केसांचं सौंदर्य जपण्यासाठी आता विविध उत्पादनं आणि साधनं आहेत. केस सुंदर करण्यासाठी ती मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. शाम्पू, सिरम, कंडिशनर, हेअर केअर टूल्स वापरत असूनही केस रुक्ष होत असल्याच्या तक्रारी अनेकींच्या आहेत. विशेषत: थंडीमधे केस रुक्ष होण्याची समस्या वाढते. त्यातच ज्यांचे केस कोरडे ते तर या काळात आणखीनच कोरडे होतात, राठ दिसतात. यामुळे केस पिंजारल्यासारखे दिसतात. एवढे हेअर केअर प्रोडक्टस वापरुनही केस सुंदर का दिसत नाही हा प्रश्न पडतो. आपले केस रुक्ष होण्यामागे केवळ हवामान, प्रदूषण एवढेच घटक कारणीभूत असतात असं नाही. आपण केसांची काळजी घेण्याच्या नावाखाली करत असणार्या चुका या केसांची रुक्षता वाढवण्यास कारणीभूत ठरतात. म्हणजे आपण करत असलेले उपाय हेच केसांसाठी अपाय ठरतात,केसांचं नुकसान करतात. तेव्हा उपायात दडलेले अपाय समजून घेतले तर केस खराब का झाले? कोरडे का झाले ? या प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळतील.
Image: Google
केसांचं सौंदर्य बिघडवणार्या आपल्या चुका
1. केस चांगले ठेवणे म्हणजे सतत धुणे, शाम्पू करणं असाच अनेकींचा समज असतो. तो किती चुकीचा असतो हे शाम्पूच्या अति वापरानं केस कोरडे झाल्यानंतर लक्षात येतं. केस स्वच्छ ठेवण्यासाठी केस धुणं ही आवश्यक बाब आहे. पण केस धुताना केसातील धूळ, घाण ही जशी निघून जाते तसेच केसाच्या मुळांशी असलेले पोषक तत्त्वंही शाम्पू आणि पाण्यानं निघून जातात. केसांची निगा राखण्यासाठी आठवड्यातून दोनदा शाम्पू लावून केस धुणं यात चूक काही नाही. पण रोजच केसांना शाम्पू करुन धुण्यानं केसातील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस कोरडे आणि रुक्ष दिसतात. केसांना कोरडं होण्यापासून वाचवण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस शाम्पूनं धुवावेत. तज्ज्ञ सांगतात की केसांना कधीही तीव्र स्वरुपाचे शाम्पू न वापरता सौम्य प्रकारच्या शाम्पूनं केस धुवावेत.
2. शाम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनर लावणं आवश्यक असतं. शाम्पू केल्यानंतरही कंडिशनर लावलं नाही तर केसांमधली शुष्कता वाढते. पण शाम्पू नंतर व्यवस्थित कंडिशनिग करुनही केस कोरडे होतात कारण केसात तेलाचा अभाव. केसांना तेल लावल्यावर केस चिपकू चिपकू दिसतात म्हणून केसांना तेल लावणं टाळलं जातं. पण तेल न लावण्याची फॅशन केसांच्या सौंदर्याच्या मुळावर आघात करते. केसांना तेल न लावल्यानं केसांच्या मुळांना न पोषण मिळतं ना आवश्यक आद्रता. केस रुक्ष होण्यापासून वाचवायचे असतील तर केसांना आठवड्यातून किमान दोनदा तरी तेल लावायला हवं, केसांच्या मुळांशी मसाज करायला हवा.
Image: Google
3. केस धुतल्यानंतर ते सुकवायची खूप घाई होते. त्यामुळे रुमालानं रगडून रगडून केस पुसले जातात. अशा पध्दतीने केस पुसल्याने केसांच्या आतल्या भागात असलेल्या केशपेशींची हानी होते. या केशपेशी कोरड्या होतात त्याचा परिणाम म्हणजे केस राठ, रुक्ष, कोरडे होतात तज्ज्ञ सांगतात केस धुतल्यानंतर ते थोडेसे रुमालानं टिपून घ्यायचे असतात. ते नैसर्गिकपणे सुकणंच गरजेचं असतं. तसेच केस ओले असताना विंचरण ही केसांचं आरोग्य आणि सौदर्य या दृष्टिकोनातून हानिकारक बाब आहे.
4. केसांवर चुकीची उत्पादनं वापरली तरी केस रुक्ष होतात. चुकीच्या उत्पादनांमुळे केसांचं नुकसान तर होतंच पण केस रुक्ष होतात, तुटतात, पातळ होतात.
Image: Google
5. केस सुंदर दिसण्यासाठी विविध प्रोडक्टस आज बाजारात उपलब्ध आहेत. केस कुरळे करण्यासाठी, कुरळे केस सरळ दिसण्यासाठी, केसांना विविध प्रकारे वळवण्यासाठी केसांसाठीची उपकरणं वापरली जातात. पण केस ही अतिशय नाजूक बाब असते. ही उत्पादनं वापरताना केसांना सोसवेल असं तापमान आपण राखतोय का याकडे होणारं दुर्लक्ष केसांचं नुकसान करतं. अल्पकाळाच्या सौंदर्यासाठी आपण दीर्घकाळासाठी केस खराब होण्याचा धोका पत्करतो असं सौंदर्यतज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
6. केस सतत विंचरणं, जोरजोरात विंचरणं, चुकीच्या दिशेनं विंचरणं ,केस ओले असतानाच विंचरणं हा केस विंचरण्याबाबत होणार्या चुका केसपेशींचं नुकसान करतात यामुळे केस रुक्ष तर होतातच शिवाय तुटतातही. केस कंगव्यानं विंचरतांना आधी टोकाशी विंचरुन गुंता काढून घेतला आणि मग हलक्या हातानं मुळापासून टोकापर्यंत केस विंचरले तर केस नीट विंचरले जातात आणि जास्त तुटतही नाही.