल सर्वात चांगले असते हे नक्की (Hair Care Tips). खोबरेल तेलात व्हिटॅमिन्स आणि फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने केसांच्या वाढीसाठी आणि चांगले पोषण होण्यासाठी खोबरेल तेल सर्वोत्तम आहे. केसांतला कोंडा, रुक्षपणा, खाज, केस पांढरे होणे, केस गळणे यांसारख्या समस्यांवर खोबरेल तेल अतिशय गुणकारी ठरते. खोबरेल तेलाचे केसांसाठी होणारे फायदे पाहूया (Benefits of Coconut Oil for hair Growth)...
१. केसांची वाढ
खोबरेल तेलामध्ये असणारे फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन्स केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी अतिशय फायदेशीर असतात. आपले केस चमकदार आणि दाट, लांबसडक असावेत असे बहुतांश महिलांना वाटते. मात्र प्रदूषण, हवामान, विविध रासायनिक उत्पादनांचा वापर यांमुळे केस रुक्ष आणि खराब होतात. अशावेळी केसांना नियमितपणे खोबरेल तेल लावल्यास केसांतील मॉइश्चर टिकून राहण्यास मदत होते. तसेच हवेमुळे केसांवर होणाऱ्या परिणामांपासून केसांचे रक्षण करण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर ठरते.
२. फाटे कमी होण्यासाठी
अनेकदा आपण ठराविक अंतराने केस कापण्याचा कंटाळा करतो. पण आपले केस वाढत जातात तसे ते खालच्या बाजुने कोरडे होत जातात. अन्नातून आणि इतर गोष्टींतून केसांच्या मूळांना मिळणारे पोषण केसांच्या टोकापर्यंत पोहचत नाही. पण तुम्ही केसांना नियमीतपणे खोबरेल तेल लावत असाल तर केसांना फाटे फुटण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते. केसांमध्ये प्रोटीनचे प्रमाण टिकवून ठेवण्याचे काम खोबरेल तेलामुळे केले जात असल्याने केस वाढीसाठी आणि फाटे कमी होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
३. केसांची मुळे मजबूत करण्यास फायदेशीर
खोबरेल तेल हे केसांच्या वाढीसाठी आणि केस दाट होण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. केसांची मुळे, केस मऊसूत व्हावेत, त्यांना चांगले पोषण मिळावे यासाठी खोबरेल तेलाचा चांगला उपयोग होतो. प्रदूषण किंवा इतर गोष्टींमुळे केसांचे नुकसान होऊ नये यासाठी खोबरेल तेलाचा फायदा होतो.
४. भुरभुरे होण्यापासून सुटका
अनेकांचे केस खूप भुरभुरे असतात. आपले केस सिल्की आणि शायनी असावेत असे आपल्याला कायम वाटते. पण काहींच्या केसांचा पोतच तसा असतो. त्यामुळे काहीही केले तरी केस खूप कोरडे आणि फुगलेले दिसतात. पण खोबरेल तेलामुळे केसांचा पोत चांगला राहण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांचे केस भुरभुरे किंवा कोरडे आहेत त्यांनी नियमितपणे केसांना खोबरेल तेलाने मसाज करायला हवा.