Join us  

Hair Care Tips : गरम फार होतं म्हणून सतत केस वर बांधून ठेवताय? बुचडा बांधता? होतील 4 अपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2022 2:12 PM

Hair Care Tips : उन्हाळ्यात घामानी नको नको होत असल्याने आपण कसलाही विचार न करता थेट केसांचा डोक्यावर अंबाडा बांधून टाकतो. पण त्यामुळे केसांचे काय नुकसान होते पाहूया...

ठळक मुद्देकेसात जाळ्या होणे, केसांचा गुंता काढताना केस तुटणे अशा समस्या उद्भवू शकतात.मुळे ओढली जाणार नाहीत, त्यांना ताण पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या अंगाची इतकी लाहीलाही होते की सतत अंगावर पाणी घ्यावं आणि फॅनखाली किंवा एसीमध्ये बसून राहावं असं वाटते. या दिवसांत आपण सुती आणि पातळ कपडे वापरतो. दिवसातून दोन वेळा आंघोळ करतो. पावडर, परफ्यूम या सगळ्याचा वापर करुन आपल्याला कमीत कमी घाम येईल याची काळजीही घेतो. पण बाहेर उकाडाच इतका असतो की काही केल्या आपल्याला सुधरत नाही आणि घामाच्या धारा सगळीकडून वाहतच असतात. एरवी फक्त काखेत किंवा मानेला येणारा घाम उन्हाळ्यात शरीराच्या सर्वच भागात येतो आणि आपण पार हैराण होऊन जातो. या काळात घाम येण्याच आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आपले केस आणि डोके (Hair Care Tips). 

(Image : Google)

पुरुष लहान केस असल्याने अनेकदा रोजच्या आंघोळीच्या वेळी केस धुतात. पण महिलांचे केस लांब आणि दाट असल्याने त्यांना रोज केस धुणे शक्य नसते. अशावेळी केसांतून वाहणारे घामाचे ओघळ अक्षरश: नको होतात. केस मोकळे सोडणे तर सोडाच घामामुळे केस पार चिकट होऊन जातात. अशावेळी घामापासून काही प्रमाणात सुटका करुन घेण्यासाठी आपण केस वरच्या बाजूला बांधण्याचा पर्याय स्वीकारतो. मानेवर आणि खांद्यावर आलेले केस एरवी आपला लूक चांगला दिसण्यासाठी उपयुक्त असले तरी उन्हाळ्यात घामानी नको नको होत असल्याने आपण कसलाही विचार न करता थेट केसांचा डोक्यावर अंबाडा बांधून टाकतो. आता घाम येऊ नये म्हणून आपण असे केस बांधत असलो तरी त्यामुळे केसांचे काय नुकसान होते हे पाहणे आवश्यक आहे. 

१. केस तुटणे 

केस अनेकदा रबरने घट्ट वरच्या बाजूला बांधले जातात. त्यावेळी ते बांधताना किंवा सोडताना घामाने चिकट झालेले असल्याने केस तुटतात. आपण जोर देऊन रबराने केस बांधत असल्याने ते ओढले जातात आणि त्यांची मुळे नाजूक होऊन केस तुटण्याची समस्या वाढते. त्यामुळे तुम्ही केस वरती बांधत असाल तरी ते हलके राहतील याची काळजी घ्या.

२. कोंडा किंवा इन्फेक्शन

केस वरती बांधले तर आपल्याला मानेवर किंवा कामाच्या मागे घाम येणे कमी होते. पण डोक्यात ज्याठिकाणी केस आहेत त्याठिकाणी घाम येतोच. केस बांधल्याने या भागात हवा न लागल्याने घामामुळे याठिकाणी कोंडा होणे, इन्फेक्शन होणे किंवा केसांना घामाचा कुबट वास येणे अशा समस्या उद्भवू शकतात. 

३. मुळे सैल होतात आणि केस गळतात

केस हे अतिशय नाजूक असतात. त्यामुळे त्यांना अतिशय हळुवार हाताळणे आवश्यक असते. पण आपण घाईगडबडीत केस घेऊन ते गुंडाळतो आणि वर बांधून टाकतो. अशाप्रकारे केस घट्ट वर बांधल्याने त्यांची मुळे ओढली जातात आणि केस गळण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे केस वर बांधत असाल तरी हळूवार बांधायला हवेत. त्यांची मुळे ओढली जाणार नाहीत, त्यांना ताण पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

(Image : Google)

४. गुंता होतो 

केस बराच वेळ वर बांधून ठेवल्याने केसांत गुंता होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे केस सोडल्यानंतर कितीतरी वेळ केस विंचरले तरी हा गुंता निघत नाही. अशावेळी केसात जाळ्या होणे, केसांचा गुंता काढताना केस तुटणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे केस एकसारखे करुन मग हळूवारपणे वरती बांधायला हवेत. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीसमर स्पेशल