आपले केस लांब आणि घनदाट असावेत असे आपल्याला कायम वाटते. पण प्रदूषण, आपण वापरत असलेली सौंदर्य उत्पादने, आहारातून होणारे केसांचे पोषण आणि इतरही अनेक घटक केसांच्या वाढीसाठी आणि पोत चांगला राहण्यासाठी कारणीभूत असतात. टीव्ही सिरियलमध्ये आणि चित्रपटात दिसणारे अभिनेत्रींचे केस हे त्यावर विविध प्रक्रिया केल्याने इतके चांगले दिसतात (Hair Care Tips) . आपलेही केस तसेच शायनी आणि लांबसडक असावेत यासाठी आपल्याला सतत पार्लरच्या ट्रीटमेंट घेणे शक्य नसते. यासाठी बराच पैसा तर लागतोच पण सतत केमिकल्सचा वापर केल्याने केसांचा पोत आहे त्यापेक्षा खराब होतो. त्यापेक्षा केसांचा पोत सुधारण्यासाठी काही नैसर्गिक उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. घरात सहज उपलब्ध असणारे दही आणि बटाटा हे दोन्ही पदार्थ केसांची वाढ होण्यासाठी आणि ते दाट होण्यासाठी उपयुक्त ठरतात (Home Remedies).
दही आणि बटाट्याचे फायदे
बटाटा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी गोष्ट, त्यामुळे तो घरात उपलब्ध असतोच. यामध्ये व्हिटॅमिन बी, सी, झिंक आणि लोह हे घटक असतात. या घटकांमुळे केसांचे पोषण होण्यास मदत होते. बटाट्यामुळे केसांच्या मूळांशी असणारी घाण साफ होण्यास मदत होते. तर दह्यामध्ये प्रोबायोटीक घटक असतात, ज्यामुळे केस मजबूत होण्यास फायदा होतो. तसेच हल्ली लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. मात्र दह्यामुळे केस पांढरे होण्यापासून त्यांचा बचाव होतो.
असा तयार करा हेअर मास्क
१. एका भांड्यात बटाट्याचा रस काढून तो गाळून घ्या. रस काढण्यासाठी बटाटे किसून घेतले तरी चालतील.
२. यामध्ये दोन ते तीन चमचे दही घाला.
३. हे दोन्ही पदार्थ एकजीव होतील असे एकत्र करा.
असा लावा मास्क
हे मिश्रण केसांच्या मूळांशी आणि केसांना सगळीकडे एकसारखे लावून घ्या. १ तासासाठी हा पॅक केसांवर तसाच ठेवा. त्यानंतर हलक्या शाम्पूने केस धुवा. हा हेअर मास्क तुम्ही आठवड़्यातून १ ते २ वेळा नक्की वापरु शकता. महिन्याभर हा मास्क वापरल्यानंतर तुम्हाला केसांमध्ये बदल दिसून येईल. या मास्कमुळे केस मजबूत होण्याबरोबरच केसगळती कमी होण्यास मदत होईल. तसेच केसांच्या वाढीसाठी आणि केस शाईन करण्यासाठी या मास्कचा अतिशय चांगला उपयोग होईल.