केसांच्या सर्व समस्यांचं मूळ केसांना मिळणाऱ्या पोषण अभावात असतं. केसांना आवश्यक पोषक घटक मिळाल्यास केस वाढतात, दाट होतात, काळेभोर राहातात आणि चमकतातही. केसांच्या मुळांच्या पोषणाचा विचार करता मोह्ररीचं तेल केसांसाठी उत्तम असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मोहरीच्या तेलामुळे केसांच्या मुळांचं खोलवर पोषण होतं, तेथील रक्तप्रवाह सुधारतो आणि केस मजबूत होतात. मोहरीच्या तेलात लोह, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम, कॅल्शियम हे घटक असतात. तसेच या तेलात अ, ड, ई, के ही जीवनसत्वं असतात. मोहरीच्या तेलात ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण भरपूर असतं. मोहरीच्या तेल केसांना लावल्यानं या तेलातील सर्व गुणांचा लाभ केसांना होतो. म्हणूनच मोहरीच्या तेलानं केसांचं 100टक्के पोषण होतं असं म्हटलं जातं. पण तेल लावताना यात चुका केल्या तर मात्र फायदेशीर ठरु शकणाऱ्या या तेलाचे दुष्परिणामही सहन करावे लागतात.
Image: Google
मोहरीचं तेल प्रकृतीनं उष्ण असतो. हे तेल दाट आणि चिकट असतं. त्यामुळेच मोहरीचं तेल केसांना चुकीच्या पध्दतीनं लावल्यास केस धुतले तरी चपचपीत राहातात, केसांच्या मुळांशी खाज आणि दाह होतो. मग प्रश्न पडतो की पोषण देणाऱ्या मोहरीच्या तेलामुळे केसांचं नुकसान का होतं? मोहरीचं तेल जर चुकीच्या पध्दतीनं लावलं तर केसांवर दुष्परिणाम होतो असं तज्ज्ञ सांगतात, सोबत कोणत्या चुका टाळायला हव्यात, मोहरीचं तेल केसांना कसं लावावं याबद्दल मार्गदर्शनही करतात.
1. मोहरीचं तेल पोषणदृष्ट्या केसांसाठी फायदेशीर असतं. मात्र मोहरीच्या तेलातही भेसळ आढळून येते. केसांना भेसळयुक्त मोहरीचं तेल लावल्यास तोटा होतो. हे टाळण्यासाठी मोहरीचं तेल थेट केसांना लावण्याआधी ते आधी हातावर लावून पाहावं. तेलात भेसळ असल्यास हातावर ॲलर्जी येते. मोहरीच्या तेलातील इम्युनोग्लोबुलिन ई नावाच्या घटकाची ॲलर्जी होण्याची शक्यता असते. ती जर स्किन टेस्टमध्ये त्वचेवर आली नसल्यास केसांसाथीही ते सुरक्षित समजावं असं तज्ज्ञ म्हणतात. केसांना या घटकाची ॲलर्जी झाल्यास केसांच्या मुळाशी खाज येणं, तेथील त्वचा लाल होणं, तोंडावर सूज येणे हे परिणाम दिसतात.
Image: Google
2. मोहरीचं तेल हे मुळात चिकट आणि दाट असतं. केसांच्या मुळांचं पोषण होण्यासाठी टाळूतील रंध्र मोकळी असणं ,स्वच्छ असणं गरजेचे असते. मोहरीच्या तेलातील चिकटपणामुळे टाळुच्या त्वचेची रंध्रं मिटतात. तेथील त्वचेला श्वास घेणं अशक्य होतं. यामुळे त्वचेचा ओलसरपणा कमी होतो. टाळू कडील त्वचा अधिकच तेलकट होते. जर केस तेलकट असण्याची मुळातच समस्या असेल तर मोहरीचं तेल लावणं टाळायला हवं.
3. मोहरीचं तेल पोषक आहे म्हणून लावायला जावं तर केस धुतल्यान्ंतरही तेलकट राहातात. याचं कारण मर्यादेपेक्षा जास्त वेळ मोहरीचं तेल केसात राहिल्यास केस तेलकट राहातात. हे टाळण्यासाठी मोहरीचं तेल रात्रभर लावून ठेवू नये. रात्रभर मोहरीचं तेल लावून ठेवल्यास तेलातील चिकट रेणू केसांच्या मुळांना चिकटतात आणि केसांना शाम्पू लावला तरी मग केसातला चिकटपणा निघत नाही.
Image: Google
4. मोहरीच्या तेलाचा चिकटपणा कमी करण्यासाठी आधी ते गरम करणं आवश्यक असतं. मोहरीचं तेल गरम करुन लावल्यास यातील चिकट रेणू विलग होतात. तेल थोतं. मोहरीचं तेल कोमट स्वरुपात लावल्यास तेलातील रेणू केसांच्या मुळापर्यंत जातात. यामुळे केसांचं चांगलं पोषण होतं. पण मोहरीचं तेल गरम न करताच लावलं तर मात्र ते केसांवरच राहातं, मुळापर्यंत जात नाही.
5. मोहरीचं तेल गरम करुन केसांना लावावं. तेल लावल्यानंतर 15-20 मिनिटांनी केस धुवावेत. केस धुताना केसांना थेट शाम्पू लावल्यास केसांरील तेलाचाचिकटपणा निघत नाही उलट घट्ट होतो. यासाठी मोहरीचं तेल लावलेलं असल्यास केस धुताना आधी पाण्यानं केस धुवावेत. आधी पाण्यानं आणि मग शाम्पूनं केस धुतल्यास केसांवर मोहरीच्या तेलाचा चिकटपणा राहात नाही.