Join us  

Hair care Tips : केसांच्या समस्यांनी हैराण आहात? १ गोष्ट वापरा, मुलायम -चमकदार केसांसाठी सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2022 12:33 PM

Hair care Tips : केसांच्या समस्येसाठी आपण नेहमी काही ना काही उपाय करत असतो, अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीचा वापर केल्यास केसाच्या आणखी काही समस्या दूर होऊ शकतात.

ठळक मुद्देउवा कमी होण्यासाठी तुरटी उपयुक्त ठरते. दुकानात सहज मिळणारी आणि अगदी स्वस्त असलेल्या या वस्तूमुळे केसांच्या बहुतांश समस्या दूर होण्यास मदत होते.

कधी आपले केस खूप कोरडे झाले म्हणून तर कधी केसांत कोंडा झाला म्हणून आपण हैराण होतो. केसांच्या गळण्यामुळे आणि केस कमी वयात पांढरे झाल्याच्या तक्रारी आपल्यातील अनेक जण करतात. आपले केस लांबसडक, मुलायम, दाट हवेत असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. पण काही ना काही कारणांनी केसांच्या तक्रारी उद्भवतातच. कितीही महागडे शाम्पू वापरले किंवा पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट केल्या तरी केसाच्या तक्रारी कमी होत नाहीत (Hair care Tips). सौंदर्यातील महत्त्वाचा भाग असलेल्या केसांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आपण काहीवेळा घरगुती उपायही करतो. कधी केसांना कोरफडीचा गर लावतो तर कधी आवळा पावडर, कधी वेगवेगळ्या तेलांनी मसाज करतो तर कधी आणखी काही.

पण एका अतिशय लहानशा वस्तूने आपल्या केसांच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तुरटी ही अनेकदा आपल्या घरात उपलब्ध असणारी गोष्ट. कधी पाण्यात फिरवण्यासाठी तर कधी पुरुषांना दाढी झाल्यावर लावण्यासाठी तुरटीचा आवर्जून वापर केला जातो. तुरटीमध्ये असणाऱ्या क्लिंजिंग घटकामुळे केसांबरोबरच त्वचा साफ होण्यासही मदत होते. दुकानात सहज मिळणारी आणि अगदी स्वस्त असलेल्या या वस्तूमुळे केसांच्या बहुतांश समस्या दूर होण्यास मदत होते. तुरटीचा दगड मिळतो, हा दगड तव्यावर गरम करुन गार झाल्यावर मिक्सरमधून काढल्यास त्याची पावडर होते. ही पावडर आपण केसांना सहज लावू शकतो. पाहूया तुरटीचा कोणत्या समस्येसाठी नेमका कसा उपयोग करायचा...

(Image : Google)
 १. डोक्यात खाज येत असेल तर 

आपल्याही नकळत आपण अनेकदा डोक्यात खाजवतो. याचे कारण फक्त कोंडा हे एकच नसते. तर उन्हाळ्यामुळे किंवा घाम आल्यामुळे आपल्या त्वचेला खाज येऊ शकते. अनेकदा घाम केसांत तसाच राहिला तर केसात वासही येतो. अशावेळी ही खाज थांबण्यासाठी तुरटी लावणे अतिशय उपयुक्त ठरते. एका बादलीभर पाण्यात तुरटीचे ४ ते ५ खडे घाला. रात्रभर हे पाणी तसेच ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या पाण्याने केस धुवा. तुरटीतील क्लिंजिंग घटकामुळे केसांबरोबरच त्वचा साफ करण्यास याचा चांगला उपयोग होतो. 

२. कोंडा जाण्यासाठी फायदेशीर 

कोंडा म्हणजेच कोरडी त्वचा किंवा त्वचेचे निघालेले पापुद्रे. कोंडा झाला की डोक्यात खाज येते आणि केस सतत तेलकट होतात. इतकेच नाही तर अनेकदा हा कोंडा केसांवर दिसल्याने आपल्याला लाजल्यासारखेही होते. पण यावर केसांना तुरटी लावणे हा सोपा उपाय केल्यास नक्कीच फायदा होतो. केसांना तेल लावताना त्यामध्ये थोडी तुरटीची पावडर टाकल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते. तसेच तसेच आपण घरच्या घरी काही हेअरपॅक लावतो. या हेअरपॅकमध्ये तुरटीची पावडर टाकल्यास त्याचाही कोंडा कमी होण्यास उपयोग होतो. 

(Image : Google)

३. उवा, लिखा कमी होण्यास फायदेशीर 

लहान मुलींच्या केसांमध्ये कधी केस ओले राहिल्याने किंवा कधी आणखी काही कारणांनी उवा, लिखा होतात. एकदा डोक्यात उवा झाल्या की केसांत प्रचंड खाज येते. या उवा कमी होण्यासाठी तुरटी उपयुक्त ठरते. तेल किंवा पाण्यात तुरटीची पावडर एकत्र करावी. ही पेस्ट १० मिनीटांसाठी केसांना लावून ठेवावी. त्यानंतर केस पाण्याने किंवा शाम्पूने धुवावेत. आठवड्यातून तीन वेळा हा प्रयोग केल्यास उवा, लिखांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी