कारल्याचं नाव काढलं की तोंड कसंनुसं होतंच. कारल्याची कडू चव नकोशी वाटते. पण कारलं हे आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. कारल्याची भाजी खाणं, सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण केवळ कडू चवीमुळे कारलं खाणं जिवावर येतं. केसांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठीही कारल्याचा रस खूप उपयोगी ठरतो. केसांवर तर प्रत्येकीचं प्रेम असतं. पण परत कारल्याची कडू चव आडवी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण केसांच्या फायद्यासाठी कारल्याचा रस प्यायचा नसून तो केसांना लावायचा आहे. हे वाचून अनेकजणी एका पायावर कारल्याचा रस केसांना लावायला तयार होतील. नाही का? कारल्याचा रस केसांसाठी कसा प्रभावी आहे हे एका अभ्यासाद्वारे सांगितलं गेलं आहे.
काय म्हणतो अभ्यास?
फार्माकोग्नॉसी आणि फाइटोकेमिस्ट्री जर्नलनुसार कारल्यात बी1, बी2, बी3 आणि क ही महत्त्वाची जीवनसत्त्वं असतात. तसेच कारल्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलेट, फॉस्फरस, जस्त आणि मॅग्नीज ही महत्त्वाची खनिजं असतात. कारल्यातील हे सर्व घटक केसांसाठी खूप फायदेशीर असतात.
छायाचित्र:- गुगल
कारल्याच्या रसाचे फायदे
1. केस छोटे असो की मोठे ते छान चमकदार असायला हवेत. केस चमकदार होण्यासाठी कारल्याचा रस काढून तो आपल्या केसांना लावावा. कारल्याचा रस केसांना लावल्यानंतर हा रस डोक्यात पूर्ण शोषला गेल्यानंतर केस धुवावेत. केस धुतल्यानंतर आधीपेक्षा आपले केस चमकदार झाल्याचं आपल्याला दिसेल. हा अनुभव कारल्याचा रस पहिल्यांदा केसांना लावला तरी येतो.
2. केस गळण्याची समस्या असेल तर कारल्याचा रस थोड्या वेगळ्या पध्दतीनं लावावा. कारल्याच्या रसात थोडी साखर मिसळावी आणि मग हा रस केसांना लावावा. हा प्रयोग काही महिने नियमित केल्यास केस गळण्याचं प्रमाण बरंच नियंत्रणात येतं. कारल्याचा रस अशा पध्दतीनं केसांना लावल्यास केसांची मुळं पक्की होतात आणि केस गळणं कमी होतं.
3. केस धुतले तरी ते खूपच तेलकट आणि चिपचिपे दिसण्याची समस्या अनेकींना असते. याचं कारण केसांच्या मुळाशी नैसर्गिक तेल निर्माण होण्याचं प्रमाण जास्त असतं. पण पावसाळ्यासारख्या ऋतुत केसांचा तेलकटपणा हा विचित्र दिसतो आणि त्रासदायकही ठरतो. यासाठी कारल्यचा रस उपयोगी पडतो. केसांचा तेलकटपणा घालवण्यासाठी आधी कारल्याचा रस काढून घ्यावा. त्यात थोडं अँपल सायडर व्हिनेगर घालावं. कारल्याचा हा रस केसांच्या मुळांशी लावावा. हा प्रयोग जर आठवड्यातून दोन वेळा केल्यास केसांच्या मुळाशी निर्माण होणारं अतिरिक्त तेलाचं प्रमाण कमी होतं. केसांच्या मुळाशी जास्तीचं तेल निर्माण झाल्यानं केस फक्त तेलकटच दिसतात असं नाही तर केसात कोंडा होतो, केस गळतातही. पण कारल्याचा रस लावल्यास ही समस्या दूर होते.
छायाचित्र:- गुगल
4. केसात कोंडा असल्यास केस खराब होतात. काहीजणांच्या बाबतीत केसात कोंडा असण्याची समस्या वर्षभर असते. कोंड्याचा प्रतिकार करु शकणार्या कितीही गोष्टी वापरल्या तरी कोंडा कमी होत नाही. त्यांच्यासाठी कारल्याचा रस उत्तम उपाय आहे. जर आपला टाळू ( केसांची मुळं) कोरडा आणि खडबडीत असेल तर कारल्याचे तुकडे करावे आणि हे तुकडे केसांवर घासावे. कारल्यानं केसांचा मसाज केल्यानंतर मग कारल्याचा रस केसांना लावावा. या उपायाचा केसातड्या कोंड्यावर बराच परिणाम होतो.
5. हल्ली केस अकाली पांढरे होण्याची समस्या विविध कारणांमुळे वाढली आहे. पण ताजी कारली आणून त्याचा रस काढून तो जर नियमित केसांना लावल्यास केस पांढरे होण्यापासून वाचतात. तसेच ज्याचे केस पांढरे झाले आहेत त्यांनाही कारल्याचा रस केसांना लावल्यास फायदा होतो. आठवड्यातून एकदा कारल्याचा रस केसांना लावल्यास केस आणखी पांढरे होण्याचे थांबतात.