Join us  

Hair care : फक्त ३ गोष्टी; केसांच्या समस्या होतील कमी, सुंदर मुलायम केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 6:44 PM

Hair care : आपण रोजच्या धावपळीत स्वत:कडे, आपल्या सौंदर्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही. पण त्यामुळेच आपल्या त्वचेची, केसांची वाट लागते. मात्र काही छोटे बदल आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरु शकतात.

ठळक मुद्देकेसांचे घनदाट मुलायम तर सौंदर्य खुलेल... नाहीतर...केस चांगले हवे तर काळजी घ्यायला हवी...केसांच्या सौंदर्यासाठी टिप्स...

केस हा आपल्या सौंदर्यातील महत्त्वाचा भाग असतो. आपले केस थोडे कोरडे झाले किंवा गळायला लागले, त्यांत कोंडा झाला की आपण अस्वस्थ होतो. केस छान तर आपण छान Hair care. पण केस छान लांबसडक आणि घनदाट हवेत असे वाटत असेल तर त्याची योग्य पद्धतीने काळजीही घ्यायला हवी ना. योग्य आहार, पुरेशी झोप, ताणविरहीत जीवन आणि व्यायाम यांसारख्या गोष्टींचे संतुलन असेल की आरोग्याबरोबरच सौंदर्यही चांगले राहण्यास मदत होते. मात्र कितीही काळजी घेतली तरी वाढते प्रदूषण, केसांवर सतत होणारा वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर यांमुळे केसांचा पोत बिघडला असेल तर वेळीच काळजी घ्यायला हवी. आता केस चांगले ठेवायचे तर कोणत्या गोष्टींकडे आवर्जू लक्ष द्यायला हवे याविषयी सोप्या ३ टिप्स पाहूया...

१. तुमचे केस तुमच्याशी संवाद साधतात, त्यांचे ऐकायला शिका

बाजारात असंख्य कंपन्या आपली वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने घेऊन त्यांचे मार्केटींग करण्यात व्यस्त असतात. अशा कंपन्यांना भुलून तुम्ही आपल्या केसांवर रासायनिक गोष्टींचा मारा तर करत नाही ना याकडे लक्ष द्या. आपल्या केसांची गुणवत्ता ही आपल्या अनुवंशिकतेनुसार आणि आपल्यातील हार्मोन्सवर अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही केवळ वेगवेगळी उत्पादने वापरली म्हणजे तुमचे केस चांगले होतील असे तुम्हाला वाटत असेल तर ते तसे नसते. त्यामुळे तुम्हाला केस आणि केसांची त्वचा याच्याशी निगडित काही गंभीर समस्या झाली आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वेळीच त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगले. तुमचे केस तुम्हाला काही ना काही सांगत असतात, त्यांच्या कंडीशनवरुन तुम्ही नेमकी काय समस्या आहे हे लक्षात घ्या आणि त्यानुसारच उपाययोजना करा. 

२. केसांसाठी शक्य तितकी सौम्य उत्पादने वापरा

आपण बरेचदा उन्हात फिरतो, केसांना कलर करतो, त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करतो, प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याने त्याचाही केसांवर परिणाम होत असतो. अशावेळी शाम्पू, कंडीशनर, सिरम, तेल यांसारखी उत्पादने आपण नियमित वापरत असल्याने ती सौम्य स्वरुपाची असतील याची काळजी घ्या. केसातील आर्द्रता टिकून राहील यासाठी चांगल्या प्रतीचे हेअर मास्क वापरा, केसांना नियमितपणे कोमट तेलाने मसाज करा. केस घट्ट रबराने न बांधता चांगल्या मऊ कापडाच्या रबराने हलके बांधून ठेवा.

३. केस जास्त गळत असतील तर सॅटीनचे पिलोकव्हर वापरा

आपण साधारणपणे कॉटन, रेयॉन किंवा मिक्स कापडाचे पिलो कव्हर वापरतो. पण त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते. त्याऐवजी सॅटीनच्या कापडाची उशी वापरा. ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत होईल. हा वाटायला लहानसा बदल वाटत असला तरी तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे खूप मोठा बदल होऊ शकतो. तसेच तुम्हाला शांत गाढ झोप येत नसेल तरी या उशीमुळे झोपही छान होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी