एखाद्यानं चेहेर्यावर त्रासिक हावभाव केल्यास काय एरंडेल तेल पिल्यासारखा चेहेरा करतोय/ करतेय असं म्हटलं जातं. एरंडेल तेलाशी आपली ही ओळख अशी नकारात्मक झाली असली तरी हे तेल आहे मोठ्या गुणाचं. आयुर्वेदात या तेलाला खूप महत्त्व आहे. या तेलात असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे एरंडेल तेलाचा उपयोग केसांची निगा राखण्यासाठी होतो. केस वाढण्यापासून ते डोक्यातला कोंडा घालवण्यापर्यंत केसांशी संबंधित अनेक बाबींवर एरंडेल तेल उपयोगी पडतं. एरंड्याचं तेल हे एरंड्याच्या बिया रगडून काढलं जातं.
छायाचित्र- गुगल
एरंडेल तेल केसांसाठी फायदेशीर कसं?
* एरंडेल तेलात ओमेगा 6 आणि ओमेगा 9 फॅटी अँसिड मोठ्या प्रमाणात असतं. एरंडेल तेल केसांना लावल्यास केस मऊ होतात आणि केसातला कोरडेपणा नाहीसा होऊन केसांचं मॉश्चरायझिंग होतं. एरंडेल तेलामुळे केसांमधे आद्र्ता निर्माण होते . यातील अमीनो अँसिडमुळे केस नैसर्गिकरित्या मऊ होण्यास मदत होते. केस धुण्यापूर्वी 15 मिनिटं आही केसांना एरंडेल तेल लावावं. एरंडेल तेलाचे काही थेंब आपण वापरत असलेल्या कंडीशनरमधे टाकून ठेवावेत आणि ते कंडीशनर वापरावं. तसेच एरंडेल तेल, कोरफडीचा गर, मध आणि लिंबाचा रस एकत्र करुन ते मिश्रण केसांच्या मुळांना लावावं. अर्ध्या तासानंतर केस धुवावेत.
छायाचित्र- गुगल
* केसांचं आरोग्य हे केसांच्या मुळांच्या अर्थात टाळूच्या आरोग्यावर अवलबून असतं. टाळू स्वच्छ असणं हे केस चांगले होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. केसात कोंडा असल्यास, सतत खाज येत असल्यास एरंडेल तेल केसांना लवावं. एरंडेल तेलात जीवाणूविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असल्यानं केसांच्या मुळांचं व्यवस्थित पोषण होतं. एरंडेल तेलामुळे केसातील जीवाणू आणि बुरशीजन्य घटकांचा संसर्ग कमी होतो. यासाठी एरंडेल तेल घेऊन केसांच्या मुळाशी हलक्या हातानं मसाज करावी. अध्र्या तासानंतर केस धुवावेत. किंवा एक मोठा चमचा एरंडेल तेल आणि ऑलिव ऑइल यांच्या मिश्रणात अर्ध्या लिंबाचा रस घालवा. हे मिश्रण अर्धा तास केसांवर लावून नंतर केस धुवावेत.
* ई जीवनसत्त्व आणि फॅटी अँसिडचं प्रमाण एरंडेल तेलात जास्त असतं.केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी हे घटक खूप महत्त्वाचे असतात. यामुळे टाळूतील रक्तप्रवाह सुधारतो. केसांची मुळं घट्ट होतात आणि केस चांगले वाढतात. या तेलातील ई जीवनसत्त्व केसांचं फ्री रॅडिकल्समुळे होणार्या नुकसानीपासून केसांचं रक्षण करतं.या फ्री रॅडिकल्समुळे केस झडतात. एरंडेल तेल जर नियमित लावलं तर केस गळती थांबते. लहान वाटीत एरंडेल तेल आणि खोबर्याचं तेल एकत्र करुन घ्यावं. थोडं थोडं तेल हातात घेऊन टाळूला हळूवार मसाज करत लावावं. त्यानंतर डोक्याला शॉवर बॅग लावावी. दुसर्या दिवशी सकाळी केस धुवावेत.
छायाचित्र- गुगल
* केस खराब करणारी आणखी एक समस्या म्हणजे केसांना उंदरी लागणं. केसांना दोन तोंडं फुटणं. या समस्येवर एरंडेल तेल ह उत्तम आणि नैसर्गिक उपाय आहे. हे तेल टाळूला नीट लावल्यास केस कोशिका मऊ होण्यास मदत होते. या समस्येसाठी एरंडेल तेल ऑलिव्ह ऑइलमधे मिसळून लावावं. ऑलिव्ह ऑइलमुळे केस चिपकू होत नाही तसेच एरंडेल आणि ऑलिव्ह ऑइल यांचे गुणधर्म दोन तोंडं फुटलेल्या केसांवर प्रभावी काम करुन ही समस्या घालवतात. हे तेल लावल्यानंतर अर्ध्या तासानं केस धुवावेत.